MPSC, UPSC: एमपीएससी, यूपीएससीमध्ये वारंवार अपयश आलेल्यांचे पुढे होते काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 01:29 PM2022-06-15T13:29:23+5:302022-06-15T13:29:47+5:30
जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी आयएएस, आयपीएस तसेच, शासकीय अधिकारी बनण्याची स्वप्ने पाहत स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात.
प्रज्ञा म्हात्रे
ठाणे :
जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी आयएएस, आयपीएस तसेच, शासकीय अधिकारी बनण्याची स्वप्ने पाहत स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतात. या परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला यात यश येतेच असे नाही आणि वारंवार येणाऱ्या अपयशामुळे हे विद्यार्थी खचून जातात. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी दुसरा पर्याय निवडण्याचा सल्लाही शिक्षणतज्ज्ञ देतात.
दरवर्षी स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या, त्यातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरीच मोठी तफावत पाहायला मिळते. हे विद्यार्थी ही परीक्षा वारंवार देतात. तर दुसरीकडे वय उलटून जात असल्याचे दडपण येत असते. वारंवार येणारे अपयश पाहता दुसऱ्या पर्यायाकडे नाइलाजाने जातात आणि स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहते, असे या परीक्षेची तयारी करणारे सांगतात.
वर्षाचा खर्च एक लाख
घरच्या घरी अभ्यास करीत असेल तर पुस्तकाचा खर्च सात ते आठ हजार रुपये येतो. कोचिंग क्लास हॉस्टेलसह अंदाजे एक लाख रुपये खर्च येतो आणि क्लास लावला तर ३० ते ६० हजार रुपये फी घेतली जाते.
दोन टक्के यशस्वी
स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यात मोठी दरी असल्याने या विद्यार्थ्यांपुढे सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्न आ वासून समोर उभे राहतात. त्यामुळे असे विद्यार्थी दुसरा पर्याय निवडतात.
वय उलटू लागले, पुढे काय?
तीन ते चार वर्षे झाले एमपीएससीचा अभ्यास करीत आहे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अर्थार्जनासाठी बाहेर पडावे लागते. त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. यश येत नसल्याने आता एमपीएससीकडे मी पर्याय म्हणून पाहत आहे. एमएसडब्ल्यूचा अभ्यास करीत आहे.
- अजय
मी यूपीएससीची तयारी करीत आहे. परीक्षा २०२३ ला देणार आहे. त्यानंतर वारंवार अपयश येत गेले तर पार्टटाईम किंवा फुलटाईम नोकरी करणार. प्लॅन बी तयार आहे.
-गोविंदा
मी यूपीएससीची तयारी करीत आहे. उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करीत आहे; परंतु यश न आल्यास प्लॅन बी तयार आहे.
- सेजल
दुसरा पर्याय असायलाच हवा
यूपीएससी परीक्षा ज्यांना द्यायची आहे त्यांनी तीन वर्षे प्रामाणिकपणे अभ्यास करावा. त्यात यश येत नसेल तर दुसरा पर्याय निवडायला हवा. स्पर्धा परीक्षेची तयारी अकरावी- बारावीपासूनच करावी, त्यामुळे पदवीधर झाल्यानंतर बरीच तयारी झालेली असते. या परीक्षांत अपयश आले तर खचून जाऊ नका.
- महादेव जगताप, संचालक, देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे दुसरा पर्याय असायलाच हवा. कोणत्याही क्षेत्रात प्लॅन ए आणि प्लॅन बी असायलाच हवे. पूर्ण लक्ष हे प्लॅन ‘ए’वर असायला हवे आणि त्यासाठी झटले पाहिजे; परंतु मनासारखे यश प्लॅन ‘ए’मध्ये नाही मिळाले तर प्लॅन ‘बी’ स्वीकारायला हवा.
- डॉ. चंद्रशेखर मराठे, माजी प्राचार्य, ज्ञानसाधना महाविद्यालय
आकडे काय सांगतात?
२३ जानेवारी २०२२
एमपीएससी परीक्षेला बसलेले विद्यार्थी: ९,३२१
५ जून २०२२
यूपीएससी परीक्षेला बसलेले विद्यार्थी : ५,८८९