अभ्यासक्रम पूर्ण कधी होणार? अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरूच असल्याने महाविद्यालय प्रशासनासमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 06:06 AM2022-10-11T06:06:42+5:302022-10-11T06:07:08+5:30
मुंबई विभागात या माध्यमातून आतापर्यंत रोज दीडशे- दोनशे हून अधिक विद्यार्थी प्रवेशित होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दैनंदिन गुणवत्ता फेरीच्या माध्यमातून सध्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू असून, मुंबई विभागातून रोज १०० हून अधिक विद्यार्थी या माध्यमातून प्रवेश घेत आहेत. ही प्रक्रिया येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, या काळात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा पूर्ण करून घ्यायचा? या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी घ्यायच्या आणि अकरावीचे शैक्षणिक स्तर कसे पूर्ण करायचे, असा प्रश्न आता महाविद्यालयांकडून उपस्थित केला जात आहे.
२१ ऑक्टोबरपासून दिवाळी सुट्टीला सुरुवात होणार असल्याने, त्या आधी या विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालयीन प्रशासनाला पूर्ण करून घ्यायच्या असतात. त्यामुळे महाविद्यालयीन प्रशासन आता उशिरापर्यंत सुरू असलेल्या या प्रवेश प्रक्रियेमुळे कोंडीत सापडले आहे.
दैनंदिन गुणवत्ता फेरीची ही सुविधा १ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, सायंकाळी ७ ते सकाळी ९ पर्यंत विद्यार्थ्यांना या दरम्यान प्रवेशासाठी अर्ज करता येतो. त्याच दिवशी विद्यार्थ्यांना आपल्या प्रवेशाची निश्चिती ही करता येते.
मुंबई विभागात या माध्यमातून आतापर्यंत रोज दीडशे- दोनशे हून अधिक विद्यार्थी प्रवेशित होत आहेत. प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी असली, तरी या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याचे आव्हान आता प्राचार्य आणि शिक्षकांपुढे उभे राहिले आहे. दिवाळीपूर्वी परीक्षा पूर्ण करून घ्यायच्या असल्याने, अनेक महाविद्यालयांनी परीक्षांचे नियोजन केलेले आहे.
मात्र, नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे आणि केव्हा करायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.
आतापर्यंतच्या दैनंदिन फेऱ्यांमधून १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश
या प्रवेश फेरीच्या दरम्यान कोटा आणि द्विलक्षी प्रवेश प्रक्रियाही नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दुबार प्रवेश घेणारे किंवा जाणीवपूर्वक जागा अडवून ठेवत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत कडक कारवाई केली जाईल, असे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या दैनंदिन गुणवत्ता फेरीमधून मुंबई विभागात १० हजारांहून पुढील प्रवेश निश्चित झाले आहेत.