भरमसाठ फी घेणाऱ्या इंटिग्रेटेडवर अंकुश कधी? लाखोंच्या शुल्काने पालकांची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 08:10 AM2023-06-17T08:10:00+5:302023-06-17T08:10:12+5:30
ना उपस्थितीची, ना उपक्रमात सहभागी होण्याची अट; मात्र, मोठ्या शुल्कामुळे पालक बेहाल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एकीकडे ना उपस्थितीची अट, ना परीक्षांचे टेन्शन, ना अभ्यास सोडून इतर उपक्रमात सहभागाची आवश्यकता यामुळे मुंबईसह राज्यातील इंटिग्रेटेड (एकात्मिक) महाविद्यालयांना विद्यार्थी आणि पालकांची पसंती वाढत चालली आहे. मात्र, या महाविद्यालयाकडून अवाच्या सव्वा शुल्काच्या माध्यमातून होणारी पालकांची लूटही दिवसागणिक वाढत चालली आहे.
या महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि इतर अनेक नियमांना बगल दिली जात असल्याने शिक्षण विभागांचे अनेक नियम धाब्यावर बसविणे राजरोसपणे सुरू आहे. मात्र, तरीही गेल्या अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या महाविद्यालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा शिक्षण विभागाकडून अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
इंटिग्रेटेड महाविद्यालय बंद करणार, अशी घोषणा शालेय शिक्षण विभागाकडून अनेकदा करण्यात आली. मात्र, राज्यातील महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसचे ‘टायअप’ सुरूच आहे. विशेष म्हणजे अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी होणार गोंधळ, प्रवेश प्रक्रियेस होणारा उशीर, यामुळे महाविद्यालये सुरू होण्यास लागणारा वेळ यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असते. यामुळेच अनेक विद्यार्थ्यांनी कोट्यांतर्गत ऑफलाइन व इंटिग्रेटेड प्रवेश घेणे सुरू केले, तर त्यांचे क्लासेसही सुरू झाले आहेत.
शुल्क लाखोंच्या घरात
इंटिग्रेटेड महाविद्यालयाचे शुल्क तीन लाख ते दहा लाखांच्या घरात आहे. ज्यात अकरावीपासून ते पुढे आयआयटीसारख्या परीक्षेपर्यंतचे शुल्क या विद्यार्थ्यांकडून घेतले जाते. इंटिग्रेटेड महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी पालकांची घाई सुरू असल्याचे चित्र मुंबईत दिसत आहे, तर काही क्लासेस शिक्षण विभागाकडून स्वयंअर्थसाहाय्यित तत्त्वावर कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी घेतात.
या प्रकारच्या प्रवेशांमुळे अनुदानित कनिष्ठ महाविद्यालये अडचणीत आली असून विद्यार्थी नसल्याने अनेक महाविद्यालये बंद पडण्याची वेळही येत आहे. यामुळे महाविद्यालयांतील प्रवेश क्षमतेवर परिणाम होऊन शिक्षकच अतिरिक्त होण्याची भीती आहेच. नियमित प्रवेश प्रक्रियेतून ऑफलाइन प्रवेश, इंटिग्रेटेड प्रवेश होतात. शिक्षण विभागाकडूनही दुर्लक्ष होते. मात्र, कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने कारवाई केल्यास यावर आपोआप नियंत्रण येऊ शकते. -मुकुंद आंधळकर, समन्वयक, मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना