पुढील ३ वर्षात भारतातील १ लाख महिला शिक्षकांना नोकरी मिळणार
By प्रविण मरगळे | Published: December 14, 2020 01:27 PM2020-12-14T13:27:18+5:302020-12-14T13:27:51+5:30
या अंतर्गत भारतात पुढील ३ वर्षात १ लाख शिक्षकांना नोकऱ्या मिळतील आणि विशेष या नोकऱ्या महिलांसाठी असतील.
नवी दिल्ली – विद्यार्थ्यांना ऑनलाइन कोडिंग शिक्षण देणारी कंपनी व्हाईटहॅट ज्यूनिअर जागतिक विस्तारातंर्गत बिगर इंग्रजी भाषिक देश ब्राझील आणि मॅस्किकोमध्ये प्रवेश करत गणित क्लासेसची सुरुवात करणार आहे. या अभियानामुळे पुढील ३ वर्षात १ लाख महिला शिक्षकांची भरती करणार आहे.
व्हाईटहॅट ज्यूनिअरचे सीईओ करण बजाज यांनी सांगितले की, दोन वर्षाच्या काळात ऑनलाइन शिक्षणाच्या व्यासपीठाला भारत, अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया जबरदस्त यश मिळालं, ज्यात जवळपास दीड लाख विद्यार्थी, ११ हजार शिक्षक आणि ४० हजार क्लासेसमधून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येतं. आम्ही पुढील महिन्यापासून गणिताचा वर्ग सुरु करत आहोत. त्याचसोबत कंपनी प्रत्येक विद्यार्थ्यांवर लक्ष देण्यासाठी शिक्षण मॉडेलचा वापर करणार आहे.
या अंतर्गत भारतात पुढील ३ वर्षात १ लाख शिक्षकांना नोकऱ्या मिळतील आणि विशेष या नोकऱ्या महिलांसाठी असतील. शिक्षक आपल्या घरातूनच वेळेनुसार चांगली कमाई करू शकतात. फी देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ७० टक्के भारतीय विद्यार्थी आहेत तर बाकी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या देशातील विद्यार्थी आहेत. सध्या ब्राझील आणि मॅस्किकोमध्ये हा प्रयोग सुरु करत आहोत. त्यानंतर आर्थिक उलाढाल पाहून जागतिक स्तरावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
व्हाईटहॅट ज्यूनिअर शाळांनाही कोडिंग शिकवण्यासाठी प्रवेश देत आहे. आतापर्यंत १०० शाळांमध्ये कोडिंग सुरु करण्यात आलं आहे. आगामी काळात १ हजार शाळांमध्ये कोडिंग शिकवण्याचं उद्दिष्ट आहे. प्रशिक्षक विद्यार्थ्यांच्या छोट्या समुहाला शिक्षण देत आहेत. गणित आणि विज्ञान यासारख्या नव्या माध्यमातून कोडिंग जगभरात पोहचवू, लॉकडाऊन काळात कंपनीची उलाढाल ६० टक्क्यांनी वाढली, तर कंपनीचं वार्षिक उत्पन्न १५० दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहचलं आहे.