‘कॉपी’ला जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2022 12:21 PM2022-03-20T12:21:34+5:302022-03-20T12:21:41+5:30

शाळा व्यवस्थापन आणि खासगी शिकविण्याची १०० टक्के निकालाची स्पर्धा विद्यार्थ्यांना गैरमार्गावर चालण्यास मदत करत असल्याची चर्चा या निमित्त रंगत आहे. 

Who is responsible for copying? | ‘कॉपी’ला जबाबदार कोण ?

‘कॉपी’ला जबाबदार कोण ?

Next

- सीमा महांगडे 

अखेर दहावी, बारावीच्या प्रत्यक्ष परीक्षांना यंदा मुहूर्त मिळून त्या सुरूही झाल्या. मात्र, यंदा कॉपीसारख्या गैरप्रकरणांच्या वाढलेल्या संख्येने परीक्षांचे खरे सत्त्व हरवून गेले आहे. परीक्षांना विद्यार्थी घाबरले होते, मानसिकता नव्हती हे सगळे जरी खरे असले तरी विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता वाढीची आणखी एक संधी असणार आहे, हेच विद्यार्थी विसरले आहेत. कॉपी प्रकरणांच्या संख्येने सुरू असलेल्या परीक्षांना बट्टा तर लागलाच मात्र, या निमित्ताने शाळा व्यवस्थापन आणि खासगी शिकविण्याची १०० टक्के निकालाची स्पर्धा विद्यार्थ्यांना गैरमार्गावर चालण्यास मदत करत असल्याची चर्चा या निमित्त रंगत आहे. 

कुठे कॉपी प्रकरण आढळून शाळा मान्यतेची प्रक्रिया सुरू झाली, तर कुठे पेपर कठीण गेल्यामुळे आत्महत्येची घटना घडली. पेपर कठीण गेला म्हणून विद्यार्थ्याने जीवन संपवून टाकणे, पेपर कठीण जाऊ नये म्हणून चिट्ठ्या, मोबाइलमधून प्रश्न मिळवून कॉपी करणे या गंभीर समस्या आज विद्यार्थ्यांसमोर आहेत. त्यांच्या या समस्येला अनेक पैलू असल्याचे दिसून येतात. सुरुवातीपासूनच प्रत्यक्ष परीक्षा नको, अशी री ओढणारी विद्यार्थ्यांची टोळी सक्रिय होती. त्यात हिंदुस्थानी भाऊसारख्या काही व्यक्तींनी हातभार लावत परीक्षांचे वातावरण दूषित केले. 

एका सर्वेक्षणानुसार शालेय जीवनातील ताण, अडचणी, परीक्षांच्या भीतीमुळे देशातील जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य संपविले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या परीक्षेनंतर नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून लगेचच दुसरी परीक्षा घेतली जाते. त्यात पास होण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच पुढील करिअरवर नापास झालेल्या विषयाचा काहीही परिणाम होणार नाही हे शिक्षकांकडून, पालकांकडून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात शिक्षण व्यवस्था कमी पडतेय का ? किंवा कमी गुण मिळाल्यामुळे किंवा नापास झाल्यामुळे समाजातील त्याच्या अस्तित्वावर शिंतोडे उडणार नाहीत, हे समजावण्यात समाजव्यवस्था कमी पडत आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. 

परीक्षा हा तर शिक्षण व्यवस्थेचा एक भाग
परीक्षा हा केवळ शिक्षण व्यवस्थेचा एक भाग आहे, शिक्षण व्यवस्था नाही. त्यामुळे त्यातील कामगिरीवर आपण यशाची शिखरे गाठू शकतो; पण चांगली कामगिरी नाही करू शकलो तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही, हा गैरसमज विद्यार्थ्याच्या मनातून कायमचा पुसण्याची गरज आहे.  

Web Title: Who is responsible for copying?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.