हसावे का रडावे! १.२२ लाख जागा रिक्त, तरी अकरावीचे २४ हजार विद्यार्थी प्रवेशाविना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 20:22 IST2023-10-03T20:22:15+5:302023-10-03T20:22:33+5:30
तर ३२ टक्के जागा रिक्त

हसावे का रडावे! १.२२ लाख जागा रिक्त, तरी अकरावीचे २४ हजार विद्यार्थी प्रवेशाविना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नियमित आणि विशेष फेऱ्यानंतरही २४ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. मुंबई विभागात एकूण ९२ टक्के प्रवेश पूर्ण झाले असून ३२ टक्के जागा रिक्त आहे. या विभागात अजूनही २४ हजार ५९ विद्यार्थी प्रवेशाविना असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. येत्या आठवड्यात शिक्षण विभागाकडून लवकरच नव्या फेरीची घोषणा करण्यात येणार आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या आणि सहा विशेष फेऱ्या पार पडल्या आहेत. पहिल्या नियमित प्रवेश फेरीपासून अकरावीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये कमालीचे चढ – उतार पाहायला मिळाले आहेत. मुंबई महानगरक्षेत्रातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये चौथ्या विशेष प्रवेश यादीच्या तुलनेत सहाव्या विशेष प्रवेश यादीमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीचा विद्यार्थ्यांचा मार्ग सुकर झाला आहे. काही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे संबंधित महाविद्यालयांची सहाव्या विशेष प्रवेश यादी जाहीर केली नव्हती.
३१ टक्के जागा रिक्त
मुंबई विभागातील एकूण १ हजार २१ महाविद्यालयांमध्ये २ लाख ८९ हजार ७१८ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ६५ हजार ६५९ विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्रवेश मिळाला आहे, हे प्रमाण ९१.७ टक्के आहे. तर दुसरीकडे अजूनही १ लाख २२ हजार ८१६ म्हणजेच ३१.६१ टक्के जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे.
कोटानिहाय प्रवेश
कोटा विद्यार्थी संख्या रिक्त
कॅप २१००५९ ९११९४
इनहाऊस ९४३६ ६८६७
व्यवस्थापन ३६२०५ १८१९०
अल्पसंख्याक ९९५९ ६५६५
शाखानिहाय प्रवेश
शाखा विद्यार्थी संख्या
कला २६४६१
वाणिज्य १४०९४९
विज्ञान ९५५९६
एचएसव्हीसी २६५३