ऑक्सिजन सिलेंडर घेऊन शाळेत चालल्याचं भयानक स्वप्न पडलं; १२ वर्षाच्या मुलीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 01:51 PM2020-09-08T13:51:06+5:302020-09-08T13:53:12+5:30
रिद्धिमाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आग्रह केला आहे की, सर्व नियम आणि कायदे यांचे तंतोतंत पालन करुन प्रदुषण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
हवा प्रदुषणामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याने १२ वर्षीय जलवायू कार्यकर्ता असलेल्या रिद्धिमा पांडेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. रिद्धिमाने भारतातील सर्व लहान मुलांच्यावतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हवा प्रदुषणाविरुद्ध ठोस पाऊले तातडीने उचलण्याची मागणी केली आहे. तिने लिहिलेल्या पत्रात दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि मोठी लोकसंख्या असलेल्या शहरांची दुरावस्था यांचा उल्लेख केला आहे.
रिद्धिमाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आग्रह केला आहे की, सर्व नियम आणि कायदे यांचे तंतोतंत पालन करुन प्रदुषण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. यामुळे प्रत्येक भारतीय विशेषत: लहान मुलांच्या आरोग्यावर निर्माण झालेले संकटातून त्यांचे रक्षण करता येईल. ७ सप्टेंबर निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय हवा दिनानिमित्त रिद्धिमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ते सोशल मीडियावर शेअर केले.
या पत्रात रिद्धिमाने एक उदाहरण दिले आहे की, एकदा शिक्षकांनी शाळेत आम्हा सर्व विद्यार्थ्यांना एका वाईट स्वप्नाबद्दल विचारलं. तेव्हा माझ्या वाईट स्वप्नाबद्दल मी सांगितले की, मी शाळेत ऑक्सिजन सिलेंडर लावून येत आहे कारण सगळीकडे हवा प्रदुषित झाली आहे. हे सर्वात वाईट स्वप्न माझ्यासाठी मोठ्या चिंतेचा विषय आहे कारण हवा प्रदूषण हे देशातील समोरील मोठे संकट आहे. प्रत्येक वर्षी दिल्लीसह अन्य शहरात हवा प्रदुषित होत असते. ऑक्टोबरनंतर या शहरांमध्ये श्वास घेणेही कठीण होते. मला चिंता आहे की, जर माझ्या सारख्या १२ वर्षाच्या मुलीला श्वास घेण्यास अडचण होत असेल तर सर्वाधिक प्रदुषित असणाऱ्या दिल्ली आणि अन्य शहरात राहणाऱ्या लहान मुलांची काय अवस्था होत असेल असं तिने पत्रात म्हटलं आहे.
My name is Ridhima Pandey. I am a 12-year old student living in Haridwar, Uttarakhand. On International Day for Clean Air and Blue Skies, I have written to our Prime Minister demanding clean Air for all. pic.twitter.com/j0SsHj6v6R
— Ridhima pandey (@ridhimapandey7) September 7, 2020
तसेच मागील वर्षी बाल दिवस कार्यक्रमानिमित्त मी दिल्लीत होते, त्याठिकाणची हवा इतकी प्रदुषित आहे की ज्यामुळे येथील लोकांना श्वास घेण्यात अनेक समस्या निर्माण होत आहेत. हरिद्वारच्या रिद्धिमासह १६ मुलांनी जलवायू प्रदुषणाकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची तक्रार संयुक्त राष्ट्राच्या क्लाइमेट एक्शन समिटकडे केली आहे. जर वायू प्रदूषण वेळीच रोखलं नाही तर लोकांना भविष्यात स्वच्छ हवेत श्वास घेणे अन् जिवंत राहण्यासाठी स्वत:सोबत ऑक्सिजन सिलेंडर घेऊन चालावं लागेल असं तिने पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, या पत्राच्या माध्यमातून रिद्धिमाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आग्रह धरला आहे की, देशात प्रदूषणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सख्त आदेश दिले पाहिजे, जेणेकरुन लोकांना स्वच्छ हवा मिळू शकेल. कृपया याबाबत निर्णय घ्यावा की, ऑक्सिजन सिलेंडर विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा भाग बनू नये, जे भविष्यात विद्यार्थ्यांच्या खांद्यावरुन घेऊन जावं लागेल असं रिद्धिमाने पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.