साताऱ्यातील ८० टक्के सांडपाणी प्रक्रिया विना थेट जाते ‘वेण्णा’त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:59 AM2019-12-20T11:59:55+5:302019-12-20T12:01:49+5:30

जलप्रदूषणासोबतच नदीतील जैवविविधतेचाही ऱ्हास

About 80% of Satara's wastewater goes directly into the 'Venna' river without any processing | साताऱ्यातील ८० टक्के सांडपाणी प्रक्रिया विना थेट जाते ‘वेण्णा’त

साताऱ्यातील ८० टक्के सांडपाणी प्रक्रिया विना थेट जाते ‘वेण्णा’त

Next
ठळक मुद्देप्रक्रिया प्रकल्प आकाराला येईना

- प्रगती जाधव-पाटील, सचिन काकडे
सातारा : साताऱ्यातील ८० टक्के सांडपाणी वेण्णा नदीत सोडले जात असल्याने नदीसह परिसरातील शेती आणि माणसांचेही आरोग्य बिघडत चालले आहे. सांडपाण्यामुळे जलप्रदूषणासोबतच जैवविविधतेचा ºहास मोठ्या प्रमाणात होत आहे. सातारा पालिकेच्या स्थापनेला तब्बल १६५ वर्षे पूर्ण झाली. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतरही पालिकेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा करता आला नाही.  

सातारा शहराच्या परिसरात कोठेही नदी अथवा मोठा तलाव नाही. त्यामुळे शहराच्या पाण्याची गरज पूर्ण करण्याकरिता प्रारंभी हौदांची उभारणी केली. एकेकाळी शहराला हौदांचे शहर म्हणूनही ओळखले जायचे. संपूर्ण शहराला या हौदांमार्फतच पिण्यासह दैनंदिन कामासाठी पाणीपुरवठा केला जात असे. कालांतराने शहराचा विस्तार वाढत गेला अन् त्याच गतीने लोकसंख्याही. शहरीकरणामुळे पाण्याची उणीव भरून काढण्यासाठी कास तलावाची उभारणी करण्यात आली. खापरी नळांच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा केला जाऊ लागला. पुढे खापरी नळाची जागा बंदिस्त पाईपलाईनने घेतली. सध्या कास योजनेतून शहराला दररोज ५.५० लाख लिटर तर शहापूर योजनेच्या माध्यमातून ७.५० लाख लिटर असा एकूण १३ लाख लिटर पाणीपुरवठा पालिकेमार्फत केला जात आहे.

शहराची एकूण लोकसंख्या १ लाख २० हजार इतकी आहे. यापैकी सुमारे ७० हजार नागरिकांना पालिकेडून तर उर्वरित नागरिकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणी पुरविले जाते. पालिकेमार्फत प्रतिमाणसी १२५ लिटर तर एका कुटुंबाला सरासरी ५०० लिटर इतका पाणीपुरवठा दररोज केला जातो. एकूण पाण्याचा वापर पाहता तब्बल ८० टक्के पाणी  शौचालय, न्हाणीघर, स्वयंपाकघर, धुणी-भांडी, कारखाने यासह इतर कामकाजासाठी वापरले जाते. हे सांडपाणी बंदिस्त ड्रेनेजच्या माध्यमातून नाले व ओढ्यांमार्फत पुढे वेण्णा नदीत सोडले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेकडून सांडपाणी व्यवस्थापनाबाबत कोणताही प्रकल्प उभारण्यात आला नाही. 

सातारा पालिकेने यंदा भुयारी गटार योजनेचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत केवळ २० ते ३० टक्केच काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्णत्वास येताच शहरात दोन ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा वापरायोग्य केले जाणार आहे. मात्र सध्या या सांडपाण्यामुळे नदीतील जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत आहे. दूषित पाण्यामुळे माशांची नैसर्गिक रचना, रंग बदलत चालला आहे. पूर्वी वेण्णा नदीत काळसर चकचकीत रंगाचे मासे आढळून येत असत. आता निळसर रंगाचे मासे आढळून येतात. त्यांच्या आकारमानातही बदल झाला आहे. नदीत केंजळ व शैवाळाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे माशांचे जैविक खाद्य नष्ट होत चालले आहे. पूर्वी नदीकाठी लहान आकाराचे गवत आढळून यायचे. ही गवती रानं आता घटू लागली आहेत. 


आरोग्य बिघडले 
माणसांचे : सांडपाणी व्यवस्थापन नसल्याने वर्षभरात नदीकाठच्या तसेच खेड, सदर बझार, लक्ष्मी टेकडी, संगममाहुली, वर्ये या भागात कावीळ, डायरिया तसेच त्वचारोगांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे.


आणि शेतीचेही : सातारा तालुक्यातील संगममाहुली येथे कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम झाला आहे. वेण्णा नदीच्या पाण्यावर सुमारे ३५ ते ४० हजार हेक्टर शेतीक्षेत्र अवलंबून आहे. नदीकाठी वसलेल्या बहुतांश गावांमध्ये स्वत:च्या पाणीयोजना आहेत. मात्र, शेती पूर्णपणे या नदीच्या पाण्यावरच अवलंबून आहे. ५० ते ६० टक्के  शेतकरी या पाण्यावर भाजीपाला पिकवितात. आधीच दूषित पाणी, त्यात रासायनिक औषधांची भर पडत असल्याने शेती आणि माणसांचेही आरोग्य बिघडत आहे. 


वाढत्या जलप्रदूषणाचा जितका प्रभाव जलचरांवर, जैवविविधतेवर पडत आहे तितकाच मनुष्यावरदेखील होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लाखो लिटर सांडपाणी दररोज वेण्णा नदीला मिळत आहे. जलप्रदूषण रोखणे गरजेचे आहे. असे न झाल्यास भविष्यात पर्यावरणाची प्रचंड हानी होईल, शिवाय मनुष्याचे अस्तित्वही धोक्यात येईल.  

- सुधीर सुकाळे, पर्यावरणतज्ज्ञ, सातारा


जलप्रदूषण रोखणे ही काळाची गरज ओळखून सातारा पालिकेने भुयारी गटार योजना आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. ही योजना लवकरच मार्गी लागेल. भविष्यात भेडसावणारी जलप्रदूषणाची समस्या कायमस्वरूपी मिटावी यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.  - विशाल जाधव, आरोग्य सभापती, सातारा नगरपालिका
 

Web Title: About 80% of Satara's wastewater goes directly into the 'Venna' river without any processing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.