कोटीतीर्थमध्ये आणखी एका कासवाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 10:50 AM2021-02-26T10:50:07+5:302021-02-26T10:51:22+5:30
environment Muncipalty Kolhapur- कोटीतीर्थ तलावमध्ये गुरुवारी आणखी एका कासवाचा मृत्यू झाला. वनविभागाच्या पथकाने मृत कासव मंगळवार पेठ येथील पशुवैद्यकीय विभागाकडे विच्छेदनासाठी दिली असून, त्याचा अहवाल आल्यानंतर नेमका कशामुळे कासवांचा मृत्यू होतो हे स्पष्ट होणार आहे.
कोल्हापूर : कोटीतीर्थ तलावमध्ये गुरुवारी आणखी एका कासवाचा मृत्यू झाला. वनविभागाच्या पथकाने मृत कासव मंगळवार पेठ येथील पशुवैद्यकीय विभागाकडे विच्छेदनासाठी दिली असून, त्याचा अहवाल आल्यानंतर नेमका कशामुळे कासवांचा मृत्यू होतो हे स्पष्ट होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोटीतीर्थ तलावातील कासव मृत होण्याच्या घटना घडत आहेत. मागील महिन्यांत पाच ते सहा कासव मृत झाले होते. आठ दिवसांपूर्वीही असाच प्रकार घडला हातो. दोन दिवसांपूर्वीही एक कासव मृत झाले.
गुरुवारी आणखी एका कासवाचा मृत्यू झाला. आतापर्यंत दहा कासवांचा मृत्यू झाल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. तलावातील पाण्याचा रंग हिरवट झाला आहे. यामध्ये मैला व गटाराचे पाणी मिसळत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या तलावातील जलचर प्राणी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
मासेमारीचा गळ कारणीभूत
कोटीतीर्थमध्ये कासव मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये मासेमारीचा गळ कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, वारंवार घटना घडत असल्यामुळे दूषित पाणीही याला कारणीभूत असण्याची दाट शक्यता आहे. यासाठी पाण्याचे नमुने तपासावे लागतील, अशी प्रतिक्रिया वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दूषित पाणी शुद्ध होण्यासाठी प्रयत्न
कोटीतीर्थ तलावातील पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी तसेच दूषित पाणी शुद्ध होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तसेच तलावात कचरा, सांडपाणी जाऊ नये याचे नियोजन करावे लागेल. यासाठी आगामी बजेटमध्ये नावीण्य पूर्ण योजनेतून कोटीतीर्थ तलावासाठी निधी राखून ठेवणे आवश्यक असल्याची माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागातून दिली आहे.