वातावरणातील प्रदूषण शोषून शुद्ध हवा सोडणारे उपकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 11:58 AM2020-01-19T11:58:55+5:302020-01-19T12:12:14+5:30
नद्या व वातावरणात वेगवेगळ्या स्वरूपात होणारे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न नीरीच्या वैज्ञानिकांतर्फे सातत्याने केला जातो.
निशांत वानखेडे
नागपूर - हवेमधील धूलिकण, रासायनिक गॅस इतर घटकांमधून होणारे प्रदूषण शोषून शुद्ध हवा बाहेर सोडणारे एक उपकरण राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)ने तयार केले आहे. पॅसिव्ह एअर रिज्युव्हेनेटिंग सिस्टीम (पार्स) असे या उपकरणाचे नाव असून, परिसरातील ८० टक्के हवा शुद्ध करण्याची त्याची क्षमता असल्याचा दावा नीरीच्या संशोधकांनी केला आहे.
नद्या व वातावरणात वेगवेगळ्या स्वरूपात होणारे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न नीरीच्या वैज्ञानिकांतर्फे सातत्याने केला जातो. पार्स हे त्याच प्रयत्नांचे एक फलित आहे. रमन विज्ञान केंद्रातील विज्ञान मेळाव्यात संस्थेच्या स्टॉलवर हे उपकरण सादर करून पहिल्यांदाच सार्वजनिक करण्यात आले आहे. प्रकल्प सहायक यशश्री राऊत यांनी या उपकरणाच्या कार्यप्रणालीविषयी माहिती दिली. या उपकरणात कूलरप्रमाणे एक चेंबर तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये तळाला दोन फॅन आहेत. हे फॅन प्रामुख्याने हवेतील धूलिकण, धोकायदायक गॅसेस व प्रदूषणाचे इतर घटक शोषून घेण्याचे काम करतात. चेंबरमध्ये सुपीक माती, कोकोपीट, गांडूळ खत व चिलासारख्या वनस्पतींच्या मिश्रणाची जाळी लावण्यात आली आहे.
चेंबरच्या वर हवा शुद्ध करणाऱ्या टरबूज, जेड, आफ्रिकन मास्क अशा सात ते आठ प्रकारच्या वनस्पती लावण्यात आल्या आहेत. ज्या ७० ते ८० प्रकारच्या गॅसेस शोषून घेतात. फॅनद्वारे प्रदूषित घटक ओढून घेतल्यानंतर जाळीमध्ये धूलिकण, हानिकारक गॅसेस अडकतात आणि बाहेरील वनस्पतींच्या मदतीने शुद्ध हवा सोडली जाते. चेंबरवर लावलेल्या झाडांना दररोज पाणी देता येईल, अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. भौतिक, रासायनिक व जीवशास्त्रीय संकल्पनांना एकत्रित करून या उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या घर आणि कार्यालयातील वातावरणाचा विचार करून हे उपकरण तयार करण्यात आले आहे. मात्र, यात थोड बदल करून रस्ते दुभाजकावर, पार्क, उद्याने आदी ठिकाणी त्याचा वापर केला जाऊ शकतो, असे यशश्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
पेटंट आणि करार
नीरीने पार्स उपकरणाच्या पेटंटचा दावा केला असून, लवकरच त्यास मान्यता मिळणार आहे. पार्सचे हे तंत्रज्ञान एका पर्यावरण कंपनीला हस्तांतरित करण्यात आले असून, लवकरच ते सर्वत्र उपलब्ध होणार आहे.
काय आहे हे उपकरण
या उपकरणात तळाला दोन फॅन आहेत. चेंबरमध्ये सुपीक माती व इतर मिश्रणाची जाळी लावली आहे. चेंबरच्या वर हवा शुद्ध करणाऱ्या वनस्पती आहेत. फॅनद्वारे प्रदूषित घटक ओढून घेतल्यानंतर जाळीमध्ये धूलिकण, हानिकारक गॅसेस अडकतात आणि बाहेरील वनस्पतींच्या मदतीने शुद्ध हवा सोडली जाते.