अग्रण धुळगाव येथे २५ एकरमध्ये साकारणार जैवविविधता उद्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 01:08 PM2021-06-06T13:08:21+5:302021-06-06T13:11:30+5:30

environment Bio Diversity Sangli : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जैवविविधता उद्यान अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे तयार करण्यात येत आहे. २५ एकर क्षेत्रात विविध प्रजातींची १६ हजार झाडे लावली जातील. अभिनेते सयाजी शिंदे यांनी याकामी पुढाकार घेतला आहे.

Biodiversity Park to be set up in 25 acres at Agran Dhulgaon | अग्रण धुळगाव येथे २५ एकरमध्ये साकारणार जैवविविधता उद्यान

अग्रण धुळगाव येथे २५ एकरमध्ये साकारणार जैवविविधता उद्यान

Next
ठळक मुद्देअग्रण धुळगाव येथे २५ एकरमध्ये साकारणार जैवविविधता उद्यानयेत्या आठवड्यात प्रत्यक्ष वृक्षारोपणाला प्रारंभ होणार

संतोष भिसे

सांगली : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जैवविविधता उद्यान अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे तयार करण्यात येत आहे. २५ एकर क्षेत्रात विविध प्रजातींची १६ हजार झाडे लावली जातील. अभिनेते सयाजी शिंदे यांनी याकामी पुढाकार घेतला आहे.

शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात अशी देवराई निर्माण केली आहे, तशीच आता अग्रण धुळगावमध्येही दिसेल. त्याच्या तयारीसाठीची व्यापक बैठक शनिवारी ऑनलाईन स्वरुपात झाली. सह्याद्री देवराईचे अध्यक्ष तथा अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह लेखक अरविंद जगताप, उपवन संरक्षक विजय माने, मधुकर फल्ले, सचिन चंदने, विजय निंबाळकर, वनस्पतीशास्त्रज्ञ सुहास वायंगणकर, शिल्पकार किशोर ठाकूर, चित्रकार केशव कासार, अग्रणी फाऊंडेशनचे शिवदास भोसले आदी सहभागी झाले.

अग्रण धुळगावपासून अर्धा किलोमीटर अंतरावर उद्यान साकारत आहे. वृक्षारोपणासाठी वन विभागाने खड्डे काढले आहेत. विविध १५० प्रजातींची झाडे सह्याद्री देवराईकडून दिली जातील, त्यातील २० प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावरील आहेत. पाणीपुरवठ्यासाठी ठिबक व अन्य अनुषंगिक खर्चही देवराई करणार आहे.

झाडे लावण्याच्या मोहिमेत स्थानिक स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे, विद्यार्थी व वृक्षप्रेमी सहभागी होत आहेत. २५ एकर क्षेत्र वनविभागाच्या मालकीचे आहे. त्यामध्ये विविध सहा उद्याने तयार केली जातील. आयुर्वेदीक वनस्पती, फळझाडे, लहान मुलांसाठी व वृद्धांसाठी उद्याने, ऑक्सिजन देणारी झाडे असे वैविध्य राखले जाणार आहे.

येत्या आठवड्यात प्रत्यक्ष वृक्षारोपणाला प्रारंभ होणार आहे. झाडांच्या संगोपनासाठी अग्रणी पाणी फाऊंडेशन, सह्याद्री देवराई तसेच ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. सांगली जिल्ह्यात या प्रकारचे हे पहिलेच इतके मोठे जैवविविधता उद्यान असल्याचे फाऊंडेशनचे शिवदास भोसले यांनी सांगितले.

Web Title: Biodiversity Park to be set up in 25 acres at Agran Dhulgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.