प्लास्टिक विकत घेता की आजार?

By विजय बाविस्कर | Published: June 4, 2023 08:45 AM2023-06-04T08:45:35+5:302023-06-04T08:46:07+5:30

माणसाच्या पुढील अनेक पिढ्या याचे दुष्परिणाम भोगणार आहेत.

buying plastic or disease | प्लास्टिक विकत घेता की आजार?

प्लास्टिक विकत घेता की आजार?

googlenewsNext

विजय बाविस्कर, समूह संपादक

‘जागतिक पर्यावरण दिन’ आपण उद्या (5 जून) मोठ्या उत्साहात साजरा करू. ‘प्लास्टिक प्रदूषण’ ही यंदाची थीम आहे. खरंच आपल्याला पर्यावरणाची चिंता आहे का? असेल तर प्लास्टिकचा वापर आपण थांबवणार आहोत का? याचे उत्तर ज्याचे त्याने स्वत:लाच द्यायचे आहे. प्लास्टिकमुळे केवळ माणसांनाच नव्हे, तर पक्षी, प्राण्यांच्याही जिवाला धोका निर्माण झाला आहे. माणसाच्या पुढील अनेक पिढ्या याचे दुष्परिणाम भोगणार आहेत.

सिंगल यूज प्लास्टिकवर आपल्याकडे बंदी आहेच. म्हणून त्याचा वापर थांबला आहे का? शहराभोवताली आणि नदी- समुद्रकिनारी जमा झालेले कचऱ्याचे ढिगारे पाहिले तर त्याचे उत्तर मिळते. प्लास्टिकचा हा अतिवापर आपल्याला कोठे घेऊन जाणार, हे ठाऊक नाही. प्लास्टिकने आपले जीवन सोपे आणि अधिक सुखकर बनवले आहे, हे खरेच; पण या प्लास्टिकच्या अति वापरामुळे ते जीवघेणेदेखील ठरत आहे. प्लास्टिक जमिनीवर किंवा पाण्यात नैसर्गिकरीत्या विघटित होत नाही. अगदी १ मि.मी. जाडीचे प्लास्टिक पूर्णपणे कुजण्यास किंवा निसर्गात विघटित होण्यास ५ हजार वर्षे लागू शकतात. ही समस्या केवळ आपली नाही. अख्खे जग या प्लास्टिकच्या भस्मासुराने चिंतित आहे.

जगभरात प्रत्येक वर्षी साधारण ४० कोटी टन प्लास्टिक कचरा तयार होतो. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार पृथ्वीवर जमा होणा­­ऱ्या या  कचऱ्याचे एकूण वजन हे पृथ्वीवरच्या सर्व माणसांच्या एकूण वजनाइतके झाले आहे. 

इंग्लंडमधील एका संस्थेच्या ‘कनेक्टिंग द डाॅट्स : प्लास्टिक पोल्युशन ॲण्ड द प्लॅनेटरी इमर्जन्सी’ या अहवालानुसार २०५० पर्यंत समुद्रांमध्ये माशांच्या वजनापेक्षा या प्लास्टिकचे वजन जास्त असेल. यावरून या संकटाची व्याप्ती लक्षात यावी.
सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत हे प्लास्टिक आपल्या सोबत असते. ते टिकाऊ असते, लवचीक असते. दिसायला आकर्षकही असते. मुख्य म्हणजे ते स्वस्तही असते. मात्र, त्याचे विघटन होत नाही. साध्या पाण्याच्या बाटलीचे विघटन होण्यासाठी १०० पेक्षा जास्त वर्षे लागू शकतात. प्लास्टिकच्या पिशव्या, चॉकलेट, कुरकुरे यांचे रॅपर्स हवेत उडून नदी-नाले, समुद्रात जमा होतात. या प्लास्टिक कचऱ्यामुळे जलस्रोत दूषित होतात. हे प्लास्टिक विषारी रसायन पाण्यात सोडते. हेच पाणी आपण पितो आणि शेतीसाठीही वापरतो. त्यामुळे आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. या प्लास्टिकला गाडल्यानंतरही हजारो वर्षे ते जमिनीतच राहते. त्यामुळे जमिनीची सुपीक क्षमताही संपुष्टात येते. शिवाय प्लास्टिकमधून बाहेर पडलेले विषारी पदार्थ जमिनीत मुरतात. यामुळे भूजल प्रदूषित होते. प्लास्टिक जाळल्यावर ते नष्ट होते, असे मानले जाते. मात्र, वास्तव फार भयंकर आहे. प्लास्टिक जाळल्यावर विषारी वायू हवेत सोडले जातात, त्यामुळे प्रदूषण होते. या धुरामुळे मानवाला गंभीर आजार होऊ शकतात.

पाण्यातील जीव प्लास्टिक खाल्ल्याने एक तर मरण पावतात किंवा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. घरातील कचरा किंवा उरलेले अन्न पॉलिथीनच्या पिशवीत टाकले जाते आणि कुठेही फेकले जाते. त्यामुळे बाहेर फिरणारे प्राणी जसे की गाय, कुत्रे, शेळ्या व इतर प्राणी ते अन्न म्हणून खातात. परिणामी, प्लास्टिक त्यांच्या पोटात जाते. त्यामुळे ते मरण पावतात. ‘नेचर इकॉलॉजी ॲण्ड इव्हॉल्युशन’मध्ये प्रकाशित अहवालानुसार मायक्रोप्लास्टिकमुळे समुद्री पक्ष्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे.

हे प्लास्टिक माणसांसाठीही तेवढेच घातक आहे. प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रमुख आजारांमध्ये हार्मोन्सशी निगडित घातक रोग, वंध्यत्व, ऑटिझमसारख्या न्यूरो डेव्हलपमेंटल समस्यांचा समावेश होतो. प्लास्टिकच्या प्रदूषणामुळे कॅन्सरसारख्या महाभयंकर आजाराचा धोका वाढतो. प्लास्टिकमध्ये विषारी आणि हानिकारक संयुगे असतात, जी मानवी शरीरासाठी हानिकारक असतात. एका सर्वेक्षणात मानवी रक्तात मायक्रो प्लास्टिक आढळून आल्याचे संशोधन पुढे आले होते. हे अत्यंत धोकादायक आहे. कॅडमियम आणि पारा या रसायनांच्या कॉकटेलमुळे प्लास्टिकचा मानवी शरीराशी थेट संपर्क आल्याने कर्करोगासारख्या आजारांचा धोका वाढतो. प्लास्टिकमध्ये असलेल्या रसायनांमुळे अस्थमासारखे आजार चिंतेचा विषय बनले आहेत.

सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी

न्यूझीलंड, चीन, युरोपियन युनियन आणि अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. 
भारतात १ जुलै २०२२ पासून सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी आहे.  देशानुसार सिंगल यूज प्लास्टिकची व्याख्याही बदलते. युरोपियन युनियनच्या व्याख्येनुसार रोजच्या वापरात असलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा सिंगल यूज प्लास्टिकमध्ये समावेश होतो. 

भारतात प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट अमेंडमेंट 

रूल्स-२०२१ नुसार एकदा वापरून फेकले जाणारे कुठलेही प्लास्टिक हे सिंगल यूज असते. प्लास्टिकच्या स्ट्रॉ, कॅरिबॅग, पाण्याच्या बाटल्या, थाळ्या, कप, पेले आदी वस्तूंचा वापर भारतात सर्रास होऊ लागला. त्यामुळे हा कचराही वाढला.

बांगलादेश पहिला

२००२ साली प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांवर पूर्ण बंदी घालणारा बांगलादेश पहिला देश ठरला. त्यानंतर आजवर जगभरातल्या ७७ देशांनी सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे किंवा निर्बंध आणले आहेत.

कचऱ्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा

- १९५०च्या दशकापासून जगभरात  प्लास्टिकचा वापर कित्येक पटींनी वाढला. सध्या जगात धातू किंवा इतर कुठल्याही साहित्यापेक्षा प्लास्टिकचा वापर सर्वाधिक होतो. 
- प्लास्टिक कचऱ्याच्या निर्मितीत आपला देश जगात तिसऱ्या स्थानावर आहे. 
- भारतात दररोज १६ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती केली जाते. 
- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या २०१९-२०च्या अहवालानुसार भारतात ३४ लाख ६९ हजार ७८० टन  प्लास्टिक कचरा जमा झाला आहे. 
- तीन वर्षांनंतर आता हा आकडा ५० लाख टनाच्या पुढे पोहोचला असेल. 
- या कचऱ्यात आपल्या महाराष्ट्राचा आणि विशेषतः मुंबईचा वाटा सर्वांत मोठा आहे. 
- महाराष्ट्रात दरवर्षी चार लाख टनाहून अधिक प्लास्टिक कचरा तयार होतो, असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी सांगते.

भारतासह १२४ देशांची स्वाक्षरी 

सध्या ज्या प्रमाणात प्लास्टिकची निर्मिती होते, तो वेग असाच राहिला, तर २०५० पर्यंत जीवाश्म इंधन वापरापैकी २० टक्के वापर प्लास्टिकच्या निर्मितीसाठी होईल, असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी वर्तविला आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत भारतासह १२४ देशांनी प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत एका करारावर स्वाक्षरी केली आहे.


 

Web Title: buying plastic or disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.