मुंबईसह परिसरातील बिबट्यांचा होणार अभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 08:45 AM2020-07-28T08:45:04+5:302020-07-28T08:56:19+5:30
मानव व बिबट्या सहसंबंध समजून घेण्यासाठी बिबटयाच्या टेलिमेट्री अभ्यासाला केंद्राच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
सचिन लुंगसे
मुंबई - मुंबईच्या आसपास वावर करणाऱ्या पाच बिबटयांना आता कॉलर जीपीएस, जीएसएम लावले जाणार आहे. त्यानंतर दोन वर्षे अभ्यास केला जाणार असून यासाठी ६२ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी ४० लाख रुपये वन विभाग तर २२ लाख रुपये वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी-इंडियाकडून उपलब्ध होणार आहेत.
मानव व बिबट्या सहसंबंध समजून घेण्यासाठी बिबटयाच्या टेलिमेट्री अभ्यासाला केंद्राच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यानुसार, राज्याचा वन विभाग व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी-इंडिया संयुक्तपणे हा अभ्यास केला जाणार आहे. पुढील दोन वर्षात त्याचे निष्कर्ष हाती येतील. या अभ्यासातून बिबट्याचा अधिवास व आवास क्षेत्र समजून घेण्यास मदत होईल. मानव आणि बिबट्या यांचे परस्पर संबंध कसे निर्माण होतात. बिबटे हे मानवी जीवनासोबत कसे जुळवून घेतात, याचा अभ्यास केला जाईल. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील बिबटे तेथील जागेचा वापर कसा करतात. त्यांचे भ्रमण कसे होते? याबाबत या अभ्यासातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. अभ्यासातील निष्कर्षांच्या आधारे बिबटया व मानव यांच्यातील संघर्ष कसा कमी करता येईल, याबाबतही माहिती, निष्कर्ष उपलब्ध होईल.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आजूबाजूचा परिसर या अनुषंगाने होणा-या अभ्यास प्रकल्पावर वन विभागामार्फत अप्पर प्रधान वनसंरक्षक सुनील लिमये व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी-इंडिया मार्फत डॉ. विद्या अत्रेय या मार्गदर्शन करत कामकाज पाहणार आहेत.
बिबटयासारख्या प्राण्यांना कॉलर लावण्यापूर्वी ही परवानगी घेणे आवश्यक असते. या प्रकल्पाच्या माध्यमातून या लाजाळू प्राण्याबाबत अमुल्य अशी माहिती मिळेल.
- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव
आमच्या आधीच्या प्रकल्पातून ग्रामीण भागात बिबटे माणसासोबत कशा प्रकारे राहतात याविषयी आम्हाला माहिती मिळाली. मात्र आता इतकी घनदाट मानववस्ती असलेल्या भागात आणि माणसांच्या इतक्या जवळ बिबटे कशा प्रकारे राहतात हे जाणून घेण्यासाठी हा पहिलाच अभ्यास असेल.
- डॉ. विद्या अत्रेय