जागतिक व्याघ्र दिन विशेष : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघिणीचा गोव्यापर्यंत संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 01:26 PM2021-07-29T13:26:03+5:302021-07-29T13:28:05+5:30
Tiger Kolhapur Konkan : 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'मध्ये आढळलेल्या वाघिणीचा संचार गोव्यातील म्हादई अभयारण्यात आढळल्याचे छायाचित्र वन विभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाले आहे. त्यामुळे पश्चिम घाटातील व्याघ्र भ्रमणमार्ग अधोरेखित झाला असून, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यास हा मार्ग आणखीन सुरक्षित होईल, हे या व्याघ्र स्थलांतराच्या निमित्ताने स्पष्ट होईल.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'मध्ये आढळलेल्या वाघिणीचा संचार गोव्यातील म्हादई अभयारण्यात आढळल्याचे छायाचित्र वन विभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाले आहे. त्यामुळे पश्चिम घाटातील व्याघ्र भ्रमणमार्ग अधोरेखित झाला असून, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यास हा मार्ग आणखीन सुरक्षित होईल, हे या व्याघ्र स्थलांतराच्या निमित्ताने स्पष्ट होईल.
'तिलारी संवर्धन राखीव वनक्षेत्रा'च्या आसपासच्या परिसरात २०१८ मध्ये कॅमेऱ्यात आढळलेली एक वाघीण ३० जून, २०२१ रोजी गोव्यातील 'म्हादई अभयारण्या'त आढळली आहे. चार वर्षांनंतर या वाघिणीचे छायाचित्र 'म्हादई अभयारण्या'च्या दक्षिण भागामध्ये लावलेल्या कॅमेऱ्याने टिपले आहे.
सह्याद्रीमधील व्याघ्र अधिवासावर गेल्या दशकभरापासून अभ्यास करणारे 'वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट'चे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांनी 'म्हादई अभयारण्या'मधून प्रसिद्ध झालेले वाघाचे छायाचित्र हे सह्याद्रीत आढळणाऱ्या वाघांच्या छायाचित्रांशी जुळवून पाहिले, तेव्हा तिलारी परिसरातील 'ळळ 7' या वाघिणीच्या छायाचित्राशी ते जुळले. अर्थात हा अधिवास गोव्याच्या वन खात्याने मान्य केला नसला, तरी छायाचित्रांचे पुरावे हा संचार स्पष्ट करतो आहे. यापूर्वी चांदोलीत २०१८ च्या मे महिन्यात कॅमेराबध्द झालेला नर वाघ मे, २०२० मध्ये कर्नाटकातील 'काली व्याघ्र प्रकल्पा'त आढळला. विशेष म्हणजे त्याने तेव्हा २१५ किमीचे स्थलांतर केले होते.
यापूर्वी आंबोली, तिलारी, दोडामार्ग येथे वाघाचा अधिवास असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्याच महिन्यात नर वाघाचे दर्शन झाल्याची माहिती राधानगरी आणि सावंतवाडी वन्यजीवचे अधिकारी तुषार माळी यांनी दिली आहे.
सह्याद्रीतील वाघांचे स्थलांतर होत आहे. यामुळे वाघांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी दोन राज्यांमध्ये समन्वय असणेही आवश्यक आहे. पुन्हा एकदा सह्याद्री-कोकण व्याघ्र भ्रमणमार्गांचे अस्तित्वही अधोरेखित झाले आहे.
- गिरीश पंजाबी,
वन्यजीव संशोधक