कोल्हापूर जिल्ह्यात आढळला अत्यंत दुर्मीळ कॅस्टोए कोरल स्नेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 06:44 PM2021-07-17T18:44:50+5:302021-07-17T18:47:43+5:30
संदीप आडनाईक कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे आढळणाऱ्या कॅस्टोए कोरल स्नेक ( Castoe’s coral snake) या अत्यंत दुर्मीळ सापाची ...
संदीप आडनाईक
कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे आढळणाऱ्या कॅस्टोए कोरल स्नेक ( Castoe’s coral snake) या अत्यंत दुर्मीळ सापाची पहिली नोंद कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातून करण्यात आली आहे. या नव्या नोंदीमुळे या जिल्ह्यातील सापांच्या यादीत भर पडली असून सरिसृप तज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. या सापाच्या अधिवासामुळे आंबोली आणि आजरा परिसरातील समृद्ध जैवविविधता अधोरेखित झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. ओंकार यादव, शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी मयूर जाधव, स्वप्निल असोदे, सौरभ किनिंगे आणि शुभम कुरुंदवाडकर यांनी ही नोंद केली. ‘Reptiles and Amphibians’ या आंतराष्ट्रीय नियतकालिकामध्ये ही नोंद प्रसिद्ध झाली आहे.
यापूर्वी या सापाची नोंद सरीसृप तज्ज्ञ डॉ. वरद गिरी व सहकाऱ्यांनी २०१३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथून केली होती. त्यानंतर त्याचे वास्तव्य गोवा आणि कारवार (कर्नाटक) येथेही आढळले होते. २०२१ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आजरा तालुक्यामधील होनेवाडी आणि मडिलगे या ठिकाणांवरून या सर्पाची नोंद झाल्याने याचा अधिवास समृद्ध ठिकाणी असल्याचे सिध्द झाले आहे. मडिलगे येथे हा सर्प प्रथम आढळला. त्यानंतर होनेवाडीमध्ये हा साप मृत अवस्थेत आढळला.
या सापाची निरीक्षणे आणि छायाचित्रे सरीसृप तज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांना पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी हा साप कॅस्टोए कोरल स्नेक असल्याचे सांगितल्यानंतर यासंदर्भातील शोधनिबंध ‘Reptiles and Amphibians’ या आंतराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला.
प्रामुख्याने आंबोलीत आढळणारा हा साप अतिशय विषारी असून जमिनीखाली जास्त लोकसंख्येच्या ठिकाणी आढळतो. या सापाबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नसली तरी आशिया आणि अमेरिका खंडात केवळ ४०० प्रजाती आढळतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे तो साधारण तीन फूटापर्यंत आढळतो आणि त्याचा पोटाखालचा भाग लाल असतो. यामुळे आजरा आणि आंबोलीतील जैवविविधता अधोरेखित झाली आहे.
- डॉ. वरद गिरी, सरीसृप तज्ज्ञ