शेतकरी व विद्यार्थी हे दोन घटक पक्षी संवर्धनासाठी महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 04:19 AM2019-11-07T04:19:26+5:302019-11-07T04:19:56+5:30
पक्षी सप्ताह : तज्ज्ञ म्हणतात, पक्षिमित्र होऊनच निसर्ग टिकवता येईल
मुंबई : विद्यार्थी जर पक्षिमित्र झाले तर खऱ्या अर्थाने निसर्ग संवर्धनाचे बीज रोवले जाईल. ते साध्य होण्यासाठी पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने प्रयत्न व्हायला हवेत, असे मत पक्षी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र पक्षिमित्र (वर्धा) विदर्भ समन्वयक दिलीप विरखडे म्हणाले की, पक्षीविषय जाणीव व जागृतीसाठी शेतकरी आणि विद्यार्थी हे दोन घटक फोकस केले पाहिजेत. शेतकरीदेखील पक्षी साक्षर होणे गरजेचे आहे. शेती हा प्रचंड मोठा अधिवास असून बहुसंख्य पक्षी या अधिवासात असतात. पक्ष्यांचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावे. म्हणजे शेतकºयांना याची कल्पना आहेच. पण परत एकदा नव्याने पक्ष्यांचे महत्त्व शेतकºयांनी समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी पक्षिमित्र संमेलन आयोजित केले पाहिजे. तसेच विद्यार्थी पक्षिमित्र संमेलनदेखील आयोजित केले पाहिजे. विद्यार्थी जेव्हा या विषयाकडे वळतील तेव्हा आपल्याला नवीन पक्षिमित्र व निसर्गप्रेमी मिळतील.
महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर म्हणाले, पक्ष्यांविषयी लोकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. पक्षी सप्ताहानिमित्त पक्षी विषय चर्चिला जातो. महाराष्ट्रातील पक्षिमित्र व पक्षिप्रेमी संस्था व संघटना हे आपापल्या विभागात पक्ष्यांसंबंधित कार्यक्रम व उपक्रम राबवित असतात, हा पक्षी सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. पक्ष्यांची नोंदणी करणे, हा यंदा पक्षीसप्ताहामध्ये नवा बदल घडवून आणला गेला आहे. आपापल्या विभागातील पक्षी निरीक्षणाची नोंद ही पक्ष्यांच्या आॅनलाइन वेबसाईटवर करणे. यातून विविध प्रजातींच्या पक्ष्यांची अधिक माहिती उपलब्ध होईल. पक्ष्यांसंदर्भातील चित्रफिती, स्लाईट शो विद्यार्थ्यांना दाखवावेत.
विद्यार्थी निसर्गापर्यंत पोहोचावेत, हा पक्षी सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. पक्षी संवर्धनाची एक चळवळ निर्माण व्हावी. पक्षी सप्ताह हा शासन स्तरावर लागू व्हावा, याचा प्रस्ताव शासनाकडे मांडण्यात आला आहे.
- मिलिंद सावदेकर, प्रतिनिधी, महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना (वाशीम जिल्हा)
...म्हणून साजरा होतो ‘पक्षी सप्ताह’
५ नोव्हेंबर रोजी ललीत लेखक व पक्षीतज्ज्ञ मारूती चितमपल्ली यांचा जन्मदिवस तर १२ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ज्ञ डॉ. सलील अली यांच्या जन्मदिवसानिमित्त हा आठवडा ‘पक्षी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. लोकांमध्ये पक्षीविषयक जाणीव - जागृती निर्माण करण्याचा उद्देश म्हणेजच ‘पक्षी सप्ताह’ होय.