अर्थ अवरच्या रूपाने चार हजार युनिट विजेची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 10:45 AM2021-03-29T10:45:33+5:302021-03-29T10:48:18+5:30
mahavitaran Earth Hour kolhapur - पर्यावरणाचा समतोल राहावा आणि विजेची बचत व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर शहरात शनिवारी सायंकाळी अर्थ अवरचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत ३० हजार पथदिवे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सुमारे चार हजार युनिट विजेची बचत झाली.
कोल्हापूर : पर्यावरणाचा समतोल राहावा आणि विजेची बचत व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर शहरात शनिवारी सायंकाळी अर्थ अवरचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत ३० हजार पथदिवे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सुमारे चार हजार युनिट विजेची बचत झाली.
ऐतिहासिक बिंदू चौकात अर्थ अवरच्या लोगोच्या पणत्याही प्रज्वलित करून हा उपक्रम साजरा करण्यात आला. या अर्थ अवरमुळे शहरातील प्रमुख चौकांसह मुख्य रस्त्यांवर काही काळ अंधार होता. या एक तासादरम्यान शहरातील तीस हजार पथदिवे बंद करण्यात आले होते. यातून चार हजार युनिट विजेची बचत झाल्याची माहिती डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुुप्ता यांनी दिली.
हा उपक्रम डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सृष्टी नेचर क्लब, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय- कसबा बावडा, कोल्हापूर महापालिका, राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, कार्बन न्यूट्रल कोल्हापूर २०२५, नॉर्थ फौंडेशन, महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ यांच्या सहसंयोजनाने शनिवारी रात्री साडेसात ते साडेआठ या दरम्यान झाला.
यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, एन. एस. एस. समन्वयक डॉ. पी. डी. चौगुले, जिमखाना प्रमुख डॉ. राजेंद्र रायकर, डॉ. ए. ए. राठोड, डॉ. पी. एन. गायकवाड, डॉ. राहुल पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.