Ganesh Festival 2019 : गणेशोत्सवात खर्च कमी आणि पर्यावरणाची हमी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 10:59 AM2019-09-04T10:59:58+5:302019-09-04T11:03:30+5:30

पर्यावरणपूरक उत्सवाची कास धरली तर नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास थांबून आपला शाश्वत विकास होईल व गणपती बाप्पांची आपल्यावर निरंतर कृपादृष्टी राहील, यात शंका नाही. चला तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला सुरुवात करूया!!!

Ganesh Festival 2019 Celebrating Ganeshotsav in an eco-friendly way | Ganesh Festival 2019 : गणेशोत्सवात खर्च कमी आणि पर्यावरणाची हमी...

Ganesh Festival 2019 : गणेशोत्सवात खर्च कमी आणि पर्यावरणाची हमी...

Next

अमोल सावंत

अकोला - भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण हा निसर्गाशी निगडित आहे, प्रत्येक सण हा निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा व निसर्गाजवळ
घेऊन जाणारा सण आहे; पण कालानुरूप याचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन दूर त्याचा ऱ्हासच मोठ्या प्रमाणात होत आहे, आता वेळ आली आहे यात बदल करण्याची. आपले सण पर्यावरणपूरक साजरे करण्याची. ज्यामधून निसर्गाचे संवर्धन पण होईल व येणाऱ्या पिढीवर निसर्ग संवर्धनाचे व संस्कृतीचे संस्कारदेखील होतील.

वृत्तपत्र व सोशल मीडियाच्या माध्यमातून या बदलांची दखल घेऊन चांगले व प्रेरणादायी उपक्रम समाजामध्ये राबविताना दिसून येत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव म्हटला की, डोळ्यासमोर भव्य देखावे, लायटिंग व मंडप असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पूर्वी होतं का हे सगळं? १२६ वर्षांची परंपरा लाभलेला हा उत्सव आहे. यात पण बदल होणे गरजेचे आहे.

प्रत्येक मंडळाने जर ठरविले की भव्य देखावे, लायटिंग व मंडपावर भरपूर खर्च न करता साध्या पद्धतीने सामाजिक संदेश देणारा हा उत्सव झाला पाहिजे. त्यामध्ये लहान मूर्ती आणून त्यासमोर आपल्या संस्कृती व परंपरेचे चालते बोलते देखावे करायचे. या देखाव्यात आपल्या भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध भूमिका घ्याव्यात त्यामुळे त्यांचे स्टेज डेअरिंग वाढेल. ‘एक गाव एक गणपती  त्याचप्रमाणे एक मोहल्ला एक गणपती’ हा उपक्रम राबवावा. मिरवणुकीमध्ये डीजे न लावता ग्रामीण भागातील कलावंतांना बोलून लेझीम, हलगी, ढोल, होलारबाजा, कैकाडी वाद्य, सनई ताशा, दिंडी व त्यासोबतच मर्दानी खेळ ठेवावेत. त्यामधूनच ग्रामीण लोकांना रोजगार मिळेल व शहरातील लोकांना ग्रामीण संस्कृतीचे दर्शन होईल.

मंडळात मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करून त्याचे विसर्जन मोहल्ल्यातच करावे व ती माती परत मूर्तिकाराला परत करावी. या उपायांमुळे आर्थिक भार पण कमी होईल व इतर सामाजिक उपक्रमांसाठी निधी उपलब्ध होईल.

घरात आणि दारात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचे स्वरूप हे पर्यावरणपूरक असणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे.

1. गणेशमूर्ती मातीचीच व आकाराने लहान बसवावी.

2. रोषणाई कमी प्रमाणात करावी.

3. सजावट करताना थर्माकोल, फोम व प्लास्टिकचा वापर न करता नैसर्गिक व पुनर्वापर होणाऱ्या वस्तूंचा वापर करावा.

4. पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे करावेत.

5. विसर्जनाच्या दिवशी मंडपातच पाण्याची टाकी ठेवून मूर्तीचे विसर्जन करावे व माती मूर्तिकाराला परत करावी.

(लेखक अकोल्यातील निसर्गकट्टाचे संस्थापक आहेत.)

 

Web Title: Ganesh Festival 2019 Celebrating Ganeshotsav in an eco-friendly way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.