Ganesh Festival 2019 : मूर्ती विसर्जन पर्यायी कुंडांमध्येच करायला हवे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 09:52 AM2019-09-11T09:52:11+5:302019-09-11T09:52:26+5:30

सजावटीसाठी थर्माकोल व प्लास्टिक नको अशी प्रबोधन चळवळ हळूहळू रुजते आहे.

Ganesh Festival 2019 Immersion of idols must be done in artificial ponds | Ganesh Festival 2019 : मूर्ती विसर्जन पर्यायी कुंडांमध्येच करायला हवे!

Ganesh Festival 2019 : मूर्ती विसर्जन पर्यायी कुंडांमध्येच करायला हवे!

Next

उदय गायकवाड

कोल्हापूर - गणपतीची आराधना करताना पंचमहाभुतांची पूजा आपण करतोच. मात्र, त्याच महाभुतांना आपण प्रदूषित करतो आणि स्वत: वर संकट ओढवून घेतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. उत्सवाच्या निमित्ताने पाण्याचे, हवेचे, आवाजाचे, प्रकाशाचे, जमिनीचे प्रदूषण होते. ही बाब आता आपल्या लक्षात आली आहे. शाडूची लहान मूर्ती वनस्पतीजन्य रंगात रंगवून पूजेसाठी वापरणारा आणि त्याचे घरच्या घरी विसर्जन करणारा मोठा वर्ग कोल्हापूरमध्ये तयार झाला आहे. ३० वर्षे प्रबोधनाची सुरू असलेली चळवळ घट्ट रुजली आहे.

१९८८ पासून निर्माल्य व मूर्ती विसर्जन जलस्रोतांमध्ये न करता ते पर्यायी कुंडांमध्ये करण्याची मानसिकता नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक झाली असल्याचे कोल्हापूरमध्ये दिसून येते. चाळीस लाखांच्या जिल्ह्यात गेल्या वर्षी चार लाख ६७ हजार मूर्ती जलस्रोतांमध्ये विसर्जित न होता पर्यायी व्यवस्थेमध्ये विसर्जित झाल्या, ही खूप मोठी बाब आहे. कोल्हापूरमध्ये मिरवणुकीत गुलाल किंवा रंग वापरला जात नाही. घरगुती पातळीवर काही प्रमाणात फटाके फोडले गेले तरी ते प्रमाण नगण्य आहे. पारंपरिक वाद्य वापरण्याकडे बहुतेक मंडळे गेली आणि त्यांनी आता डॉल्बीला नकार दिला आहे. प्रकाशझोताचा खर्च पाहता काही मंडळे वगळता इतरांनी पाठ फिरवली आहे.

चळवळ रुजतेय

सजावटीसाठी थर्माकोल व प्लास्टिक नको अशी प्रबोधन चळवळ हळूहळू रुजते आहे. नैसर्गिक पाने-फुले, कापड, कागद यांचा वापर करून केलेली सजावट आकर्षक ठरते हे लोकांना पटले आहे.

सृजनशील आविष्कार प्रदर्शित करायला ही उत्तम संधी मानणारा एक युवा वर्ग प्रयत्न करीत आहे. खरे तर ही एक व्यावसायिक संधी म्हणून पाहायला हरकत नाही.

प्लास्टिक नाकारा!

ज्या बाबी आता समजल्या आहेत त्यापेक्षा नव्याने काही मुद्यांवर चर्चा झाली पाहिजे. प्रसाद, महाप्रसादाच्या निमित्ताने प्लास्टिक प्लेट, ग्लास, वाट्या, द्रोण नाकारून धातूचे किंवा वनस्पतींचे साहित्य वापरले पाहिजे.

खाद्यपदार्थ बनवताना आणि विकत घेताना त्यामध्ये रंग हा वनस्पतीजन्य असावा याकडेही लक्ष दिले पाहिजे. या सर्व मुद्यांकडे लक्ष देऊन जल, जमीन, हवा, प्रकाश, अन्न, अग्नी अशा महाभुतांना प्रदूषित न करता साजरा केलेला उत्सव हा खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक असेल.


 

Web Title: Ganesh Festival 2019 Immersion of idols must be done in artificial ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.