Ganesh Festival 2019 : शाडू मातीच्या गणेशमूर्ती खरेदी करताना सजगता दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 12:33 PM2019-09-03T12:33:47+5:302019-09-03T12:35:00+5:30

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडू मातीच्या गणेशमूर्तीचा प्रचार केला जात आहे; पण मुळात आज शाडू माती म्हणून ज्या गणेशमूर्ती विकल्या जातात, ती शाडू मातीच नाही.

Ganesh Festival 2019 : Sale of Modeling Clay as Shadu Soil | Ganesh Festival 2019 : शाडू मातीच्या गणेशमूर्ती खरेदी करताना सजगता दाखवा

Ganesh Festival 2019 : शाडू मातीच्या गणेशमूर्ती खरेदी करताना सजगता दाखवा

googlenewsNext

प्रमोद डवले

औरंगाबाद - पर्यावरणपूरकगणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडू मातीच्या गणेशमूर्तीचा प्रचार केला जात आहे; पण मुळात आज शाडू माती म्हणून ज्या गणेशमूर्ती विकल्या जातात, ती शाडू मातीच नाही. फायर क्ले, मॉडेलिंग क्ले या प्रकारची ती माती आहे. त्यामुळे मूर्ती खरेदी करताना नागरिकांनी सजग होणे गरजचे आहे.

गणपती, देवीच्या मूर्ती तयार करणे हा आमचा यवतमाळच्या डवले कुटुंबियांचा वडिलोपार्जित व्यवसाय. २००६ साली मी औरंगाबादला आल्यावर सगळीकडे करड्या रंगाची मातीच शाडू माती म्हणून ओळखली जाते, ही बाब लक्षात आली. या मातीवर अभ्यास केला. तेव्हा ही शाडू माती नसून यामध्ये जस्त, सिलिका, अ‍ॅल्युमिनियम यांचे प्रमाण आढळले. या मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्ती विसर्जित केलेले पाणी झाडाला टाकले तर त्याचा दुर्गंध येतो. कुंडीतील मातीवर थर बनतो आणि यामुळे झाडाच्या मुळापर्यंत ऑक्सिजन जाणे बंद होते. त्यामुळे करड्या रंगाची ही माती फक्त ‘पुनर्वापर’ करण्यासाठी योग्य आहे. म्हणजे मूर्ती विसर्जित केल्यानंतर तयार होणारी माती गोळा करणे आणि पुढील वर्षी पुन्हा त्याच मातीचा गणपती करून त्याची प्रतिष्ठापना करणे. असे केले तरी पर्यावरणाचे बऱ्यापैकी रक्षण निश्चितच होईल.

पार्थिव गणेश

पूर्वी पार्थिव गणेश स्थापनेची प्रथा होती. ही खरी पर्यावरणपूरक पद्धत होय. यामध्ये तुळशीतील ओल्या मातीपासून तळहातावर मावेल एवढा गणपती बनवायचा आणि त्याची स्थापना करायची. अनेक ठिकाणी मोठी गणेशमूर्ती आणि पार्थिव गणेश दोन्ही बसवले जातात; पण विसर्जन फक्त पार्थिव गणेशाचेच केले जाते.

शाडू माती म्हणजे?

नदीकाठची सुपीक माती म्हणजे खरी शाडू माती होय. औरंगाबाद येथील साताऱ्याच्या डोंगरावरील माती, लाल माती, नदीकाठची माती आणि इतर प्रकारच्या मातींचे मिश्रण बनवून त्यापासून मी गणेशमूर्ती बनवितो. ही माती पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीची असल्यामुळे मी तिला प्रथमांकुर जैविक शाडू असे नाव दिले आहे.

नागरिकांचा प्रचंड उत्साह

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांकडून दाखविला जाणारा उत्साह हा निश्चितच स्तुत्य आहे. पण, केवळ एवढ्यानेच पर्यावरणाचे रक्षण होणार नाही.

(लेखक पर्यावरणप्रेमी मूर्तिकार आहेत)

शब्दांकन : ऋचिका पालोदकर

 

Web Title: Ganesh Festival 2019 : Sale of Modeling Clay as Shadu Soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.