Greenland Global Warming: वेळ निघून गेली, समुद्राची पातळी १ फुटाने वाढणार; मुंबईसह अनेक शहरांना धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 01:48 PM2022-08-30T13:48:04+5:302022-08-30T13:49:23+5:30
आता जरी जगातील उष्णतेचे उत्सर्जन रोखले तरी देखील तुमच्या हाती काहीच राहिलेले नाही, बर्फ वितळणारच, त्याला रोखू शकत नाही
यंदा पावसाळ्यात अद्याप मुंबईची तुंबई झालेली नाहीय. परंतू, आता एक मोठा धोका वाढू लागला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे मोठ्या वेगाने ग्रीनलँडचा बर्फ वितळू लागला आहे. यामुळे शास्त्रज्ञांनी अतिशय निर्वाणीचा इशारा देताना काहीही करा, समुद्राची पाणीपातळी एका फुटाने नक्कीच वाढणार असल्याचे म्हटले आहे.
ग्रीनलँडचा बर्फ वितळल्यामुळे समुद्राची पाणी पातळी कमीतकमी एका फुटाने तरी नक्कीच वाढणार आहे. आज, आता जरी जगातील उष्णतेचे उत्सर्जन रोखले तरी देखील तुमच्या हाती काहीच राहिलेले नाही, बर्फ वितळणारच, त्याला रोखू शकत नाही, असे नेचर क्लायमेटच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या भूगर्भीय सर्वेक्षणाच्या संशोधकांना ग्रीनलँड आणि आसपासच्या बर्फाच्या आच्छादनामध्ये बदल दिसले आहेत. आधीच वितळलेल्या बर्फामुळे त्याच्या खालच्या थराचा ग्रीनलँडचा सुमारे 3.3 टक्के बर्फ कोणत्याही परिस्थितीत वितळणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा वितळलेला बर्फ सुमारे 110 ट्रिलियन टन इतका असेल.
शास्त्रज्ञ जेसन बॉक्स यांच्या मतानुसार कोणत्याही प्रकारच्या हवामानात बर्फ वितळेल आणि समुद्राची पातळी वाढेल. वितळण्याची ही प्रक्रिया किती काळ चालेल हे सांगता येणार नाही. परंतू शतकाच्या अखेरपर्यंत ती सुरु राहिल असा अंदाज त्यांनी या लेखात व्यक्त केला आहे. उष्ण हवेमुळेच नाही तर समुद्राच्या पाण्याची उष्णता देखील वाढल्याने पाण्याखालील बर्फदेखील वितळू लागला आहे. यामुळे हिमकडे कोसळू लागले आहेत.
अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने या वर्षाच्या सुरुवातीला असाच एक अहवाल प्रसिद्ध केला होता. पुढील 30 वर्षांत अमेरिकेच्या किनार्यावरील पाणी 10-12 इंचांनी वाढेल, असे या अहवालात म्हटले होते. भरतीच्या वेळी सर्वाधिक धोका असेल असेही यामध्ये म्हटले होते. यामुळे मुंबईसारखी समुद्रकिनाऱ्यांवरील शहरे धोक्यात येतील असेही यात म्हटले होते.