ऑक्टोबर नाही फेब्रुवारी हिट! भारताने अनुभवला १८७७ नंतरचा सर्वांत उष्ण फेब्रुवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 09:06 AM2023-03-02T09:06:18+5:302023-03-02T09:06:44+5:30
हवामान विभागाने म्हटले आहे की, देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्यापेक्षा जास्त तापमान राहण्याची अपेक्षा आहे, तर दक्षिणी द्वीपकल्प आणि महाराष्ट्राचा काही भाग कठोर हवामान परिस्थितीच्या तडाख्यापासून वाचण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : भारतात १८७७ नंतरचा सर्वांत उष्ण फेब्रुवारी महिना नोंदवला गेला असून, सरासरी कमाल तापमान २९.५४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे, असे हवामान विभागाने मंगळवारी सांगितले.
हवामान विभागाने म्हटले आहे की, देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्यापेक्षा जास्त तापमान राहण्याची अपेक्षा आहे, तर दक्षिणी द्वीपकल्प आणि महाराष्ट्राचा काही भाग कठोर हवामान परिस्थितीच्या तडाख्यापासून वाचण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या हायड्रोमेट आणि ॲग्रोमेट सल्लागार सेवांचे प्रमुख एस.सी. भान म्हणाले की, मार्चमध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता कमी आहे; परंतु एप्रिल आणि मेमध्ये देशातील बहुतेक भागांमध्ये उष्णतेत वाढ होऊ शकते.
एल निनोच्या परिस्थितीचा मान्सून हंगामावर काय परिणाम होईल, याचा अंदाज वर्तवणे खूप घाईचे असल्याचे ते म्हणाले. मान्सूनवर अल निनोच्या प्रभावाचा अंदाज लावण्यासाठी एप्रिल हा चांगला काळ असेल. आम्ही एप्रिलच्या मध्यापर्यंत अंदाज जारी करू, असे ते म्हणाले. देशात यंदा फेब्रुवारी महिन्यात तापमानात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.