निसर्गातील जैवविविधता राखणे काळाची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 10:05 AM2020-05-22T10:05:24+5:302020-05-22T10:10:34+5:30
मानवतेचे भाग्य जीवशास्रीय विविधतेशी जुळलेले आहे. पृथ्वीवरील जीवनातील विविधता, टिकावू विकास आणि मानवी कल्याण यासाठी जैवविविधता आवश्यक आहे. मूलभूत वस्तू आणि इकोसिस्टीम सेवा पुरवित असलेल्या गरिबी कमी करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
-प्रा. डॉ. विक्रम काकुळते
( विभागप्रमुख, प्राणीशास्र विभाग, केटीएचएम कॉलेज, नाशिक)
२२ मे १९९२ रोजी जैवविविधतेच्या अधिवेशनाचा मजकूर केनियाच्या नैरोबी येथे झालेल्या परिषदेत संयुक्त राष्ट्र संघटनेने स्वीकारला. २००१ या वर्षापासून २२ मे हा दिवस वर्धापन दिनानिमित्त ‘आंतरराष्ट्रीय जैविक विविधतेचा दिवस’ म्हणून संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो.’
आपल्याला भविष्यात जैवविविधतेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेविषयी समज वाढविण्यासाठी जागतिक पातळीवर विस्तृत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात पुस्तके, पत्रके व इतर शैक्षणिक स्रोत स्थानिक भाषांमध्ये अनुवादित करणे, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, वर्तमानपत्रे, रेडिओ आणि दूरदर्शनद्वारे जैवविविधतेची माहिती वितरित करणे, विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांसाठी प्रदर्शन व सेमिनारचे आयोजन करणे, पर्यावरणीय समस्यांवरील चित्रपटांचे प्रदर्शन करणे. लुप्तप्राय प्रजाती किंवा अधिवास टिकविण्यासाठी कार्यक्रमांचे सादरीकरण तसेच प्रत्येकाने झाडे लावण्यास पुढाकार घेतला तर आपण निसर्गाचा -हास रोखू शकतो.
दरवर्षी जैवविविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस एका थीमवर लक्ष केंद्रित करतो. मागील वर्षाची थीम ‘आमची जैवविविधता आमचे अन्न व आपले आरोग्य’ अशी होती. तर यावर्षाची थीम ‘आमचे निराकरण निसर्गात आहे’ अशी आहे. प्रत्येक वर्षी थीम प्रतिबिंबित करण्यासाठी कलाकृतीचा एक भाग तयार केला जातो. उदा. तीन हिरवी पाने असलेल्या डहाळ किंवा फांदीची एक शैलीकृत प्रतिमा - आंतरराष्ट्रीय कला दिनातील जैविक विविधतेच्या विविध पैलूंसाठी या कलाकृतीचा तपशील प्रतीक म्हणून वापरला जातो.
मानवतेचे भाग्य जीवशास्रीय विविधतेशी जुळलेले आहे. पृथ्वीवरील जीवनातील विविधता, टिकावू विकास आणि मानवी कल्याण यासाठी जैवविविधता आवश्यक आहे. मूलभूत वस्तू आणि इकोसिस्टीम सेवा पुरवित असलेल्या गरिबी कमी करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. माणसाने शेतीचा, अग्निचा शोध लावला आणि त्याचा आहार आणि त्याबरोबरच सगळी मानवी संस्कृती बदलत गेली. त्याअर्थी निसर्ग देत होता तेच सेवन करत होता. त्यामुळे अन्नाच्या गरजेचे नैसर्गिक तत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे.
निसर्ग-पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पाच तत्त्वांनी बनलेली सृष्टी सर्व जीवसृष्टीला त्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे काल, देश, हवामानातील कमीअधिक चढउतार याला धरून अन्न म्हणजे जगण्याकरिता लागणारा किमान आहार विविध स्वरूपात देत आहे. मनुष्येतर जीवसृष्टी प्राणी व वनस्पती जीव सांभाळून घेत आपले अन्न मिळवताना दिसतात. पक्षी थंडी सहन होईनाशी झाली किंवा भक्ष्य मिळेनासे झाले की, हजारो मैल स्थलांतर दरवर्षी नियमित करताना दिसतात. ‘दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम’ याप्रमाणे निसर्ग जन्माला घातलेल्या जीवसृष्टीला त्यांचे खाद्य देतच असतो. कमी-अधिक पावसाच्या प्रदेशात सूर्यप्रकाश वेगवेगळा असताना वनस्पतीची अन्न, पाणी, जीवनरस व सूर्यप्रकाश मिळविण्याकरिता चालविलेली स्पर्धा जमिनीखालील व जमिनीवर आपण नेहमीच पाहतो.
मानवाच्या बाबतीत अन्नदाता म्हणून निसर्गाचा विचार करावयाचा झाल्यास पहिल्या मानवाला ज्या क्षणी भुकेची जाणीव झाली असेल त्याचवेळेस त्याच्या समोर त्याच्या अगोदर कदाचित शेकडो वर्षे जन्म घेतलेल्या झाडांना रसरसलेली फळे लटकत असतील. भूक लागल्याबरोबर त्या मानवाला त्याच निसर्गाने फळ खाण्याची प्रेरणा दिली असेल. याचप्रकारे, समोर फळ उपलब्ध नसताना मानवाच्या तुलनेने अत्यंत लहान असा एखादा जीव किंवा प्राणीजात त्याच्या समोर वळवळताना किंवा जिवंत दिसत असल्यास त्याला मारण्याची, खाण्याची किंवा गिळून टाकण्याची प्रेरणा निसर्गाने त्याक्षणी दिली असावी.
ज्या निसर्गाने, सृष्टी निर्मात्याने माणसाला जन्माला घातले, त्याने त्या माणसाची भूक जशी उत्पन्न केली त्याचप्रमाणे त्या भूकेकरिता अन्नाचीही योजना केलेली आहे. आपण गेले काही हजार वर्षांचा विचार करताना असे लक्षात येईल की, अन्नदाता निसर्ग आहे. शंभर वर्षांपूर्वी ज्याप्रकारे पृथ्वीच्या विविध भागात पाऊस, पाणी पडत होते, वारे वाहात होते, थंडी पडत होती, कडाक्याचे ऊन, बर्फ पडत होते त्याचप्रकारे आजही सृष्टीक्रम सुरू आहे. पण महाप्रचंड बदल मानव, त्याची राहणी, त्याची भूक, निसर्गाकडून अपेक्षा यात मोठा बदल झालेला दिसत आहे. जगाच्या सर्व भागात त्या त्या परिस्थितीप्रमाणे त्या त्या देशातील, प्रांतातील प्रजेला त्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे निसर्ग अन्न देत होता. एस्कीमोच्या प्रदेशात रेनडिअर, तिबेटमध्ये याक, आफ्रिकेच्या जंगलात सिंह, हरीण व इतर प्राणी, आॅस्ट्रेलियात कांगारू, रशियात डुक्कर तसेच विविध प्रकारचे निसर्गाकडून जसे मिळेल तसा मानव सृष्टीचा चरितार्थ चालत होता. आधुनिक आहारशास्रात प्रोटिन्स, कार्बोदके, फॅट, स्टार्च, सॉल्ट असा आहार किंवा असे अन्न माणसाला हवे. म्हणजेच संतुलित आहार हवा. निसर्ग मानवाला आज जसे विविध प्रकारचे अन्न देत आहे, तसेच त्या वेळेसही देत होता. पण त्या वेळेस तुलनेने माणसांची, पशूंची संख्या कमी होती. आज मानवाची भूक वाढलेली आहे. उपभोगाची भूक कॅलरीच्या हिशेबात मोठ्या अभिमानाने सांगितली जाते. अन्न व मानवी जीवनाची गरज यात समतोलपणा राखण्याची नितांत गरज आहे. आज आपण आपल्या गरजेप्रमाणे अन्न मिळविण्याकरिता जे करतो आहे ते या भूमीवर अत्याचार करण्यासारखे आहे. आज आपण टिश्यू कल्चरच्या मागे लागत आहोत. निसर्गापेक्षा किंवा ब्रह्मदेवांपेक्षा मानव मोठा होऊ पाहत आहे. निसर्गाचा समतोलपणा बिघडवून आपल्या फाजील गरजा भागविण्यासाठी जमिनीवर खूप भार द्यावयास लागलो की, आपणास नको असलेले कीटक, विषाणू, व्हायरस यांना जन्म देणार आहोत हे लक्षात ठेवावयास हवे.
जंगलातील पशु-पक्षी व अन्य कीटक यांना निसर्ग त्यांच्या गरजेप्रमाणे अन्न देत असतो. त्यासाठी त्या प्राण्यांची काळजी, रक्षण निसर्गच करतो. आजच्या मानवाला आहाराबरोबर इतर चैन याचा विचार करावा लागतो. हे करीत असताना निसर्ग ºहास पावत आहे. याचा विचार फारच थोडे लोक करत आहेत.
आजचे मानवी जीवन धकाधकीचे, प्रदूषणाचे, मानसिक ताण-तणावाचे, नवनवीन रोगाचे आपणच निर्माण केले आहे. आपणच प्रश्न निर्माण करावयाचे व ते सोडविण्यासाठी निसर्गाला वेठीस धरावयाचे. आम्ही फक्त खाण्यापुरताच विचार करून चाललो आहोत. मानवी शरीर ही नुसती केमिकल लॅबोरेटरी आहे. ती चालू ठेवण्यासाठी काहीना काही खाद्य आपण बॉडीला भरवत आहोत. पण हीच खाद्य ज्या निसर्ग नियमाने तयार झाली आहेत त्याचा विचार आपण करताना दिसत आहे.
पृथ्वीच्या पाठीवर साधारणत: दोन अब्ज लोकांचे जीवनमान वनांवर अवलंबून आहे. ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल यासारख्या समस्येला आळा घालण्यासाठी तसेच उड2 शोषून ड2 पुरविण्याचे काम वनसंपता करीत आहे. निसर्ग व पर्यावरणाच्या बाबतीत भारत अतिशय समृद्ध आहे. बहुविध प्रकारच्या वनस्पती, पक्षी आणि प्राणी यांनी संपन्न अशी जैविक विविधता भारतासाठी मोलाची ठरली आहे.
जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते. परिसरातील होणाºया बदलामुळे सजीव लुप्त होत आहेत. साडेसहा कोटी वर्षापूर्वी झालेला क्रिटेशियस ह्या काळातील जैवविविधतेचा नाश तेच मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्याने जैवविविधतेचा नाश होत आहे. संयुक्त राष्टÑसंघाने जैवविविधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी २०११ ते २०२० हे दशक जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले होते. पूर्वी घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फळांची व फुलांची झाडे लावली जायची. जेणेकरून त्यावर पक्षी, फुलपाखरे बागडतील; पण सध्याच्या स्थितीत सगळीकडे काँक्रीटीकरण वाढलेले आहे. त्यामुळे आजूबाजूला जास्त परिसरच नाही. जेवढा आहे त्यात शोची झाडे लावली जातात. असं जर होत राहिले तर फुलपाखरांनी कुठं जायचे, मध कुठे तयार करायचं. ज्या ज्या ठिकाणी निसर्गाशी छेडछाड करण्यात आली त्या त्या ठिकाणी निसर्गाने आपल्या पद्धतीने उत्तर दिले आहे.
पृथ्वीवर सर्वच सजीवांमध्ये संतुलन ठेवण्याचे काम निसर्गच करतो. निसर्गाचे संतुलन बिघडवण्याचे काम करणारे यांनी विचार करायला हवा. हा नियम मानवी शरीरालादेखील लागू आहे. मानवाकडे विवेक आहे. यासाठी मनुष्य भविष्याचा वेध घेत चांगले-वाईट याचा विचार करण्याची शक्ती मानवाकडे आहे. अलौकिक शक्तीचा हस्तक्षेप सगळीकडे असतो. मात्र विवेकाने विचार करणा-या सजीवांमध्ये, मनुष्यांमध्ये तिचा हस्तक्षेप मर्यादित आहे. आपले शरीर, आयुष्य व निसर्ग नियम यांचे संतुलन राखले पाहिजे.