साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास; पिवळा धोबी करमाळा तालुक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 10:39 PM2020-01-08T22:39:31+5:302020-01-08T22:42:30+5:30

उम्रड परिसरात विद्यार्थ्यांनी केली देशी-विदेशी ५७ पक्ष्यांची नोंद

A journey of one and a half thousand kilometers; Yellow Dhobi in Karmala taluka | साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास; पिवळा धोबी करमाळा तालुक्यात

साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास; पिवळा धोबी करमाळा तालुक्यात

Next

- नासीर कबीर

करमाळा : तब्बल साडेचार हजार किलोमीटरचे अंतर पार करून आलेला पिवळा धोबी आणि दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून करमाळा तालुक्यात आगमन झालेला पांढरा धोबी अशा देशी-विदेशी पक्ष्यांचे उम्रड परिसरात विद्यार्थ्यांनी निरीक्षण केले. दोन किलोमीटरच्या परिक्षेत्रात अशा ५७ पक्ष्यांची नोंद यावेळी करण्यात आली.

पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन पुरस्कृत पर्यावरण सेवा योजना वामनराव बदे विद्यालयात गेल्या सहा वर्षांपासून असा उपक्रम राबविला जात आहे. योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पर्यावरणातील विविध घटकांबद्दल सजग व संवेदनशील बनवून पर्यावरण संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच भाग म्हणून पक्षीनिरीक्षणाचा उपक्रम राबविण्यात आला. आपल्या परिसरात असणारे पक्षी व त्यांचे महत्त्व या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी समजावून घेतले.

पक्षीनिरीक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी दोन किमीचा अंतर निश्चित करून पक्ष्यांचे निरीक्षण व नोंदी केल्या. या निरीक्षणामध्ये विद्यार्थ्यांनी ५७ प्रकारच्या स्थानिक व विदेशी पक्ष्यांची नोंद विद्यार्थ्यांनी केली. यामध्ये हळद्या, शिंपी, नाचरा, लालबुड्या बुलबुल, वेडा राघू याचबरोबर स्थलांतरित भोरडी, राखी बगळा, मोठा बगळा, चिकना कुदळ्या, पांढरा शराटी, नदी सुरय, हिवाळी सुरय, थापट्या बदक, राखी बदक, काळटोप कुरव अशा पक्ष्यांची नोंद विद्यार्थ्यांनी केली.

हा उपक्रम पर्यावरण सेवा योजनेचे विभाग समन्वयक गणेश सातव यांच्या मार्गदर्शनखाली राबविण्यात आला. यामध्ये गणेश सातव यांनी माणसांच्या सहवासात राहणारे पक्षी, शेती शिवारात आढळणारे पक्षी, गवताळ कुरणामध्ये व पाणथळ जागेमध्ये आढळणाºया पक्ष्यांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. पक्ष्यांचे निरीक्षण व नोंदी करण्याबद्दलही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  या उपक्रमात बदे विद्यालयातील इयत्ता आठवीचे विद्यार्थी, योजना प्रमुख संपत मारकड, महेश बदे व महावीर जगताप यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यालयाचे मुख्याध्यापक संपत कोठावळे, सहशिक्षकांचे उपक्रमास सहकार्य मिळाले.

ऑस्प्रे शिकारी पक्ष्याची प्रथमच नोंद

४ऑस्प्रे या शिकारी पक्ष्याची नोंद प्रथमच उमरड परिसरात करण्यात आली. हा पक्षी हिवाळ्यात स्थलांतरित करणारा पक्षी आहे. आपल्याकडे हा पक्षी अभावानेच दिसतो. हा एक विश्वव्यापी पक्षी असून, याचे प्रजनन युरोपमधील भौगोलिक परिस्थितीमध्ये होते. मासे हे त्याचे आवडते खाद्य आहे.
४या वेळेस चार ते साडेचार हजार किमीचा प्रवास करून आलेला पिवळा परीट व दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून आलेला पांढरा परीट या पक्ष्यांची नोंद विद्यार्थ्यांनी केली. या वेळेस योजनेंतर्गत उच्च प्रतीच्या दुर्बिणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

Web Title: A journey of one and a half thousand kilometers; Yellow Dhobi in Karmala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.