खाम ‘नदी’ उरली केवळ ‘ओपन ड्रेनेजलाईन’ म्हणून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:42 PM2019-12-13T12:42:17+5:302019-12-13T12:45:57+5:30

निर्धोक सांडपाणी येत असल्याने खाम नदी सांडपाणी वाहून नेणारा बनला नाला बनली आहे

The Kham 'river' is left only as 'open drainage line' in Aurangabad | खाम ‘नदी’ उरली केवळ ‘ओपन ड्रेनेजलाईन’ म्हणून

खाम ‘नदी’ उरली केवळ ‘ओपन ड्रेनेजलाईन’ म्हणून

googlenewsNext
ठळक मुद्देसांडपाण्याने घोटला खाम नदीचा गळा१७ लाख - औरंगाबाद शहराची सध्याची लोकसंख्या २५० एमएलडी (दलघमी) पाण्याची रोज गरज१४० एमएलडी पाण्याचा पुरवठा११० एमएलडी दररोज सांडपाणी निर्मिती

- ऋचिका पालोदकर

औरंगाबाद : मैलायुक्त सांडपाणी, कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी या सर्वांमुळे औरंगाबाद शहर ज्या नदीच्या काठावर वसले आहे ती खाम ‘नदी’ केवळ एक गटार, नाला किंवा ‘ओपन ड्रेनेजलाईन’ म्हणून उरली आहे. यामुळे नदीमध्ये एकेकाळी स्वच्छंदपणे फिरणारे मासे, विविध वनस्पतींचे सौंदर्यही नामशेष झाले असून, शहराच्या सांडपाण्याने जणू खाम नदीचा गळा घोटला आहे.

शहराची सध्याची लोकसंख्या १७ लाखांच्या आसपास आहे. येथील नागरिकांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी दररोज २५० एमएलडी (दक्षलक्ष घनमीटर) पाणी लागते. यापैकी १४० एमएलडी पाण्याचा पुरवठा शहराला जायकवाडी धरणातून केला जातो. शहरातून दररोज अंदाजे ११० एमएलडी सांडपाण्याची निर्मिती होते. सांडपाण्याची आवक आणि प्रकिया करणाऱ्या यंत्रांची क्षमता यात मोठी तफावत आहे. झाल्टा आणि सलीम अली सरोवर येथे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा पूर्णपणे अकार्यक्षम आहे. मलिक अंबर यांनी त्याकाळी जलव्यवस्थापनात निर्माण केलेले स्वच्छ पाण्याचे खंदक आता सांडपाणी वाहून नेणारे नाले बनले आहेत. पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत शहराचे सांडपाणी विभागले जाते. पूर्वेकडचे पाणी नाल्यांमधून सुकना नदीला मिळते. पुढे दुधनेला आणि तेथून ते गोदावरीला मिळते.

त्याचप्रमाणे पश्चिम भागातील सांडपाणी खाम नदीद्वारे जोगेश्वरी गावाजवळ गोदावरीला मिळते. तेथून खाली अवघ्या २२ ते २३ किलोमीटर अंतरावरून हे पाणी नदीलगतच्या गावातील लोकांकडून वापरले जाते. पैठण, जालना, औरंगाबाद या मोठ्या शहरांव्यतिरिक्त जवळपास २५० पेक्षाही अधिक गावे शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी गोदावरीवर अवलंबून आहेत. शहरातील सलीम अली सरोवर येथेही त्या भागातील काही वॉर्डांतील सांडपाणी मिसळले जाते. हे पाणी प्रक्रिया करून सोडले जाते, असा प्रशासनाचा दावा असला तरी अत्यंत कमी क्षमता असणाऱ्या या प्रकल्पातून काय गुणवत्तेचे सांडपाणी निर्माण होत असेल, याबाबत पर्यावरणप्रेमींमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

सांडपाण्यातून उत्पन्न 
प्रक्रिया केलेले सांडपाणी रस्ते कामासाठी वापरले जाते. सध्या शहराजवळ सुरू असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामासाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा उपयोग केला जात आहे. 6-8 महिन्यांत औरंगाबाद महानगरपालिकेला १५ ते १८ लाख रुपयांचा नफा होतो. प्रक्रिया केलेले उर्वरित सांडपाणी नक्षत्रवाडी परिसरातील नाल्यामध्ये सोडले जाते. तेथून पुढे ते गोदावरीला मिळते.

यापेक्षा सेप्टिक टँक बरे
सध्या वापरण्यात येणाऱ्या ड्रेनेज पद्धतीपेक्षा पूर्वीची सेप्टिक टँकची पद्धत योग्य होती, असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्या पद्धतीमध्ये निदान प्रत्येक घरात निर्माण होणारा मैला थेट कोणत्याही नदीत मिसळला जात नव्हता. घराखालच्या खड्ड्यात तो जमा व्हायचा, प्रसंगी शेतकऱ्यांकडून तो खत म्हणूनही नेला जायचा. त्यामुळे ती पद्धत अधिक पर्यावरणपूरकही होती.
- विजय दिवाण, पर्यावरणतज्ज्ञ

जैवविविधतेवर परिणाम 
सलीम अली सरोवरात अनेक कमळे उमललेली दिसायची. प्रदूषणामुळे येथे कमळे फुलणे बंद झाले आहे. आता तेथे केवळ जलपर्णी आहेत. सूक्ष्म स्तरावर तर बदल झाले आहेत. अनेक जाती नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे जैवसाखळीवरही परिणाम झाला आहे. रोटीफर हा एक प्राणी प्लवक आहे. तो या सरोवरात मोठ्या प्रमाणावर आढळतो. पर्यावरणाच्या दृष्टीने ते हानिकारक आहे. 
- प्रा. क्षमा खोब्रागडे, पर्यावरणतज्ज्ञ

Web Title: The Kham 'river' is left only as 'open drainage line' in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.