World Environment Day: तनमोर व माळढोक संवर्धनासाठी अखेरची हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 01:04 AM2020-06-05T01:04:35+5:302020-06-05T01:04:48+5:30

राजस्थान व गुजरात राज्यांमधील खाजगी व महसुली जमिनींवरील गवती माळरानांची ‘पडीत’ अशी अवहेलना करून त्यावर आता सौर प्रकल्प येऊ पाहत आहेत.

Last call for Tanmor and Maldhok conservation | World Environment Day: तनमोर व माळढोक संवर्धनासाठी अखेरची हाक

World Environment Day: तनमोर व माळढोक संवर्धनासाठी अखेरची हाक

googlenewsNext

जागतिक पर्यावरणदिनी देशातील गवती माळराने अखेरच्या घटका मोजत आहेत. समृद्ध गवती माळरानांचे प्रतीक समजले जाणारे तनमोर व माळढोक हे पक्षी आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. साधारण दीडशेच्या घरात उरलेले माळढोक पक्षी व ७०० च्या आसपास असलेले तनमोर संपायला किती महिने लागतील, हे मोजणे आता सुरु झाले आहे. भारताने या शतकात काय गमाविले याच्या यादीत स्थान पटकाविण्यास या दोन पक्षी प्रजाती आता सज्ज आहेत. त्यांच्या गवती माळरानांच्या संवर्धनासाठी तातडीने योजना आखली तरच या पक्षी प्रजाती नामशेष होण्यापासून वाचू शकणार आहेत.


राजस्थान व गुजरात राज्यांमधील खाजगी व महसुली जमिनींवरील गवती माळरानांची ‘पडीत’ अशी अवहेलना करून त्यावर आता सौर प्रकल्प येऊ पाहत आहेत. या माळरानांवर उभारलेल्या विद्युत वाहिन्यांना धडकून आकाराने ड्रोनपेक्षाही मोठे असणारे अनेक माळढोक पक्षी मृत्युमुखी पडले आहेत. महत्त्वपूर्ण माळरानांवरील या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे किंवा बाहेरून वळविणे सहज शक्य आहे. या माळरानांवर किंवा आसपास अनिर्बंध गुरेचराई, कीटकनाशकांचा अति वापर, भटकी कुत्री, शेतीसाठी होणारी अतिक्रमणे यापासून या अधिवासांना वाचविणे मंगळावर स्वारी करणाºया माणसासाठी अशक्य मुळीच नाही. अशा उपाययोजना झाल्यास त्यांचे प्रजनन केल्यानंतर तयार होणाºया माळढोक संख्येस खुले सोडता येणार आहे, हे ध्यानात घेऊन केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. ही भारतासाठी शेवटची संधी असणार आहे.    

-केदार गोरे,
संचालक, कोर्बेट फाऊंडेशन व माळरानांवरील पक्ष्यांचे संरक्षक

Web Title: Last call for Tanmor and Maldhok conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.