महाराष्ट्र निसर्ग उद्यानात १२५ पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 09:27 AM2019-11-09T09:27:09+5:302019-11-09T09:34:16+5:30
महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्थेमध्ये ९० प्रजातींचे स्थानिक पक्षी व ३५ प्रजातींचे स्थलांतरित पक्षी आढळतात.
मुंबई - सातत्याने उठणारी धूळधाण, एकावर एक उभे राहणारे इमारतींचे इमले, जिकडे नजर जाईल तिकडे निर्माण होणारे प्रकल्पच प्रक्लप, ध्वनी आणि वायुप्रदूषणात हरविलेली मुंबई; आणि या साऱ्यात पक्ष्यांच्या अधिवासांना पोचणारा धोका लक्षात घेता पक्षी मुंबईकडे फिरकणारदेखील नाहीत, अशी अवस्था आहे. मात्र तरीही स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांना मायेची ऊब, हक्काचे घर देणारे एक ठिकाण मायानगरी मुंबापुरीत आहे; ते म्हणजे माहिम येथील ‘महाराष्ट्र निसर्ग उद्यान’. या उद्यानात आजमितीस तब्बल स्थानिक आणि स्थलांतरित अशा १२५ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद आहे.
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्र निसर्ग उद्यानासारखा हरित पट्टा तयार करून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पक्षांच्या संवर्धनास हातभार लावला आहे. उद्यानातील अनुकूल वातावरणामुळे शहरी तसेच स्थलांतरित पक्षांची ही हक्काची अधिवासाची जागा बनली आहे.
एका बाजूला मिठी नदीचा परिसर आणि दुसऱ्या बाजूला गजबजलेले शहरीकरण, यांच्या मध्यभागी असलेल्या या उद्यानात १२५ पेक्षा जास्त पक्षांच्या प्रजाती आढळतात. त्या जवळजवळ भारतात सापडणाºया एकूण प्रजातींच्या १० टक्के आहेत. त्यामध्ये स्थलांतरित पक्षांचादेखील समावेश आहे. कीटकनाशक, स्वछताकर्मी तसेच फळे खाणाºया पक्षांचा उद्यानात वावर आढळतो. त्याचप्रमाणे असामान्य प्रजातींचीदेखील येथे नोंद आहे.
महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्थेमध्ये ९० प्रजातींचे स्थानिक पक्षी व ३५ प्रजातींचे स्थलांतरित पक्षी आढळतात. उद्यानात चार प्रकारचे अधिवास पक्ष्यांसाठी उपलब्ध आहेत- पाणथळ, खाडी आणि कांदळवन, जंगल व दलदल. पाणथळ भागात खंड्या, ढोकरी, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, अडई, छोटा पाणकावळा. खाडी-कांदळवन आणि दलदल भागात सामान्य तुतारी, ठिपकेवाली तुतारी, शेकाट्या, सामान्य तिलवा, काळ्या शेपटीचा पानटीवला. जंगल भागात भारतीय स्वर्गीय नर्तक, पांढऱ्या कंठाची नाचण, शिंपी, राखी कोतवाल आणि भारद्वाज हे पक्षी आढळून येतात.
उद्यानातील आकर्षण
टिकेलची निळी माशिमार, हुदहुद, मोठ्या ठिपक्यांचा गरुड, भारतीय स्वर्गीय नर्तकमलबारी राखी धनेश पक्षी.
उद्यानात सहसा आढळून येणारे पक्षी : कोकीळ, भारद्वाज, तांबट, घार, गायबगळा, साळुंकी, छोटा पानकावळा, ढोकरी, कंठवाला पोपट, लालबुड्या बुलबुल, खंड्या, जांभळा सूर्यपक्षी.
जैवविविधतेची हानी
अधिवासावर झालेले आक्रमण, नव्याने प्रचलित झालेल्या प्रजातींचे अतिक्रमण, प्रदूषण, जागतिक स्तरावरील हवामानात होणारे बदल, प्रजातींचे अतिशोषण, वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासातील मानवी हस्तक्षेप आदींमुळे जैवविविधतेची हानी होत आहे. यामुळे येत्या २५ वर्षांत पृथ्वीवरील प्रजातींपैकी २ ते ८ टक्के प्रजाती नामशेष होतील, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केल्याचे माहिम येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाने केलेल्या अभ्यासात यापूर्वीच नमूद करण्यात आले आहे.
परिसंस्थांचे क्षेत्र कमी
वाढत्या लोकसंख्येमुळे वने, गवताळ प्रदेश, कुरणे, पाणथळ प्रदेशांचे रूपांतर शेत जमीन व वसाहतींमध्ये वेगाने होत आहे. परिणामी, परिसंस्थांचे क्षेत्र कमी होत असून, प्रजातींच्या संगठनेत बदल होतो आहे.
कर्नाळ्यातील पक्ष्यांनी घेतला मोकळा श्वासhttps://t.co/S4D8B81f3a#environment#environmental#birds
— Lokmat (@MiLOKMAT) November 6, 2019
प्रकल्प जंगलांच्या मुळावर
विकास प्रकल्पांमुळे वने, जंगले नष्ट होत असून, १९५१ ते १९८० या काळात देशात अंदाजे ५ लाख हेक्टर वनक्षेत्राचे रूपांतर नदी प्रकल्पांत करण्यात आले. परिणामी, वनक्षेत्रे पाण्याखाली गेली. नदीच्या पाणलोट क्षेत्रापैकी ६० टक्के क्षेत्र खंडित झाले आहे.
महाराष्ट्र निसर्ग उद्यानात १२५ पेक्षा जास्त पक्षांच्या प्रजाती आढळतात. त्या जवळजवळ भारतात सापडणाऱ्या एकूण प्रजातींच्या १० टक्के आहेत. त्यामध्ये स्थलांतरित पक्षांचादेखील समावेश आहे.
- युवराज पाटील, साहाय्यक कार्यक्रम अधिकारी, महाराष्ट्र निसर्ग उद्यान, माहिम
सोलापुरातील अभयारण्याला माळढोकची प्रतीक्षा!https://t.co/56r7O2sLc3#birds#environment
— Lokmat (@MiLOKMAT) November 6, 2019