मायणीला पक्षी अभयारण्याचा दर्जाच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 04:51 AM2019-11-07T04:51:06+5:302019-11-07T04:51:18+5:30

आश्रयस्थानांच्या संरक्षणाची गरज : मानवी हस्तक्षेपामुळे सातारा जिल्ह्यातील परिसराकडे परदेशी पाहुण्यांची पाठ

Mainee has no status for bird sanctuary! | मायणीला पक्षी अभयारण्याचा दर्जाच नाही!

मायणीला पक्षी अभयारण्याचा दर्जाच नाही!

googlenewsNext

प्रगती जाधव-पाटील।

सातारा : मायणीला अभयारण्याचा दर्जा कधी नव्हताच व नाही! त्यामुळे एक वनपाल व एक वनरक्षक जाता-येता मायणी तलावावर लक्ष ठेवून असतात; हेच संरक्षण आणि इतकंच संवर्धन! सातारा जिल्हा प्रशासन (जिल्हाधिकारी कार्यालय) व सातारा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर मात्र ‘मायणी पक्षी अभयारण्य’ असाच उल्लेख आढळतो. फ्लेमिंगोसह शेकडो परदेशी पाहुण्यांचा अधिवास असणारा मायणी परिसर दुर्लक्षितच राहिला. म्हणूनच की काय आज मायणीकडे या परदेशी पाहुण्यांनी पाठ फिरवली आहे.
सातारा जिल्ह्यातील मायणी (ता. खटाव) तलाव परिसराचा उल्लेख सर्रास ‘मायणी पक्षी अभयारण्य’ असाच केला जातो. मायणीला अभयारण्याचा दर्जा कधीच नव्हता व आजही नाही. ते अभयारण्य असल्याची कोणतीही नोंद अभिलेखावर आढळत नाही, असा खुलासा वन विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

मायणी येथे चाँद नदीवर तलाव बांधण्यात आला आहे. या ब्रिटिशकालीन तलावामुळे सांगली-सातारा जिल्ह्यांतील शेकडो एकर क्षेत्र ओलिताखाली आले. तलाव परिसराचा कालांतराने मायणी पक्षी अभयारण्य, असा लौकिक झाला. या कथित अभयारण्यास इंदिरा गांधी यांचे नाव देण्यात आल्याची वदंता आहे. यासंदर्भात सातारा वन विभागाच्या कार्यालयात शोध घेतला असता ‘मायणी पक्षी अभयारण्य’ असल्याचे सांगणारा एकही कागदोपत्री पुरावा आढळला नाही. वनपाल व वनरक्षक अशा दोघांच्या भरवशावर सध्या मायणी व परिसरातील शेकडो हेक्टर वनसंपदा आहे.

मायणी तलावातील वाढत्या मानवी हस्तक्षेपाबाबत बोलताना साताऱ्यातील वन्यजीवरक्षक सुनील भोईटे म्हणाले, ‘मायणीत गाळाचे बेसुमार उत्खनन झाले. विटा व इतर कारणांसाठी या तलावातील गाळाची माती काढली गेली. वेडीबाभूळ व बेशरम या वनस्पतींच्या अतिक्रमणामुळे पक्ष्यांना बसण्यासाठी जागा कमी पडू लागली. उथळ पाण्यामध्ये उंचवट्यांवर सुरक्षित ठिकाणी हे पक्षी बसतात. उत्खननामुळे या पक्ष्यांची आश्रयस्थाने धोक्यात आली. बेशरम वनस्पती व खोल पाण्यामुळे या पक्ष्यांची अन्नसाखळी धोक्यात आली आहे.’

पक्षी सप्ताह विशेष
1. अभयारण्याचा कोणताही वैधानिक दर्जा नसल्याने पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या या निसर्गस्थळाचे संवर्धन व संगोपनासाठी शासनाकडून कोणत्याही विशेष निधीची तरतूद नाही, तसेच विशेष लक्षही दिले जात नाही.

2. युरेशियन डक, कॉमनकुट (वारकरी), पेन्टेड स्टार्क, नॉदर्न शावलर (थापट्या बदक), तसेच भारतीय पाणपक्ष्यांमध्ये अडई, टिबुकली, विविध करकोचे, शेराटी, पाणकावळा, तुतारी, नदीसुरय, कांडे, करकुचे, चक्रवाक, सारंग तसेच पर्यटकांचे खास आकर्षण असणारा फ्लेमिंगो (रोहित पक्षी), अशा विविध देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन येथे होत होते. हा संपूर्ण परिसर पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून जात असे. गेल्या काही वर्षांमध्ये मायणी तलावाकडे परदेशी पाहुण्यांनी पाठ फिरवली आहे

मायणी वनक्षेत्र विशेष संरक्षित झाल्यास त्याला शासनाकडून स्वतंत्र निधी, अधिक मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकेल. शिवाय मायणी तलाव व परिसराच्या शाश्वत विकासासाठी शासन निर्देश देते. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांचे हे आश्रयस्थान त्यांच्यासाठी अधिक सुरक्षित होईल.
- डॉ. भारतसिंह हाडा, उपवनसंरक्षक, सातारा

राजे-रजवाड्यांच्या काळात शिकारीसाठी जंगलं राखून ठेवली जायची. पक्ष्यांच्या शिकारीसाठी मायणी हे त्यापैकीच एक राखीव क्षेत्र आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय वन कायदा लागू झाला. त्यानुसार ही सर्वच जंगलं आपोआप संरक्षित झाली. मात्र, मायणीची नाममात्र का होईना अधिसूचना निघाली नाही; जी होणे गरजेचे होते. - अजित (पापा) पाटील, मानद वन्यजीवरक्षक, सांगली

Web Title: Mainee has no status for bird sanctuary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.