विदेशी पक्ष्यांच्या किलबिलाटाने पाणवठे बहरले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 02:50 PM2020-01-03T14:50:03+5:302020-01-03T15:03:21+5:30

देशी-विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांच्या किलबिलाटाने जिल्हाभरातील सर्वच पाठवठे बहरले आहेत.

Migratory birds flock to jalgaon | विदेशी पक्ष्यांच्या किलबिलाटाने पाणवठे बहरले

विदेशी पक्ष्यांच्या किलबिलाटाने पाणवठे बहरले

googlenewsNext

जळगाव -  यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या भरभरून वाहत आहेत. त्यामुळेच गिरणा नदी, वाघूर, हतनूर धरणासह मेहरूण, मुक्ताई भवानी, हरताळा तलावावर देशी-विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांच्या किलबिलाटाने जिल्हाभरातील सर्वच पाठवठे बहरले आहेत. तसेच वातावरणात बदल होऊन थंडीत वाढ होत आहे. त्यामुळे थंडीत स्थलांतर करणारे विविध पाहुण्या पक्ष्यांनी हजेरी लावायला सुरुवात झाली आहे. 

जिल्ह्यातील वाघुर, हतनूर धरण, मेहरूण तलाव यासह गिरणा नदीपात्रात ब्राह्मणी बदकांसह विविध पक्षी हळू हळू दाखल होत आहेत. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पक्षी निरीक्षकांनी नुकत्याच केलेल्या पाहणीत विविध प्रजातींचे पक्षी कमी अधिक संख्येने जलाशयांवर आढळल्याची माहिती मिळाली आहे. यंदा सर्वच धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने दलदलीचा अधिवास कमी असल्याचे पक्षी अभ्यासक प्रसाद सोनवणे यांनी सांगितले. गिरणा नदी पात्रात यंदा मुबलक पाणी असल्याने याठिकाणी देखील शेकाटे, करकोचे, वारकरी, सँडपायपर, चिखल्या, लाजरी पाणकोंबडी, नदी सुरय, डॅपचिक, थापट्या , लहान पाणकावळे, मोठे पाणकावळे, या सारखे पक्षी विहार करताना आढळून येत आहेत. शहरातील मेहरूण तलावात देखील अनेक देश विदेशी स्थलांतरीत पक्षी दाखल झाले आहेत. 

गेल्या वर्षाच्या तुलनेत थोडी संख्या कमी आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे तलावात पाणी जास्त असल्याने अन्न मिळविण्यास अडचणी येतात. त्यामुळे ज्या ठिकाणी उथळ पाणी आहे. त्याच ठिकाणी पक्ष्यांचा अधिवास वाढला आहे. 

हतनूर, वाघूर धरण परिसरात पक्षीमित्रांची निरीक्षणासाठी गर्दी

वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी जिल्ह्यातील हतनूर आणि वाघूर धरण परिसरात तीन दिवस केलेल्या निरीक्षणात रंगीत करकोचे,उघड्या चोचीचे करकोचे, ग्रे हेरॉन, पर्पल हेरॉन, लालसरी, शेंडी बदक, शेकाटे, नयनसरी, लालसरी , पिनटेल, रेड क्रेस्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, वूड सँडपायपर, व्हाईट टेल्ड लँपविंग बरोबरच  कोंब डक,  नदिसूरय, जांभळी पानकोंबडी, कमळ पक्षी,  कंडोलक, पानडुबी, पाणकावळा, विजन, रेड क्रिस्टेड पोचार्ड, कूट, ऑस्प्रे, हॅरियर व इतर अनेक प्रजातींचे विविध पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. यासह कंठेरी चिखल्या, चमचे , धोबी, कॉमन कूट, कवड्या धिवर, हे पाणपक्षी,  तर थीरथीरा ,निलय , मुनिया, पाकोळी, पांढऱ्या भिवईची बुलबुल या सारखे रानपक्षी परिसरात आढळून आले.

२० हजार किमीचा प्रवास करून पक्षी दाखल

युरोप, हिमालय, तिबेट, सायबेरिया या बर्फाच्छादीत प्रदेशात थंडीने जलाशये गोठतात. पक्ष्यांना अन्नाची कमतरता निर्माण होते. त्यामुळे त्यांचा संतुलित सुरक्षित वातावरणातील अन्न आणि घरट्यांसाठी शोध सुरू होतो. प्रत्येक पक्षाला सुरक्षित जागा हवी असते. त्यामुळे हिवाळ्यात पक्षी भारताच्या वातावरणात अन्न, निवारा शोधण्यासाठी येतात. सध्या जिल्ह्यातील पाणवठ्यांवर मध्य, पूर्व आणि उत्तर दक्षिण युरोप, रशिया, सायबेरिया, मंगोलिया, तिबेट येथून पाहुणे पक्षी दाखल होत आहेत.  मंगोलियातून येणारे पक्षी चार हजाराहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून आपल्या भागात येतात. तर काही पक्षी २० हजार किलोमीटरचा प्रवास करीत आपल्या जलशयांवर दरवर्षी येतात अशी माहिती पक्षीमित्र प्रसाद सोनवणे यांनी दिली.  

विविध ठिकाणी एकाच वेळी केले निरीक्षण

हतनूर बॅक वॉटर परिसर, मेहरूण तलाव, मुक्ताबाई मंदिर तसेच हरताळा तलाव, चारठाणा भवानी तलाव, पूर्णा काठ, गिरणा काठ, मेहरून तलाव, वाघूर धरण परिसरात नोंदी घेण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्यांनी एकाच दिवशी निरीक्षण केले. यामध्ये  पक्षी अभ्यासक राहुल सोनवणे, बाळकृष्ण देवरे, प्रसाद सोनवणे, रवींद्र सोनवणे, सतीश कांबळे, योगेश गालफाडे, अमन गुजर, गौरव शिंदे, सुरेंद्र नारखेडे, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, अमोल देशमुख, विजय रायपुरे, चेतन भावसार, भूषण चौधरी ,नीलेश ढाके,जयेश पाटील, भूषण निकुंभ, निलेश जगताप, योगेश सोनवणे, मुकेश सोनवणे, संदीप जगताप यांनी सहभाग नोंदवला.

हतनूर धरणात ९९ प्रकारच्या पक्ष्यांची नोंद 

चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे पक्षीमित्र अनिल महाजन यांनी हतनूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात केलेल्या निरीक्षणात ९९ जातीच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती अनिल महाजन यांनी दिली. विदेशी पक्ष्यांचे आगमण सुरु झाले असून, दरवर्षी हजारोंच्या संख्येने हे पक्षी हतनूर जलाशयात दाखल होत असतात. डिसेंबर ते मार्चपर्यंत हे पक्षी जिल्ह्यात तळ ठोकून असतात. मार्चनंतर या पक्ष्यांचा परतीचा प्रवास सुरु होत असल्याची माहिती अनिल महाजन यांनी दिली. 

स्थानिक अधिवास असलेले पक्षी देखील तलाव आणि गिरणा काठावरील नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने कमी प्रमाणात दृष्टीस पडत आहेत, तसेच स्थलांतरी इतर पाहुण्या पक्ष्यांची संख्या  दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. त्यामुळे विविध ऋतू नुसार दाखल होणाºया पक्ष्यांचे अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

- राहुल सोनवणे, वनस्पती आणि पक्षी अभ्यासक

जलाशयांच्या परिसरात मानवी अतिक्रमण वाढले आहे. औद्योगिकरण, बांधकाम, कारखाने निर्मितीमुळे पाहुण्या पक्ष्यांचे अधिवास धोक्यात येत आहे. अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या पक्ष्यांचे संवर्धन, संरक्षणासाठी उपाययोजना करायला हव्यात.

- बाळकृष्ण देवरे, वन्यजीव संरक्षण संस्था
 

Web Title: Migratory birds flock to jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.