देखण्या पालीच्या नवीन प्रजातीचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 11:43 AM2019-09-04T11:43:33+5:302019-09-04T11:44:44+5:30
केरळ राज्यातील थेनमला भागातून नुकत्याच एका दुर्मीळ पालीचा शोध लागला आहे. ही पाल केरळ राज्यातील पश्चिम घाट परिसरात आढळली आहे.
प्रगती जाधव-पाटील
सातारा - केरळ राज्यातील थेनमला भागातून नुकत्याच एका दुर्मीळ पालीचा शोध लागला आहे. ही पाल केरळ राज्यातील पश्चिम घाट परिसरात आढळली आहे. सातारा जिल्ह्यातील वन्यजीव अभ्यासक डॉ. अमित सय्यद यांनी या नव्या प्रजातीच्या पालीचा शोध लावला आहे. ही पाल अशिया खंडातील सर्वात देखणी पाल असल्याचा सय्यद यांचा दावा आहे.
डॉ. अमित सय्यद हे २०१५ सालापासून या पालीवर अभ्यास करत होते. १८७० मध्ये बेडॉम नामक ब्रिटिश वन्यजीव संशोधकांनी अशाच एका पालीचा शोध लावला होता. ती पाल या नवीन प्रजाती सारखीच दिसत असल्यामुळे तीच पाल आहे, असे गृहित धरले जात होते. भारतामध्ये आढळलेल्या व ब्रिटिश संशोधकांनी शोध लावलेले सर्व प्राणी हे नमुना रुपामध्ये लंडन म्युझियम (एनएचएमयूके) येथे जतन करण्यात आले आहेत. डॉ. सय्यद यांनी लंडन म्युझियममधील जतन केलेल्या भारतातील सर्व पालीच्या नमुन्याचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की केरळमधील पाल ही नवीन प्रजातीची आहे. या पालीसाठी डॉ. सय्यद यांनी चार वर्षे अभ्यास केला. यादरम्यान केरळ व तामिळनाडू भागातील जंगलात जाऊन त्या पालीचे अस्तित्व, संख्या, प्रजनन व त्याच्या अन्नसाखळीचाही अभ्यास करण्यात आला. आशिया खंडातील ही सर्वाधिक देखणी पाल असल्याचा दावाही सय्यद यांनी केला आहे.
वन्यजीव अभ्यासक डॉ. अमित सय्यद यांनी आजपर्यंत भारतातून सहा पालींच्या व एका बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका अॅम्फिबिया अँड रेपल्टीलिया या वन्यजीव विभागाने त्यांची संशोधक म्हणून नियुक्ती केली आहे. सातारकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट असून, देशातून तसेच विदेशातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
देखण्या पालीची वैशिष्ट्ये!
या पालीला ‘नीमस्पिस अॅरणबोरी’ असे नाव दिले आहे. हे नाव अॅरणबोर नामक वन्यजीव संशोधक यांच्या नावाने देण्यात आले आहे. ‘नीमस्पिस अॅरणबोरी’ ही पाल ३५ मिलिमीटर एवढी लहान असून, खंडातील सर्वांत देखणी आहे,’ असे डॉ. सय्यद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या पालीचे डोके पिवळ्या रंगाचे असून, मानेवर काळ्या आणि पांढºया रंगाचे पट्टे आहेत. उर्वरित संपूर्ण शरीर हे राखाडी रंगाचे असून त्यावर काळ्या आणि पांढºया रंगाच्या टिपक्यांची आगळी वेगळी नक्षी आहे. हा रिसर्च पेपर अमेरिकेतील झुटक्सा या शास्त्रीय संशोधन पत्रिकेत १५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला.
गेल्या चार-पाच वर्षांपासून मी या पालीचा अभ्यास करत आहे. याविषयीची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासून घेतल्यानंतर या पालीचा शोध मी लावल्याचा अभिमान वाटतो. आशिया खंडात ही सर्वात देखणी पाल असल्याचे माझं मत आहे. पश्चिम घाटातील समृद्ध वन्यजीव जगाच्या पटलावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- डॉ. अमित सय्यद, वन्यजीव अभ्यासक, सातारा
भारतात आढळणारी कोणतीही पाल विषारी नाही, असे सय्यद सांगतात. त्यांच्या मते पाल सरपटणारा जीव आहे. त्यामुळे तिच्या अंगावर काही विषारी जीवांचा वावर असू शकतो; पण पालीमध्ये असं कोणतंही विष नाही, ज्यामुळे मनुष्य मरू शकेल. घरात असलेल्या माश्या, झुरळ, मच्छर हे पालीचे खाद्य आहे. त्यामुळे त्या घरात स्वच्छता दूत म्हणून वावरतात. पण सरपटणाऱ्या या जीवाविषयी घृणा असल्यामुळे सगळ्यांनाच पाली नकोशा वाटतात. वनस्पतींवर वाढणारे कीटकांचा नाश करण्यासाठीही पाली उपयुक्त आहेत.