जागतिक वन पिंगळा संवर्धन दिन : लुप्त होणारा 'वन पिंगळा' नाशकात देतो दर्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 10:13 AM2020-10-24T10:13:08+5:302020-10-24T10:19:18+5:30

Pingala Bird : तब्बल 113 वर्षांनी म्हणजेच सुमारे साडे नऊ तपानंतर वन पिंगळा घुबड नंदुरबारच्या तोरणमाळ राखीव वनात एका विदेशी पक्षी अभ्यासकांना आढळून आले.

Pingala Bird found in nashik | जागतिक वन पिंगळा संवर्धन दिन : लुप्त होणारा 'वन पिंगळा' नाशकात देतो दर्शन!

जागतिक वन पिंगळा संवर्धन दिन : लुप्त होणारा 'वन पिंगळा' नाशकात देतो दर्शन!

googlenewsNext

अझहर शेख

नाशिक - 'आयुसीएन'च्या लाल यादीत अतिसंकटग्रस्त गटात समाविष्ट करण्यात आलेल्या घुबडाच्या प्रजातींपैकी एक असलेला दुर्मिळ 'वन पिंगळा' नाशिकच्या आजूबाजूला असलेल्या मध्यम व विरळ जंगलात अथवा घाट मार्गांवरील झाडोऱ्यातील उंच वाढलेल्या जुन्या वृक्षांवर दर्शन देतो. अलीकडे लॉकडाऊन काळात नेचर कॉन्स्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिकच्या पक्षी निरीक्षकांना त्र्यंबकेश्वरच्या जंगलात वन पिंगळाचा विशिष्ट प्रकारचा 'कॉल' कानी पडला, हे शुभ वर्तमान मानले जात आहे. एकेकाळी जणु रान पिंगळा लुप्त झाला असा समज करण्यात आला होता, कारण त्याचे सामान्य पिंगळा घुबडाशी असलेले साम्यही असू शकते त्यामुळे त्याला कोणी ओळखले नाही. 

जवळपास 1984पासून वन पिंगळा 1997पर्यंत कोणालाही नजरेस पडला नाही. तब्बल 113 वर्षांनी म्हणजेच सुमारे साडे नऊ तपानंतर वन पिंगळा घुबड नंदुरबारच्या तोरणमाळ राखीव वनात एका विदेशी पक्षी अभ्यासकांना आढळून आले. यानंतर पक्षीप्रेमींच्या गोटात आनंदाची लहर पसरली आणि विविध अभ्यारण्यांसह, राखीव वनक्षेत्रात या पक्षाच्या सर्वेक्षणाच्या मोहिमा विविध पक्षी-वन्यजीव संस्थांनी हाती घेतल्या. यामध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहाय्यक संचालक गिरीश जठार यांनी वन पिंगळा घुबडाचा राज्यातील पाच अभ्यारण्यांमध्ये शोध घेतला आणि त्याची माहिती अलीकडे 'आययुसीएन' या विश्वस्तरावरील संस्थेला सादर केली आहे. 

नामशेष होण्याच्या मार्गावर असणारा रान पिंगळा त्र्यंबकेश्वर, हरसूल वनपरिक्षेत्रात व 'एनसीएसएन'चे संस्थापक दिवंगत बिश्वरूप राहा यांनी 2016 साली पहिल्यांदा बघितला होता. त्यांच्या निरीक्षणामुळे नाशिकच्या पक्षी विश्वात आणखी एक महत्वाची भर पडली. मागील चार वर्षांपासून त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, हरसूल भागात पसरलेल्या सहयाद्रीच्या ब्रहमगिरीच्या रांगेत वन पिंगळा आपला अधिवास करुन आहे. यामुळे या भागातील राखीव वने अधिकाधिक संरक्षित करणे काळाची गरज बनली आहे.

असा आहे वन पिंगळा हा पक्षी 

इतर घुबडांच्या तुलनेत आकाराने लहान व आखूड शेपटीचा असतो. तो पानगळीच्या आर्द्र जंगलात व ओढ्यानजीकच्या जुन्या आम्रवनात, सागाच्या जंगलात आढळतो. वन पिंगळा दिवसा सक्रिय असतो. तो निर्भयपणे जंगलात, माळरानावर, ओढे-नद्यांकाठी वावरतो. त्यामुळे या वन पिंगळ्याला इतर निशाचर घुबडाप्रमाणे अंधाराचे संरक्षण मिळत नाही. या पक्ष्याचा प्रजनन काळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान असतो. मादी मोठ्या झाडांच्या ढोलीत किंवा घरट्याच्या तळाशी अंडी घालते. अंडी उबविण्यापासून ते पिलांच्या संगोपणाचे सगळे काम नर आणि मादी मिळून करतात. उंदीर, सरडे, पाली, मोठे कीटक, नाकतोडे, छोटे साप, छोटे पक्षी, चिचुंद्री, सागाच्या सालीतील टोळ हे या घुबडाचे खाद्य आहे. 

वन पिंगळा हरवला होता;मात्र तो आता गवसला आहे. गरज आहे त्याला सुरक्षित ठेवण्याची. या पक्ष्यामुळे कीटक, उंदीर यांची संख्या नियंत्रनात राहते. सागाच्या वनांचे संरक्षण होऊन वैश्विक तापमानवाढीचा धोका कमी होण्यास मदत होते. सागाच्या सालीमध्ये असणारे टोळ कीटक वनपिंगळा आवडीने खातो. वनपिंगळा राज्यातील पाच अभ्यारण्यांसह अन्य राखीव वनांमध्येही आढळून येतो. राज्यात त्याची संख्या सध्या स्थिर आहे. मानवाने जंगलातील अतिक्रमण, वृक्षतोड थांबवली तर नक्कीच वनपिंगळा गुण्यागोविंदाने आपली संख्या वाढवू शकेल आणि नैसर्गिक अन्नसाखळी अधिकाधिक सक्षम होईल. 

- डॉ.गिरीश जठार, सहायक संचालक बीएनएचएस
 

Web Title: Pingala Bird found in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.