Plant Health Year 2020 : आपल्या आरोग्यासाठी जपा झाडांचेही आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 05:24 PM2020-01-01T17:24:03+5:302020-01-01T17:30:53+5:30

मानव आणि पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी झाडांचे आरोग्य जपणे आवश्यक

Plant Health Year 2020: take care of plant for your health | Plant Health Year 2020 : आपल्या आरोग्यासाठी जपा झाडांचेही आरोग्य

Plant Health Year 2020 : आपल्या आरोग्यासाठी जपा झाडांचेही आरोग्य

googlenewsNext
ठळक मुद्दे२०२० हे वर्ष युनायटेड नेशन्सने ‘प्लान्ट हेल्थ ईअर’ म्हणून घोषित केले आहे.युनायटेड नेशन्सतर्फे  शाश्वत विकास हे ध्येय गाठण्यासाठी २०३० हे वर्ष ठरविण्यात आले आहे.

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : कीटकनाशके, रासायनिक खतांचा सातत्याने होणारा वापर याचा झाडांवर विपरीत परिणाम होत आहे. वरवर पाहता सगळे आलबेल वाटत असले तरी यामुळे झाडांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्नासाठी मानवजात झाडांवर अवलंबून असल्यामुळे कळत-नकळत मानवी शरीरावरही याचा परिणाम होतो. त्यामुळे झाडांसाठी नाही, तर निदान स्वत:चे आरोग्य जपणे या स्वार्थी हेतूने तरी झाडांचे आरोग्य सांभाळा, असे आवाहन युनायटेड नेशन्सतर्फे जगभरातल्या लोकांना करण्यात आले आहे.

२०२० हे वर्ष युनायटेड नेशन्सने ‘प्लान्ट हेल्थ ईअर’ म्हणून घोषित केले आहे. मानव आणि पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी झाडांचे आरोग्य जपणे आवश्यक असून, त्यासाठी शाश्वत विकासाची गरज आहे. याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी यावर्षीची संकल्पना ‘झाडांचे आरोग्य’ याभोवती गुंफण्यात आली आहे. २०१७ साली संयुक्त राष्ट्राच्या सभेत ‘प्लान्ट हेल्थ’ विषयीचा ठराव मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव फिनलँड देशाने मांडला

युनायटेड नेशन्सतर्फे २०२० वर्ष ‘प्लान्ट हेल्थ ईअर’ म्हणून घोषित
‘संयुक्त राष्टाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारचे दिन आणि वर्षाची थीम’ ठरविली जाते मात्र त्यावर जगभराच्या दृष्टीने व्यापक प्रमाणावर उपाययोजना होत आहे, असे चित्र दिसत नाही. हेल्थ प्लान्ट या विषयासंदर्भात भारतात वैज्ञानिक संस्था, केंद्र आणि राज्य सरकारे तसेच शेती, पर्यावरण आणि  जैवविविधतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांमध्येही अद्याप या विषयाची चर्चा सुरु असल्याचे दिसत नाही. 

शाश्वत विकास
युनायटेड नेशन्सतर्फे  शाश्वत विकास हे ध्येय गाठण्यासाठी २०३० हे वर्ष ठरविण्यात आले आहे. यासोबतच दारिद्र्य निर्मूलन, आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय विकास ही देखील आगामी काळातील उद्दिष्टे आहेत. या दिशेने जाण्यासाठीची सुरुवात अप्रत्यक्षपणे झाडांच्या आरोग्यातूनच होते. शाश्वत शेतीच्या माध्यमातूनच झाडांचे आरोग्य सांभाळता येईल. यासोबतच शाश्वत औद्योगिकीकरण,  शाश्वत जीवन, शाश्वत अन्न या संकल्पनाही महत्त्वाच्या आहेत. 

उद्देश
संयुक्त राष्ट्रसभेत ‘प्लान्ट हेल्थ’चा विषय चर्चेत आला त्यावेळी यासंबंधीच्या उद्देशांवरही चर्चा झाली. ‘प्लान्ट हेल्थ’ चा उद्देश काय असावा याचाही विचार झाला. केवळ रोपांचे जीवन एवढ्यापुरता हा विषय मर्यादित नाही तर ‘प्लान्ट हेल्थ’ म्हणत असताना संपूर्ण मानवी जीवनाचा विचार करण्यात आला आहे. ‘प्लान्ट हेल्थ’ मुळे माणसाची भूक मिटेल, गरीबी दूर होईल, पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि अंतिमत: ही बाब मानवी आर्थिक विकासासाठी पूरक ठरेल. 
तज्ज्ञ म्हणतात...
डॉ. रंजन गर्गे म्हणाले की, कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे मातीत विष कालविले जाते. हे विष फळ, धान्य, भाज्या या स्वरूपातून आपल्या शरीरात प्रवेश करते. यामुळेच कर्करोगाचे प्रमाण सध्या लक्षणीय वाढले आहे. यासोबतच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीतील नत्र, सल्फर, कार्बन यांचे प्रमाण बिघडते. मातीतील परिसंस्थांचा नाश होत असून, जैवविविधतेला धोका होत आहे. ट्रान्सजेनिक प्लान्टस् जणुकीय बदलातून वनस्पतींचे वाण निर्माण करणारा प्रकारही धोकादायक असून, त्यामुळे काही वर्षांनंतर केवळ कृत्रिम अन्न खाण्याची वेळच आपल्यावर येईल आणि आहारातील सकसता निघून जाईल. यातून कॅन्सरचे प्रमाण तर वाढेलच; पण अन्य आजारांनाही निमंत्रण मिळेल. याशिवाय पेट्रोल, डिझेल यांचा अतिवापरही ग्लोबल वार्मिंगला कारणीभूत ठरतो आहे. हे सर्व रोखायचे असेल, तर शाश्वत जीवनाकडे मार्गक्रमण केले पाहिजे. हे साध्य करण्यासाठी शेती पद्धतीत आणि आपल्या आचरणात आमूलाग्र बदल करावा 
लागेल, असे गर्गे यांनी सांगितले. 

Web Title: Plant Health Year 2020: take care of plant for your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.