किमान ऑक्सिजनसाठी तरी मुंबईतील जंगल टिकवा; पर्यावरणप्रेमींचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 10:38 IST2021-05-22T10:38:02+5:302021-05-22T10:38:31+5:30
जागतिक जैवविविधता दिन विशेष - मुंबईत गवताळ कुरणे आहेत. येथे किडे असतात. त्यांना खाण्यासाठी पक्षी येतात. हेही एका अर्थाने वन्यजीव आहेत.

किमान ऑक्सिजनसाठी तरी मुंबईतील जंगल टिकवा; पर्यावरणप्रेमींचे आवाहन
सचिन लुंगसे
मुंबई : मुंबईत नव्याने रस्ते बांधले जात नसले तरी रस्त्यांच्या दुस्तीसह प्रकल्प आणि इतर कामांसाठी २०१८ साली १२ हजार आणि २०१९ साली १४ हजार झाडांवर संकट ओढावले आहे. मिठी नदीलगतची जैवविविधताही नष्ट झाली आहे. आता आपण जैवविविधता टिकविण्यासाठी काम केले पाहिजे. कारण १८ लाखांपैकी १० लाख पेशी धोक्यात आल्या आहेत. किमान ऑक्सिजनसाठी तरी मुंबईतील जंगल टिकवा, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.
मुंबईत गवताळ कुरणे आहेत. येथे किडे असतात. त्यांना खाण्यासाठी पक्षी येतात. हेही एका अर्थाने वन्यजीव आहेत. पाणथळ जागा, तलाव यांचे रक्षण केले पाहिजे. येथे मोठ्या संख्येने वन्यजीव आढळतात. वन्य जीवांमध्ये सर्पदेखील येतात. एकट्या मुंबईमध्ये किमान ४० प्रजातींचे सर्प आढळतात. पवई तलाव १८९० साली बांधून पूर्ण झाले, त्यावेळी ते ३७० एकर परिसरात पसरलेले होते. पावसात पाणी वाहून १७ हजार एकर पाणलोट क्षेत्र वाढायचे. ५० वर्षांपूर्वी येथे आढळणारी जैवविविधता आता आढळत नाही. बोरिवली नॅशनल पार्क, धारावी येथील निसर्ग उद्यान येथे प्राणी-पक्षी पाहण्यास मिळतात. माहीम, भांडुप, शिवडी, वांद्रे येथे दलदलीचे प्रदेश आहेत; तेथे जैवविविधता आहे. जैवविविधता हा जंगलाचा भाग आहे. ती जपणे ही काळाची गरज असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितले.
...अन् मुंबईतील जैवविविधतेचा झाला ऱ्हास
३० वर्षांत मुंबईत असलेले ४२ टक्के जंगल नष्ट झाले.
४० वर्षांत मुंबईतील हिरवळ सुमारे ६० टक्क्यांनी कमी झाली.
२० वर्षांत येथील ८८ प्रभागांपैकी ६८ प्रभागांतील हिरवळ कमी झाली.
१३ टक्के हिरवळ शिल्लक आहे.
गोरेगावात २००१ मध्ये ६२.५ टक्के भागांत हिरवळ होती. आज १७ टक्के उरली आहे.
जैवविविधतेचे माहेरघर
मिठी आणि ओशिवरा या दोन नद्यांचे मूळ क्षेत्र आरेच्या भागात आहे. हा भाग जैवविविधतेचे माहेरघर आहे. आरे हे संरक्षित जंगल आहे, जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. जगातले शहरात वसलेले एकमेव जंगल आहे. ‘आरे’चा भाग हा भूजलासाठी महत्त्वाचा पाणलोट क्षेत्र आहे, त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी मांडले.
खारफुटीजवळ दिसणारे पक्षी गायब
जैवविविधता ही साखळी असते. त्याच्या हानीचा फटका प्रत्येक घटकाला बसतो. मुंबईतील जैवविविधतेचा अभ्यास झाला नाही. अभ्यास होत नसल्याने उंच इमारती होण्याआधी कोणते पक्षी, झाडे होती, याची माहिती उपलब्ध होत नाही. काही झाडांचा वापर पक्षी अंडी घालण्यास करतात. मात्र, ही झाडे नष्ट होत आहेत. खारफुटीचे क्षेत्र वाढले, असा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र खारफुटीजवळ दिसणारे पक्षी गायब आहेत.- विजय अवसरे, निसर्ग अभ्यासक