महत्त्वाच्या प्रतिजैविक औषधांचा पिकांसाठी गैरवापर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 10:47 AM2019-11-21T10:47:01+5:302019-11-21T10:47:30+5:30
माणसांसाठी प्रतिजैविकांचा जपून वापर करण्यासोबतच पिके आणि इतर अन्नासाठी होणारा अतिरिक्त वापर टाळायला हवा, असा सल्ला सीएसईने दिला आहे.
गजानन दिवाण
औरंगाबाद - क्षयरोग (टीबी) वर उपचार करणाऱ्या औषधींचा पिके आणि फळांसाठी मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याची धक्कादायक माहिती सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्नमेंट (सीएसई)च्या पाहणीतून समोर आली आहे. माणसांसाठी प्रतिजैविकांचा जपून वापर करण्यासोबतच पिके आणि इतर अन्नासाठी होणारा अतिरिक्त वापर टाळायला हवा, असा सल्ला सीएसईने दिला आहे.
प्रतिजैविक जागरूकता सप्ताहानिमित्त सीएसईने आपले निष्कर्ष बुधवारी (20 नोव्हेंबर) जाहीर केले. दिल्लीतील यमुनाचा काठ आणि हरियाणातील हिसार, पंजाबमधील फाजिल्काच्या परिसरात असलेले शेतकरी स्ट्रेप्टोसायक्लिन म्हणजेच स्ट्रेप्टोमायसीन आणि टेट्रासायक्लिन यांचे मिश्रण (90-10 प्रमाण) वापरत असल्याचे सीएसईच्या पाहणीत आढळून आले आहे. स्ट्रेप्टोसायक्लिन मानवांमध्ये टीबीवर उपचार करणारी औषधी आहे. मात्र फळे, भाज्या आणि तांदूळ पिकवण्यासाठी या औषधींचा सर्रास वापर केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अति महत्त्वाचे प्रतिजैविक म्हणून ‘स्ट्रेप्टोसायक्लिन’चे वर्गीकरण केले आहे. असे असताना पिकांसाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणे हे धोक्याचे असल्याचे सीएसईने म्हटले आहे.
प्रतिजैविकांचा परिणाम न होणे हा सार्वजनिक आरोग्यासाठी वाढत जाणारा धोका आहे. याचा सर्वाधिक परिणाम भारतावर होण्याची शक्यता आहे. रोगांच्या सूक्ष्मजंतूंचा नाश करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिजैविकांना मानवाच्या शरीरात प्रतिरोधक बनत असल्याने प्रतिजैविक अप्रभावी होत आहेत. प्रतिजैविक प्रतिरोधामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होत असून, आर्थिक बोजा देखील वाढत आहे.
प्रतिजैविक प्रतिरोधाचा धोका
कोंबडी, मासे आदींच्या अनैसर्गिक वाढीसाठी किंवा रोग प्रतिबंधासाठीही प्रतिजैविकांचा अतिवापर होत आहे. या कारणांमुळे प्रतिजैविक प्रतिरोधाचा धोका वाढत असल्याचे सीएसईचे तज्ज्ञ अमित खुराना यांनी म्हटले आहे. त्यामुळे पिकांसह कोंबडी, मासे आदी माणसांच्या खाद्यामध्ये पशुवैद्यकीय औषधांचा वापर टाळायला हवा, असे सीएसईने म्हटले आहे.
क्षयरोग आजही आपल्या देशात सार्वजनिक आरोग्याचे संकट आहे. पिकांमध्ये स्ट्रेप्टोसायक्लिनचा इतका व्यापक आणि निष्काळजीपणे होणारा वापर टाळण्यासाठी आपण तोडगा काढला पाहिजे.
- सुनीता नारायण, महासंचालक, सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्नमेंट