लाल विजांमुळे येतो दुष्काळाचा अंदाज; पांढऱ्या शुभ्र विजा देतात चांगल्या मान्सूनची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 08:21 AM2023-12-03T08:21:55+5:302023-12-03T08:22:16+5:30
इंद्रधनुष्याच्या प्रत्येक रंगात म्हणजे लाल, नारंगी, हिरवा, पिवळा, निळा, पारवा आणि जांभळा अशा सर्व रंगात विजा चमकत असतात.
मुंबई - पृथ्वीवर दर सेकंदाला ४४ विजा कोसळतात. विजांमुळे वित्त व जीवितहानी होत असली तरी लाल रंगाच्या विजा संभाव्य दुष्काळाचा ‘अलर्ट’ देतात, तर निळ्या आणि पांढऱ्या शुभ्र विजा या येणाऱ्या चांगल्या मान्सूनची आगाऊ सूचना देतात. त्यामुळे विजांवरून हवामानाचा अंदाज लावणे शक्य होते. शेतकऱ्यांसाठी विजांचे विज्ञान उलगडून दाखवलेय भौतिकशास्त्रज्ञ व हवामान संशोधक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी.
विजांची रंगीत आतषबाजी!
इंद्रधनुष्याच्या प्रत्येक रंगात म्हणजे लाल, नारंगी, हिरवा, पिवळा, निळा, पारवा आणि जांभळा अशा सर्व रंगात विजा चमकत असतात. तुलनेने पांढऱ्या शुभ्र दिसणाऱ्या विजांचे प्रमाण अधिक आहे. कित्येकदा पांढऱ्या रंगात चमकणाऱ्या विजांच्या कडाभोवती दुसऱ्या रंगासह विजांचा लखलखाट जाणवतो.
‘मान्सून’दूत विजा!
मान्सूनपूर्व काळात तीन महिने, तीन-पाच आणि सात अशी एकाच ठिकाणी येणारी विजांची वादळे हीदेखील त्या पंचक्रोशीत चांगल्या पावसाची सूचना देतात. मान्सूनच्या आधी आणि मान्सून संपताना वातावरणातील अस्थिरतेने विजा चमकतात. वातावरणातील अस्थिरतेमुळे वादळी वारे, गारांचा मारा, आकाशात ढगांचे पुंजके गडगडाट व कडकडाट असे विजांचे वेगवेगळ्या रंगछटा वा शेडमध्ये तांडव दिसणे ही मान्सूनपूर्व तसेच मान्सून उत्तर काळातील पाऊस ओळखण्याची साधीसोपी लक्षणे आणि सर्वसामान्य जनतेलादेखील लक्षात येईल अशा खुणा किंवा चिन्हे होत.
विजांबरोबर गारांचा मारा
विजांचा लखलखाट होतो, तो केवळ अस्थिर वातावरण ऊर्ध्व दिशेने वाढत जाणारा पाणीदार क्युमुलोनिंबस ढगांमुळे ! क्युमुलोनिंबस ढग जमिनीपासून साधारणतः दोन किलोमीटरवर अंतरापासून सुरू होऊन बारा आणि कधी कधी तर पंधरा किलोमीटरपेक्षा अधिक उंचीपर्यंत वाढत जातात. परिणामी याच क्युमुलोनिंबस ढगांमध्ये बाष्पाचे व पाण्याचे कण हे सांद्रीभवन (Condensation) होत एकत्र येऊन गारा पडतात. क्युमुलोनिंबस ढग हे नेहमी मान्सूनपूर्व आणि मान्सूनउत्तर काळातच दिसून येतात.