घाटातील दरडीमध्ये कोसळलेल्या वृक्षांचे पुनर्वसन, रायगड जिल्ह्यात ‘सिस्केप’ची मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 02:40 AM2020-09-14T02:40:52+5:302020-09-14T02:41:41+5:30
बांधकाम विभागाच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यात सिस्केप या संस्थेने सुरू केला आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत २४ झाडे वाचविण्यात यश आले आहे.
- संदीप आडनाईक
कोल्हापूर : अतिवृष्टीत डोंगरउतारावरील मोठ्या आकाराचे वृक्ष उन्मळून पडतात. या वृक्षांचे पुनवर्सन करण्याचा अभिनव प्रयोग
वन विभाग, सार्वजनिक
बांधकाम विभागाच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यात सिस्केप या संस्थेने सुरू केला आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत २४ झाडे वाचविण्यात यश आले आहे.
अतिवृष्टी झाल्यामुळे रायगड जिल्ह्यातील कुर्ला घाटात डोंगरउतारावरील माती, घसारा खाली येऊन वृक्ष उन्मळून पडतात. या
सर्व झाडांचे पुनर्वसन करण्याचा
निर्णय या संस्थेने घेतला. पाऊस
कमी झाल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून या संस्थेचे
सदस्य उन्मळून पडलेल्या झाडांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचे काम करीत आहेत.
या सदस्यांनी आतापर्यंत १५ वर्षांचे पिंपळाचे झाड, आसना, बिवळा, अर्जुन आणि बरतोंडी
यासह २४ जंगली झाडांना ढिगाºयातून बाहेर काढून वाचविले आहे. या मोहिमेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाड वन विभागानेही त्यांना मदत केली, असे संस्थेकडून सांगण्यात आले.
गिधाड संशोधन आणि संवर्धन केंद्रात पुनर्वसन
माणगाव तालुक्यातील वडघर या गोरेगाव येथील शैलेश देशमुख यांच्या गिधाड संशोधन आणि संवर्धन केंद्रात या झाडांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यंदा वादळात या केंद्रातील जंगलाची खूप हानी झाली आहे. पुन्हा छोटी रोपे लावून जंगल देवराई पुनर्जीवित करण्याचे काम सिस्केप संस्थेने सुरू केले आहे. त्यासोबतच या मोठ्या झाडांचे पुनर्वसनदेखील याचठिकाणी केले जाणार आहे. यामुळे झाडांच्या पुनर्वसनासोबत पक्ष्यांना निवाराही मिळेल, असे मत सोहम धारप, तसेच प्रतीक देसाई आणि ओंकार सावंत यांनी व्यक्त केले.
चिपको आंदोलनाचे स्मरण
चिपको आंदोलनाचे स्मरण म्हणून सिस्केपच्या सदस्यांनी झाडे वाचविण्याच्या या मोहिमेला सुरुवात केली आहे. राज्यभर अशा प्रकारची मोहीम स्थानिक पातळीवर राबविण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रेमकुमार मेस्त्री यांनी केले आहे.