पश्चिम घाटात आढळल्या पालीच्या तब्बल १२ नव्या प्रजाती; महाराष्ट्रातील तरुण संशोधकांचे संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 11:14 AM2021-10-10T11:14:41+5:302021-10-10T11:19:12+5:30
Researchers discover 12 new species of geckos in Western Ghats : ‘डे गेको’ असे संबोधले जाणाऱ्या या सर्व पाली कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधून आढळल्यामुळे पश्चिम घाटातील ‘निमॅस्पिस’ कुळातील पालींच्या विविधतेमध्ये भर पडली आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर - महाराष्ट्रातील तरुण संशोधकांनी पश्चिम घाटामधून ‘निमॅस्पिस’ कुळातील पालीच्या तब्बल १२ नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. ‘डे गेको’ असे संबोधले जाणाऱ्या या सर्व पाली कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधून आढळल्यामुळे पश्चिम घाटातील ‘निमॅस्पिस’ कुळातील पालींच्या विविधतेमध्ये भर पडली आहे.
शौनक पाल, जिशान ए मिर्झा, प्रिन्सिया डिसुझा, कार्तिक शंकर या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस या संस्थेतील राज्यातील तरुण संशोधकांचे यासंबंधीचे प्रकाशन नुकतेच ‘झूलॉजिकल रिसर्च’ या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.
पालींना जॅकी चॅन, आकाशगंगेची नावे!
‘निमॅस्पिस जॅकी’ - तामिळनाडूमधील गवताळ प्रदेशामध्ये पाल सर्वेक्षण करताना दगडावरून एक पालीने मारलेली उडी पाहून शौनक पाल यांना‘जॅकी चॅन’च्या स्टंटची आठवण झाली, म्हणून या नवीन प्रजातीचे नाव ‘निमॅस्पिस जॅकी’ असे केले.
‘निमॅस्पिस गॅलेक्सिया’- तामिळनाडूमधील अण्णामलाईच्या परिसरात सापडलेल्या पालीच्या एका नव्या प्रजातीच्या नारंगी पाठीवर पांढऱ्या रंगाचे ठिपके होते. ही रचना आकाशगंगेसारखी वाटत असल्याने तिचे नाव ‘निमॅस्पिस गॅलेक्सिया’ असे आहे.
अशा असतात ‘निमॅस्पिस’ कुळातील पाली
कीटक हे मुख्य खाद्य असलेल्या पाली नैसर्गिक अन्नसाखळीचा महत्त्वाचा भाग आहेत. देशातील बहुतेक पाली निशाचर आहेत. परंतु, ‘निमॅस्पिस’ कुळातील पाली दिवसा संचार करतात. या वैशिष्ट्यामुळे त्यांना ‘डे गेको’ (‘ड्वार्फ गेको’) असेही म्हणतात. या पाली प्राचीन असून त्यांच्या गोल आकाराच्या बुबुळांच्या वैशिष्ट्यामुळे या इतर पालींपासून वेगळ्या ओळखता येतात. भारतातील इतर पालींची बुबुळे उभी असतात.
‘निमॅस्पिस’ कुळातील पाली
-४५ प्रजाती भारतात
-४५ पैकी ३५ पश्चिम घाटात आढळतात.
-५० दशलक्ष वर्षांपूर्वी पश्चिम घाटामध्ये उत्क्रांती
-५ परिसरात आढळतात (पश्चिम घाट, मैसूरचे पठार, आसाम, अंदमान आणि निकोबार बेट)
-२ कर्नाटक, ५ तामिळनाडू, ५ केरळमधून अशा १२ प्रजातींचा नव्याने शोध
-३ ते ४ सेंमी. आकार