पक्ष्यांच्या घरट्यांचा होणार शास्त्रशुद्ध अभ्यास, मार्गदर्शक तत्त्वे जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 10:49 AM2020-07-26T10:49:49+5:302020-07-26T10:50:21+5:30
शहरी भाग असो, वा ग्रामीण भाग, अशा प्रत्येक ठिकाणी पक्ष्यांच्या अभ्यास करताना याची मदत होणार आहे.
- सचिन लुंगसे
मुंबई : विणीच्या हंगामात पक्षी, पक्ष्यांचे घरटे, पक्ष्यांची पिले आणि विणीचा हंगाम याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी अमेरिका, पुणे आणि बंगळुरूमधील पक्षी अभ्यासकांनी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पक्षी अभ्यासकांना मदत होण्यासोबतच पक्ष्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाची ठरणार आहेत.
शहरी भाग असो, वा ग्रामीण भाग, अशा प्रत्येक ठिकाणी पक्ष्यांच्या अभ्यास करताना याची मदत होणार आहे. घरट्याची, परिसराची नोंद कशी करावी. घरट्याला किती वेळ, किती दिवस, कोणत्या वेळी भेट द्यावी, याविषयीचे सर्व तपशील यात देण्यात आले आहेत.
जास्त वेळ घरट्याला भेट दिल्यास पक्षी घरटे सोडून जाण्याची भीती असते. कावळ्यासारखे पक्षी आपल्यावर नजर ठेवून असतात. अशावेळी शिकारी पक्षी अभ्यास करीत असलेल्या पक्ष्याचे घरटे उद्ध्वस्त करू शकतो.
पक्ष्यांची अंडी, पक्ष्यांची पिले यांचे वजन घेणे, त्यांची मोजमापे घेणे, हे कसे आणि कोणत्या वेळी करावे, याविषयी माहिती देण्यात आली आहे. पक्ष्यांनी सोडलेले घरटे आढळले, तर आपण त्याच्या नोंदी कशा घ्याव्यात. त्याचे मोजमाप कसे करावे. पक्षी घरट्यात असताना घरट्याचे मोजमाप घेऊ नये, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहेत. पिलांना पंख येतात तेव्हा यातील काही नोंदी घ्याव्यात. मोजमाप करावे. यावेळी हे सोपे जाते. अशावेळी पिलांना कमीत कमी धोका असतो, आदी सूचना यात करण्यात आल्या आहेत.
तीन संस्थांच्या मदतीने उपक्रम
मुंबईतील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, बंगळुरू येथील नेचर कन्झर्व्हेशन फाऊंडेशन, अमेरिकेतील स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम आॅफ नॅचरल हिस्ट्री या तीन संस्थांच्या मदतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अमेरिकेतील साहस बर्वे, बंगळुरू येथील टी.आर. शंकररामण, अपराजिता दत्ता आणि पुण्यातील गिरीश जठार यांनी ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.
येथे करा नोंदी : इंडियन बर्ड आणि जर्नल आॅफ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी येथे पक्षी अभ्यासकांना आपल्या नोंदी करता येतील.
संपर्क - info@dnhs.org आणि ap.indianbirds@gmail.com