‘कळसुबाई’अभयारण्यात वाढतोय राज्यप्राणी शेकरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 10:54 AM2020-09-08T10:54:21+5:302020-09-08T10:58:23+5:30
३०२ घरटी : राजूरच्या कोथळे ‘देवराई’त संवर्धन; आदिवासींचे मोलाचे योगदान
अझहर शेख
नाशिक - सह्याद्रीच्या कुशीत पश्चिम घाटात ‘भीमाशंकर’पाठोपाठ अकोले तालुक्यातील राजुर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातसुध्दा राज्यप्राणी शेकरु वाढत आहे. वन्यजीव विभागाच्या वनरक्षकांना नियमित गस्तीदरम्यान सुमारे ७० शेकरु प्रत्यक्षरित्या नजरेस पडले आहेत.
नाशिक वन्यजीव विभागातील अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्राच्या हद्दीमध्ये स्थानिक आदिवासी बांधवांनी ‘देवराई’च्या माध्यमातून वृक्षसंवर्धन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने भंडारदराजवळील घाटघर, कोलटेंभे, रतनवाडी, कुमशेत, साम्रद भागासह राजूर वनपरिक्षेत्रातील कोथळे देवराईत शेकरुंचा अधिवास वाढत असून हे शुभ वर्तमान मानले जात आहे.
कोथळे देवराईमध्ये हिरडा, बेहडा, जांभूळ, आंबा, करंज, भेरलीमाड, सादडा, उंबर यांसारख्या वृक्षप्रजाती चांगल्याच बहरल्या आहेत. या जंगलात शेक रु या मोठ्या खारुताईचा अधिवास सुरक्षित होत असल्याने संख्या वाढताना दिसत आहेत. दोन वर्षांपुर्वी दहा ते पंधरांच्या संख्येने असलेल्या शेकुरुंमध्ये आता चांगली वाढ झाली आहे. वन्यजीव विभागाच्या वनरक्षकांना प्रत्यक्षपणे ७० शेकरु या भागातील वृक्षांच्या फांद्यांवर फिरताना आढळून आले असल्याचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांनी सांगितले. येथील सर्वच वृक्ष अत्यंत उंचच उंच वाढलेले असल्यामुळे शेकरुंना घरटी तयार करणेही सोपे झाले आहे.
कोरोनामुळे यंदा प्रगणनेला ‘ब्रेक’
कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता नाशिक वन्यजीव विभागाने दरवर्षीप्रमाणे एप्रील-मे महिन्यात केली जाणारी शेकरुची शिरगणना यावर्षी खंडित केली. त्यामुळे शेकरुंच्या घरट्यांची मोजदाद केली गेली नाही; मात्र नियमित गस्तीदरम्यान वनरक्षक, वनमजूरांनी केलेल्या निरिक्षणातून शेकरुंचा अधिवास अधिकाधिक सुरक्षित होत असल्याचे दिसून आले. सध्या पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे या भागातील वृक्षसंपदा बहरली आहे. लॉकडाऊन काळ आणि अभयारण्यात पर्यटकांना प्रवेशास मज्जाव करण्यास आल्यामुळे येथील जैवविविधता अधिकाधिक समृध्द होत असल्याचे निसर्गप्रेमींचे म्हणणे आहे.
शेकरुंचा अधिवास दृष्टिक्षेपात...
कोथळे देवराई- ७० हेक्टर क्षेत्र वृक्षच्छादित
लव्हाळी वनक्षेत्र- २० हेक्टरवर वृक्षसंपदा
प्रत्यक्ष दिसलेले शेकरु-७०
वापरात असलेली घरटी-३०२
नादुरूस्त घरटी-१२७
सोडून दिलेली घरटी- १११
संभाव्य संगोपन घरटी-१०६