धक्कादायक ! गोदाकाठी मृत माशांचा खच; कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 01:20 PM2020-06-13T13:20:55+5:302020-06-13T13:24:57+5:30

पर्यावरण प्रेमींनी यापूर्वीच जलचर प्राणी प्राण्यांना धोका असल्याची शक्यता वर्तविली होती.

Shocking! dead fish stock at Godawari river; The reason is unclear | धक्कादायक ! गोदाकाठी मृत माशांचा खच; कारण अस्पष्ट

धक्कादायक ! गोदाकाठी मृत माशांचा खच; कारण अस्पष्ट

Next
ठळक मुद्देनदीत चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे मृत माशांचा खच पडला होता पाण्यातील दोष शोधून मृत्यूचे कारण शोधण्याचे पर्यावरण प्रेमींचे आवाहन

नांदेड : शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठी जवळपास सर्वच घाटांवर माशांचा खच पडला आहे. मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून मासे नेमकी कशामुळे मेले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नांदेड शहरातून गोदावरी वाहते, 'गुरु-ता-गद्दी'च्या काळात नदीकाठच्या सर्वच घाटांचा विकास करण्यात आला आहे. परंतु, नांदेड शहरातून निघणारे जवळपास 18 ड्रेनेज लाईनचे घाण पाणी थेट गोदावरी पात्रात सोडण्यात आल्याने पर्यावरण प्रेमींनी यापूर्वीच जलचर प्राणी प्राण्यांना धोका असल्याची शक्यता वर्तविली होती.

जागतिक पर्यावरण दिनी गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी विनंती प्रा.डॉ. किरण शिल्लेवार यांनी केली होती. परंतु याकडे महापालिका प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले. आज गोदावरी नदीकाठी ठिकाणी मृत माशांचे ढिगारे लागले आहेत. माशांच्या मृत्यूला महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप वन्यजीव प्रेमी तसेच पर्यावरण प्रेमी कडून करण्यात येत आहे.

यापूर्वी देखील घडली होती अशी घटना
नांदेड शहरापासून जवळच असलेल्या शिकारघाट परिसरात आसना नदीत चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे मृत माशांचा खच पडला होता त्याचबरोबर इतर जलचर प्राणी मृत पावले होते. सदर घटना परिसरातील एका कारखान्याचे दूषित पाणी थेट नदीत सोडल्यामुळे घडली होती.

पाण्यातील दोष शोधून मृत्यूचे कारण शोधावे
गोदावरी नदीकाठी मृत माशांचा खच पडला आहे. ही घटना दुर्दैवी आहे. परंतु ही मासे नेमकी कशामुळे मृत झाली याचे कारण आताच सांगणे शक्य नाही. नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. लवकरच पाण्यातील दोष शोधून मृत्यूचे कारण शोधले जाईल.  त्याचबरोबर मृत मासे कोणीही मासे विक्री व्यवसायिकांनी विक्री करू नये अथवा नागरिकांनीदेखील ते खाऊ नये. कारण त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मृत मासे खाल्ल्याने अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
- प्रा.डॉ. किरण शिल्लेवार, मत्स्यशास्त्र विभाग प्रमुख, सायन्स कॉलेज, नांदेड

महापालिका प्रशासनाने सतर्क व्हावे
गोदावरी नदी काठावर मृत माशांचा खच पडला असून ही घटना दुर्दैवी आहे या माशांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे हे माहिती नाही. परंतु मृत माशांचा खच पाहून खूप वाईट वाटले गोदावरी नदी नांदेड शहराचे वैभव असून तिच्या सुशोभीकरणाचा सह स्वच्छता आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता तरी सतर्क व्हावे. 
- किशोर वागदरीकर, पर्यावरण प्रेमी नागरिक

Web Title: Shocking! dead fish stock at Godawari river; The reason is unclear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.