जंगल सफारीचा छंद जीवाला लावी पिसे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 08:53 IST2025-02-23T08:52:56+5:302025-02-23T08:53:09+5:30
हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारण्याच्या दृष्टिकोनातून हिंदी बोलण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

जंगल सफारीचा छंद जीवाला लावी पिसे...
काही महिन्यांपूर्वीच माझी ‘काव्यांजली’ मालिका संपली. त्यातील माझे काम प्रेक्षकांना खूप आवडले. त्यामुळे यापुढे त्या तोलामोलाच्या व्यक्तिरेखा साकारायच्या आहेत. या मालिकेत काव्या आणि अंजली या दोन बहिणींची गोष्ट होती. काव्याची सासू मी साकारली होती. सुनेला खूप सांभाळून घेणारी आदर्श वाटावी, अशी ही सासू होती. मुलगा आणि सुनेत पटत नसल्याने ती दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न करते. ही प्रेमळ सासू खूप फेमस झाली होती. बऱ्याच चित्रपट आणि मालिकांच्या ऑफर्स आहेत, पण मुख्य व सशक्त व्यक्तिरेखाच साकारायच्या आहेत. आजवर मी सर्व प्रकारचे रोल केले आहेत. त्यामुळे आणखी काय चांगले करता येईल, ते शोधत आहे.
हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारण्याच्या दृष्टिकोनातून हिंदी बोलण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हिंदी-फ्रेंचसह दाक्षिणात्य तसेच इतर भाषांमधील चित्रपटही पाहत आहे. आजची पिढी प्रगत तंत्रज्ञानाचा सुरेख वापर करत आहे.
मी आरोग्याकडे बारकाईने लक्ष देते. मालिका करताना जिममध्ये जाणे जमत नव्हते, पण आता जिम सुरू आहे. मध्यंतरी १७ वर्षे काम केले नव्हते, पण जिममध्ये नियमितपणे जायचे. योगासुद्धा करते, पण वेट करायला आवडते. घरातील कार्यक्रमांबरोबरच ट्रीप्सना जात असते. संपूर्ण मानवी जीवनाचे सार सांगणारी श्रीमद् भगवद्गीता शिकण्याचा मानस आहे. गीतेतील प्रत्येक शब्दाचा उच्चार आणि अर्थ जाणून घ्यायचा आहे.
मला प्रवास करायला खूप आवडतो. आमचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे, पण पतीला वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा छंद असल्याने आम्ही दोघे बरीच जंगले पालथी घातली आहेत. आतापर्यंत पेंच, बांधवगड, कान्हा, नानज, ताडोबा, दाजीपूर, भद्रा दांडेली अशा बऱ्याच जंगल सफारी केल्या आहेत. या दरम्यान फोटोग्राफीही केली. या छंदासमोर बाकी सर्व फिके पडते. हे वेड मला आणि नवऱ्यालाही असल्याने वेळ मिळताच जंगलात भटकंतीसाठी जातो. यासाठी आमच्याकडे पूर्ण सेटअप आहे. बांधवगड हे माझे अतिशय आवडीचे ठिकाण आहे. माझ्या बकेट लिस्टमध्ये जवाई, केन्या वाईल्डलाईफ सफारी, जिम कार्बेट नॅशनल पार्क ही ठिकाणे आहेत. लवकरच तिथेही जाऊन जंगल सफारीचा आनंद लुटणार आहोत.
पुन्हा एकदा नाटक करायचे आहे. १९८९ मध्ये प्रकाश बुद्धिसागर दिग्दर्शित ‘षडयंत्र’ या रहस्यमय नाटकात मी सविता प्रभुणेसोबत काम केले होते. १९९१ मध्ये विक्रम गोखले दिग्दर्शित-अभिनीत ‘छुपे रुस्तम’ नाटक केले होते. त्यामुळे पुन्हा रंगभूमीवर काम करायचे आहे. मराठीसोबतच हिंदी नाटके बघायला आवडतात. मराठी चित्रपटाची निर्मिती करायची आहे. एखादी पटकथा आवडली तर तो निर्णय घेईन.