गर्भातील बाळाच्या फुप्फुस, मेंदूत मिळाले प्रदूषणाचे विषारी कण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 06:00 AM2022-10-11T06:00:01+5:302022-10-11T06:00:13+5:30
नवीन अभ्यासातून खुलासा; आईच्या श्वासातून बाळापर्यंत पोहोचतोय धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : वायू प्रदूषणाने जगभर अक्राळविक्राळ रूप धारण केले असून, आता गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्येच न जन्मलेल्या बाळाच्या फुप्फुस, यकृत आणि मेंदूमध्ये वायू प्रदूषणाचे विषारी कण पाहायला मिळाले आहेत. स्कॉटलंडचे एबरडीन विद्यापीठ आणि बेल्जियमच्या हेसल्ट विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. अभ्यासात समोर आलेले निष्कर्ष चिंताजनक आणि काळजीत अधिक भर घालणारे असून, भ्रूण विकासासाठी हे महिने अतिशय महत्त्वपूर्ण असतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.
हे संशोधन स्कॉटलंड आणि बेल्जियममध्ये धूम्रपान न करणाऱ्या ६० आई आणि गर्भातील भ्रूणांवर करण्यात आले. वैज्ञानिकांनी ३६ भ्रूणांच्या ऊतींच्या नमुन्यांचेही विश्लेषण केले, ज्यांचा ७ ते २० आठवड्यांमध्ये गर्भपात झाला होता. अभ्यासानुसार, आईच्या श्वासाद्वारे प्रदूषित कण नाळेद्वारे (प्लेसेंटा) भ्रूणापर्यंत पोहोचतात.
याप्रकारच्या ऊतींमध्ये हजारो कार्बन कण आढळले आहेत. हे कण वाहन, कारखाने आणि घरांमध्ये स्वयंपाकासाठी लाकूड वापरल्याने तयार झालेल्या धुरामुळे तयार
होतात. यामुळे शरीराला नुकसान
होते.
आयुष्यभर होऊ शकतो परिणाम
गर्भपात, वेळेआधी बाळाला जन्म, जन्मावेळी कमी वजन व डोक्याच्या विकासात गडबड होण्याला प्रदूषित हवेला कारणीभूत ठरवले जाते. नवीन संशोधन सांगते की, कार्बनचे सूक्ष्म कण पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीमध्ये प्लेसेंटामध्ये प्रवेश करतात, असे नाही तर ते विकसनशील असलेल्या भ्रूणाच्या अंगातही आपला मार्ग तयार करतात. हे कण विकसनशील मानवाच्या मेंदूमध्येही प्रवेश करतात, ज्याचे परिणाम आयुष्यभर दिसून येतात.
यापूर्वीही झाले आहे संशोधन
लंडनच्या क्विन मेरी विद्यापीठात प्रथम २०१८मध्ये प्लेसेंटामध्ये वायू प्रदूषणातील कण सापडले होते. मात्र आता प्रदूषणाचे कण भ्रूणापर्यंत पोहोचल्याचे संशोधन समोर आले आहे. जगातील ९९ टक्के लोकसंख्या अशा जागेवर राहते जिथे वायू प्रदूषणाचा स्तर निर्देशांपेक्षा जास्त आहे.