कीटकांच्या दोन नव्या प्रजातींचा सिंधुदुर्गात अधिवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 05:24 PM2021-07-03T17:24:00+5:302021-07-03T17:26:20+5:30
environment Sindhudurg : प्रामुख्याने ईशान्येकडे आढळणारा चतूर आणि केरळमध्येच अधिवास असणाऱ्या टाचणी या किटकांच्या दोन नव्या प्रजाती प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये हा चतूर आढळून आला आहे. यामुळे पश्चिम घाटातील या जिल्ह्याला जैववैविध्यतेची खाण समजली जात आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : प्रामुख्याने ईशान्येकडे आढळणारा चतूर आणि केरळमध्येच अधिवास असणाऱ्या टाचणी या किटकांच्या दोन नव्या प्रजाती प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये हा चतूर आढळून आला आहे. यामुळे पश्चिम घाटातील या जिल्ह्याला जैववैविध्यतेची खाण समजली जात आहे.
'ओडोनाटा' ही उडणाऱ्या किटकांच्या कुळातील टाचणी आणि चतुरांचा समावेश जैवविविधतेची खाण असणाऱ्या पश्चिम घाटामध्ये झाला आहे. 'ओडोनाटा'च्या १७४ प्रजाती असून त्यापैकी ५६ प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. या प्रजातींमधील एकूण १३४ प्रजातींची नोंद महाराष्ट्रात होती, आता यामध्ये या दोन प्रजातींची भर पडली आहे. 'अॅग्रिओक्नेमिस केरेलेन्सिस' या टाचणीची आणि 'गायनाकँथा खासियाका' या चतूरच्या प्रजातीची महाराष्ट्रामधूून प्रथमच नोंद करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यांमध्ये या दोन्ही प्रजाती आढळल्या आहेत.
कुडाळ येथील 'संत राऊळ महाराज महाविद्यालया'चे सहायक प्राध्यापक योगेश कोळी, विद्यार्थी अक्षय दळवी आणि संशोधक डॉ. दत्तप्रसाद सावंत यांनी या नोंदी केल्या आहेत. याची माहिती 'जर्नल ऑफ थ्रेटंड टाक्सा'मध्ये या शोधप्रबंध प्रसिद्ध करणाऱ्या प्रसिद्ध नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झाली आहे.
टाचणी ( 'अॅग्रिओक्नेमिस केरालेन्सिस') : ही प्रजात मुख्यत्वे केरळमध्ये आढळते. मात्र, प्रथमच कुडाळ तालुक्यामधील ठाकूरवाडी पाणथळ, बांबुळी आणि चिपी विमानतळाच्या पठारावर ती आढळल्याची माहिती डॉ. दत्तप्रसाद सावंत यांनी दिली. यामुळे पश्चिम घाटामधील या प्रजातीचे उत्तरेकडील अधिवास क्षेत्र या नोंदीमुळे अधोरेखित झाला आहे.
चतुरा ( 'गायनाकँथा खासियाका') : ही प्रजात प्रामुख्याने ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालमधील किनारी प्रदेशात आढळते. मात्र, ती प्रथमच सावंतवाडीमधील माजगावमध्ये आढळली. येथे रात्रीच्या वेळी निरीक्षण करत असताना प्रकाशझोतावर हा चतूर आढळल्याची माहिती संशोधक अक्षय दळवी यांनी दिली. निरीक्षणाअंती या प्रजातीच्या नमुन्यावरून याची ओळख निश्चित करण्यात आली. चतुराचा अधिवास ईशान्य भारतापुरताच मर्यादित असल्याचे मानला जातो. मात्र, त्याची नोंद आता पश्चिम घाटामध्ये झाल्याने याचे वेगळेच महत्त्व आहे. ही राज्यातील पहिलीच नोंद आहे.