काकस्पर्श होईना... पितृपक्षात कावळ्यांची प्रतीक्षा
By Atul.jaiswal | Published: September 26, 2021 03:46 PM2021-09-26T15:46:26+5:302021-09-26T15:49:32+5:30
Pitru Paksha Special : घरावर कावळे आले, म्हणजे पितरांची आपल्यावर कृपा आहे, अशी जनमानसांत श्रद्धा आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला : पितृपक्षात पितरांपर्यंत तर्पण पोहोचविण्यासाठी वाहक म्हणून कावळ्यांना घास भरविण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. कावळ्यांनी पिंडाला स्पर्श केला म्हणजे पूर्वज संतुष्ट होतात, अशी श्रद्धा असल्याने पितृपक्षात कावळ्यांना घास भरविला जातो, परंतु अलीकडच्या केवळ शहरच नव्हे, तर गावांमध्येही कावळे दुर्मीळ झाल्यामुळे श्राद्धविधीनंतरचा घास भरविण्यासाठी कावळ्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. पितृपक्ष आणि कावळे यांचा जवळचा संबंध असल्याने या काळात कावळ्यांचे दर्शन शुभ मानले जाते. घरावर कावळे आले, म्हणजे पितरांची आपल्यावर कृपा आहे, अशी जनमानसांत श्रद्धा आहे. सध्या पितृपक्ष सुरू असल्याने घराेघरी तिथीनुसार पूर्वजांचे श्राद्ध केले जाते. श्राद्ध झाल्यानंतर घराच्या छतावर कावळ्यांसाठी घास टाकला जातो. कावळ्यांनी येऊन हा घास भक्षण केल्यास तो पितरांना प्राप्त होतो, अशी श्रद्धा असल्याने घरोघरी हा विधी केला जातो. पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे विविध पक्ष्यांप्रमाणे शहरात कावळ्यांचेही दर्शन दुर्लभ झाल्याने तर्पणाला काकस्पर्श होण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे अनेक जण नदीच्या काठावर किंवा ज्या ठिकाणी दाट वृक्षराजी आहे, अशा ठिकाणी घास नेऊन टाकत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
अधिवास होताहेत नष्ट
शहरात झाडांची संख्या कमी असून, हवेतील प्रदूषणही अधिक आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने पक्ष्यांचा अधिवासच नष्ट होत आहे. शेतीमध्ये कीटकनाशकांचा वापर वाढल्यामुळे पिकांवरील अळ्या, कीटक नष्ट झाले आहेत. हेच कावळ्यांचे मुख्य खाद्य असल्याने सध्या कावळ्यांना मुबलक खाद्यच मिळत नाही. त्यामुळे हळूहळू कावळ्यांची संख्या कमी होत आहे.
- गोविंद पांडे, माजी वनअधिकारी तथा वन्यजीव व पर्यावरण अभ्यासक, अकोला
जैवविविधता धोक्यात
पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे केवळ कावळेच नव्हे, तर अनेक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे कावळ्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात सापडला आहे, तर दुसरीकडे कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे अन्नसाखळी प्रभावित झाली आहे. एकंदरीत जैवविविधता धोक्यात आली असली, तरी त्याकडे कुणाचे लक्ष नाही. पर्यावरणाकडे गंभीरतेने पाहिले जात नाही.
- आय. ए. राजा, माजी प्राणिशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी महाविद्यालय, अकोला
ही श्रद्धा नव्हे, अंधश्रद्धा
विज्ञानयुगात वावरत असतानाही कावळ्यांना घास भरवून तो पितरांना मिळेल अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे चक्क अंधश्रद्धा आहे. यापेक्षा गोरगरिबांना जेवू घातले पाहिजे, अनाथांच्या शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. आई-वडील जिवंत असतानाच त्यांची पूर्णपणे सेवा केली पाहिजे. पूर्वापार चालत आलेल्या परंपरांमध्ये काळानुरूप बदल करायला हवे.
- अशोक घाटे, अकोला व बुलडाणा संपर्क प्रमुख, अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती