World Biodiversity Day : वाशिमच्या सोहळ अभयारण्यात रुजली जैवविविधता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 10:59 AM2020-05-22T10:59:18+5:302020-05-22T10:59:39+5:30
World Biodiversity Day : सोहळ येथील अभयारण्यात दररोज विविध प्रकारचे पशुपक्षी, प्राण्यांचे दर्शन होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम/कारंजा लाड : कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाउन असल्याने जंगल, पशुपक्षी, प्राणी यासंदर्भात मानवाचा हस्तक्षेप कमी झाल्याने जिल्ह्यातील जंगल, अभयारण्यांमध्ये पशूपक्षी, प्राणी मुक्तपणे संचार करीत आहेत. जैवविविधतेने नटलेल्या सोहळ ता. कारंजा येथील अभयारण्यात तर दररोज विविध प्रकारचे पशुपक्षी, प्राण्यांचे दर्शन होत आहे. कोणत्याही प्रकारचे प्रदुषण नसल्याने सोहळ अभयारण्य मोकळा श्वास घेत आहे.
जैवविविधतेचे स्थान लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी भारत सरकारने २००२ मध्ये तर महाराष्ट्रात २००८ पासून जैवविविधता नियम लागू आहेत.प् ार्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे अभयारण्यातील जीवांना व वनस्पतींना क्षती पोहोचते. तो बदल नियंत्रणात ठेवणे मानवाच्या हातात आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर २४ मार्चपासून लॉकडाउन आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या बाबतीत मानवी हस्तक्षेप आपसूकच कमी झाला. वाशिम जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या नद्यांचा उगम होतो. उदा. अडाण, काटेपूर्णा, बेंबळा इत्यादी. लॉकडाउनमुळे नद्यातील पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याने जलचरांची संख्या सुद्धा वाढली आहे. त्यादृष्टीने लॉकडाउन काळात विविध अभ्यासकांनी व संबंधित विभागाने पाण्याचे नमुने घेऊन व त्यांची चाचणी करून ठेवणे भविष्यकालिनदृष्टीने महत्वाचे आहे. जैवविविधतेने नटलेले सोहळ अभयारण्यात सध्या मोकळा श्वास घेत असल्याचे दिसून येते.
पर्यटनस्थळी पक्ष्यांची किलबिल
मालेगाव तालुक्यात तपोवन निसर्गरम्य पर्यटन स्थळ असून, लॉकडाउनमुळे येथे मानवी हस्तक्षेप कमी झाला. कोणत्याही प्रकारचे प्रदुषण नाही. या पर्यटन स्थळी विविध प्रजातीचे पशुपक्षी मोकळा श्वास घेत असल्याचे दिसून येते.
वाशिम तालुक्यातील एकबुर्जी येथील धरण परिसरात विदेशातील फ्लेमिंगो पक्ष्याचे आगमन दरवर्षी होत असते. लॉकडाउनच्या काळात धरण परिसरातील प्रदुषण कमी झाल्याने येथे जैवविविधता गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे दिसून येते.
मेडशी वनपरीक्षेत्रात विविध प्रजातीचे पक्षी, प्राणी आता मोकळा श्वास घेत असल्याचे दिसून येते. मालेगाव तालुक्यातील कोल्ही धरण परिसरात प्रदुषण नसल्याने येथे जलचरांच्या संख्येत वाढ होण्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तविला.
कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाउन आहे. यामुळे जंगलांमधील माणसांचा वावर दूर्मिळ झाला. या कालावधीत आपलं खरं हक्काच घर समजून प्राणी मुक्तपणे जगलांत संचार करू लागली. खºया अर्थाने त्यांना आता मोकळा शावस घेता येत आहे. सोहळ अभयारण्यात दररोज विविध प्रकारचे पशूपक्षी व प्राणी मुक्तपणे संचार करीत असल्याचे दिसून येते.
- गजानन थेर, अभ्यासक
‘लॉकडाउन’मुुळे जिल्ह्यातील जंगल, धरण, सोहळ अभयारण्य आदींमध्ये माणसांचा वावर कमी झाल्याने या प्रदेशातील जैवविविधता परत स्थिरस्थावर होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या नद्यांचा उगम होतो. लॉकडाउनमुळे पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले.
- डॉ. नीलेश हेडा
अभ्यासक, जैवविविधता.