जागतिक चिमणी दिन विशेष! निवारा अन् खाद्याची शोधाशोध; चिऊताई नाशिककरांवर रुसली

By अझहर शेख | Published: March 20, 2023 02:25 PM2023-03-20T14:25:22+5:302023-03-20T14:26:16+5:30

बाळगोपाळ ज्या पक्ष्याकडून निसर्गवाचनाची सुरुवात करतात तो लहानसा पक्षी म्हणजे चिमणी. दरवर्षी २० मार्च जागतिक चिमणी दिनापासून विविध दिवसांची पुढे सुरुवात होते.

World Sparrow Day! Due to search for shelter and food sparrows are decreasing in Nashik | जागतिक चिमणी दिन विशेष! निवारा अन् खाद्याची शोधाशोध; चिऊताई नाशिककरांवर रुसली

जागतिक चिमणी दिन विशेष! निवारा अन् खाद्याची शोधाशोध; चिऊताई नाशिककरांवर रुसली

googlenewsNext

नाशिक : चिऊताई, चिऊताई हरवलीस तू कुठे... प्रदूषणाला घाबरलीस का, शहरात दिसत नाही कुठे..? असे म्हणण्याची वेळ पुन्हा येताना दिसत आहे. सिमेंटच्या जंगलाचा वाढता पसारा अन् त्यामुळे निवारा व खाद्यासाठी होणारी वणवणमुळे नाशिककरांवर चिऊताई पुन्हा रुसल्याचे चित्र दिसत आहे. पाच वर्षांपूर्वी नागरिकांनी केलेल्या विविध उपायांमुळे चिऊताई परत अंगणी फिरली होती. मात्र, कोरोनानंतर चिमणी संवर्धनाबाबत मरगळ आल्याने चिमणी शहरातून भुर्र झाली.

मार्च महिना उजाडला की पर्यावरण व निसर्गाशी संबंधित विविध दिवसांची आठवण पर्यावरणप्रेमी नागरिकांना आपसूकच होते. बाळगोपाळ ज्या पक्ष्याकडून निसर्गवाचनाची सुरुवात करतात तो लहानसा पक्षी म्हणजे चिमणी. दरवर्षी २० मार्च जागतिक चिमणी दिनापासून विविध दिवसांची पुढे सुरुवात होते. शहरातून मागील दोन वर्षांमध्ये चिमणीने शहरास भोवतालच्या खेड्यांत स्थलांतर केल्याचे काही पक्षी अभ्यासकांच्या निरीक्षणातून पुढे आले आहे.

शहरात वाढते प्रदूषण, गोंगाट अन् निवारा, खाद्याची होणाऱ्या अडचणीमुळे चिऊताई शहरवासीय नाशिककरांवर रुसली आहे. यासाठी नाशिककरांनी पुन्हा एकदा चिमणी संवर्धनाबाबत गांभीर्याने कृतिशील विचार करत उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे. शोभिवंत फुलझाडांसह गवत उगविण्याचा प्रयोग हाती घेतल्यास चिमणी संवर्धनासाठी शाश्वत हातभार लागेल, असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

...तर लाकडी खोप्यात येईल चिऊताई
आपल्या बाल्कनीमध्ये व गच्चीवर कुंड्यांमध्ये चिऊताईला उपयोगी पडेल असे गवत उगविणे गरजेचे आहे. जेणेकरून विणीच्या काळात त्याचा उपयोग चिऊताईला अंडी उबविण्यासाठी होईल. चिमण्यांना दाणा, पाणीसोबत लाकडी घरटी लावण्यासह आपल्या गच्चीवर किंवा बाल्कनींमध्ये एक किंवा दोन पसरट कुंड्यामध्ये गवताची पेरणी करावी. यामुळे लाकडी घरट्यात चिऊताई पुन्हा मुक्काम करू शकेल.

चिमण्यांना आता घरटी बनविण्यासाठी शहरात काँक्रीटच्या इमारतींमुळे अडथळा येतो. काही महिन्यांपासून करत असलेल्या निरीक्षणात असे लक्षात आले की, लाकडी घरटी जरी नाशिककर लावत असले तरी शहरात कुठेही गवत दिसत नाही. काडी-कचरा मिळणेही दुरापास्त झाले. त्यामुळे कृत्रिम घरटी लावली तरी चिऊताई त्याकडे फिरकत नाही. यासाठी चिऊताईला गवत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. - शेखर गायकवाड, पर्यावरण अभ्यासक

शहरातून चिमणीला निवारा, खाद्य उपलब्ध होत नाही. मोकळ्या भूखंडांवर सिमेंटची जंगले वेगाने उभी राहत असल्याने बोरी, बाभळीसारखी काटेरी झाडे तोडली जात आहेत. यामुळे चिमण्यांना शहरातून हद्दपार व्हावे लागले. उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात कीटकनाशक फवारणी होऊ लागल्याने पक्ष्यांना नैसर्गिकरीत्या खाद्य शहरात उपलब्ध होताना दिसत नाही.- अनिल माळी, पक्षी अभ्यासक

Web Title: World Sparrow Day! Due to search for shelter and food sparrows are decreasing in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.