परदेशी वृक्षलागवडीमुळे बिघडला पन्हाळा शहराचा पर्यावरणाचा समतोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:24 AM2021-04-04T04:24:41+5:302021-04-05T15:35:34+5:30

नितीन भगवान पन्हाळा : कोल्हापूर जिल्ह्याचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या पन्हाळ्यात गेल्या पाच वर्षांपासून येथील उन्हाळा असह्य झाला आहे. ...

Wrong trees around Panhala in government land ..... | परदेशी वृक्षलागवडीमुळे बिघडला पन्हाळा शहराचा पर्यावरणाचा समतोल

परदेशी वृक्षलागवडीमुळे बिघडला पन्हाळा शहराचा पर्यावरणाचा समतोल

Next
ठळक मुद्देपरदेशी वृक्षलागवडीमुळे बिघडला पन्हाळा शहराचा पर्यावरणाचा समतोल पर्यावरणतज्ज्ञांनी केला दावा

नितीन भगवान

पन्हाळा : कोल्हापूर जिल्ह्याचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या पन्हाळ्यात गेल्या पाच वर्षांपासून येथील उन्हाळा असह्य झाला आहे. चालू वर्षी ३८ ते ३९ तापमान गेल्याने पन्हाळा थंड हवेचे ठिकाण राहिला नसल्याचे जाणवू लागले आहे. पर्यावरणतज्ज्ञांनी या तापमान वाढीचा अभ्यास केल्यानंतर गेल्या २० वर्षांत ग्लिरिसिडीया किंवा गिरिपुष्प या वृक्षलागवडीमुळे पन्हाळा शहराचा पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळेच येथील तापमानात वाढ होते आहे, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

पन्हाळा शहर समुद्र सपाटीपासून ३,१२७ फूट उंचीवरचे ठिकाण आहे. याला ऐतिहासिक महत्त्व पूर्वीपासून असल्याने याच्या सभोवतालची जागा रिकामी राहिली आहे. या सभोवतालच्या जागेत पारंपरिक वृक्ष होते. मधल्या काही काळात ही वृक्षसंपदा नष्ट झाली. याठिकाणी नव्याने पारंपरिक झाडे न लावता वनविभागाने मोठ्या प्रमाणात गिरिपुष्प झाडांची लागवड केली.

ही झाडे दिसायला हिरवीगार आणि त्यांची वाढ झपाट्याने होऊ लागली. डोळ्याला हिरवीगार झाडी दिसू लागली; पण याचे घातक परिणाम हळूहळू जाणवू लागले. या झाडांच्या जंगलात प्राणी, पक्षी, माणूस कोणीही जात नाही. या झाडांपासून मोठ्या प्रमाणात विषारी वायू उत्सर्जित होऊ लागला. याच्या पानगळीमुळे जमिनी नापीक होऊ लागल्या. या सर्व कारणाने पर्यावरणाचा समतोल बिघडला आणि पन्हाळा शहराचा तीनही ऋतूंचा समतोल बिघडला आहे. यापूर्वी सरासरी २००० मि.मी. पडणारा पाऊस ३००० पेक्षा जादा पडू लागला, तोही अनियमित. थंडीचे प्रमाण कमी झाले, तर फेब्रुवारीपासूनच उन्हाळा जाणवू लागला तो जून अखेरपर्यंत.

याला एकमेव कारण पारंपरिक वृक्षसंपदा हटवून परदेशी ग्लिरिसिडीया ही झाडे लावल्याने झाले आहे, असे पर्यावरण तज्ज्ञांनी मत मांडले आहे. या झाडांचा बिमोड करून नव्याने पारंपरिक झाडे लावणे गरजेचे असले, तरी शासनाची ती मानसिकता दिसुन येत नाही. त्यामुळे पन्हाळ्याचा उन्हाळा दिवसेंदिवस असह्य होणार असल्याने पन्हाळा थंड हवेचे ठिकाण हे नाव कदाचित पुसले जाणार आहे

ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डाॅ. मधुकर बाचुळकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, ग्लोबल वाॅर्मिंगचे परिणाम सर्वत्रच जाणवत असले, तरी आपल्याला इतक्या तापमानाची सवय नसल्याने वाढते तापमान घातक स्वरूपाचे आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी वन विभागाने जी परदेशी झाडे लावलीत, ती आता मोठी झाल्याने त्यांचा 'बाश्पोश्वास' आपल्याला घातक ठरतोय. त्यांनी परदेशी झाडे शेकडो एकर लावली आहेत.

यात गिरिपुष्प झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली. या वृक्षाचे परिणाम घातक झाले आहेत. या झांडामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. या झाडांचा बिमोड करून लगेच वाढणारी कदंब, बहावा यासारख्या झाडांची लागवड केली, तर पर्यावरणाच्या समतोलाबरोबरच वन्य प्राणी, पक्षी यांचीसुद्धा संख्या वाढेल आणि येणारे पावसाळे, उन्हाळे व थंडी सुसह्य होईल.

Web Title: Wrong trees around Panhala in government land .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.