Fact Check: मुंबईत २१ मजली इमारत कोसळल्याचा दावा खोटा, 'तो' व्हिडिओ डिजिटल पद्धतीने तयार केलेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 16:40 IST2025-02-14T16:15:10+5:302025-02-14T16:40:27+5:30
सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यात एक इमारत कोसळताना दिसत आहे आणि ही घटना मुंबईत घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

Fact Check: मुंबईत २१ मजली इमारत कोसळल्याचा दावा खोटा, 'तो' व्हिडिओ डिजिटल पद्धतीने तयार केलेला
Created By: विश्वास न्यूज
Translated By: ऑनलाइन लोकमत
Fact Check: सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यात एक इमारत कोसळताना दिसत आहे आणि ही घटना मुंबईत घडल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंबईत २१ मजली इमारत कोसळली असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
विश्वास न्यूजने केलेल्या पडताळणीमध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ खरा नसल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित व्हिडिओ डिजिटल पद्धतीचा वापर करुन तयार करण्यात आला आहे आणि तो खरा असल्याचं समजून युझर्स फसव्या दाव्यासह शेअर करत आहेत.
व्हायरल पोस्टमध्ये काय?
फेसबुक यूझर Sanwrmal Godara याने हा व्हिडिओ (संग्रहित लिंक) शेअर केला आहे. त्यात त्याने, “मुंबईत कोसळली 21 मजली इमारत", असे लिहिले आहे.
mahesh.shakya.9822924 नावाच्या एका इन्स्टाग्राम यूजरनेही याच दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला आहे.
तपास
व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगलवर संबंधित कीवर्डसह शोध घेतला. आम्हाला या दाव्याशी संबंधित कोणतीही विश्वसनीय बातमी सापडली नाही. मुंबईत अशी घटना घडली असती, तर त्यासंदर्भातील बातम्या नक्कीच चर्चेत असत्या.
व्हायरल व्हिडिओ बारकाईने पाहिला असता व्हिडिओमध्ये दिसणारी इमारत खरी दिसत नाही. जेव्हा इमारत कोसळते तेव्हा धूर दिसत नाही किंवा कोणताही स्फोट होत नाही, ज्यामुळे हा व्हिडिओ खोटा असल्याचा संशय बळावतो. व्हिडिओचे स्क्रीन ग्रॅब घेतले आणि गुगल लेन्सने त्यांचा शोध घेतला. BrickBreak नावाच्या पर्ल या युट्यूब चॅनलवर व्हायरल झालेल्या व्हिडिओसारखेच व्हिडिओ आम्हाला सापडले. त्यात व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या इमारतीसारखे अनेक व्हिडिओ दिसतात. चॅनलवर उपलब्ध माहितीनुसार, हे सर्व व्हिडिओ बनवण्यात आले आहेत.
आम्हाला TDC च्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर व्हायरल व्हिडिओसारखेच अनेक व्हिडिओ आढळले.
व्हिडिओ Funny Story नावाच्या फेसबुक पेज वर आम्हाला हा व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ 7 डिसेंबर 2024 रोजी अपलोड करण्यात आला आहे. फेसबुक पेजच्या बायोमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हे पेज गेमिंग व्हिडिओ बनवते.
व्हिडिओची पुष्टी करण्यासाठी आम्ही व्हिडिओ तज्ज्ञ अरुण कुमार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना व्हायरल व्हिडिओ पाठवला. हा व्हिडिओ कॉम्प्युटरची मदत घेऊन तयार केलेला असल्याचे त्यांनी सांगितले. हे एका इमारतीचे मॉडेल आहे. वास्तव नाही. संबंधित इमारत बनावट आहे, असे त्यांनी सांगितले.
शेवटी आम्ही व्हिडिओ शेअर करणाऱ्या यूझरचे प्रोफाइल स्कॅन केले. फेसबुकवर या यूझरला 8 हजार लोक फॉलो करत असल्याचे समोर आले आहे. त्याने राजस्थानला वास्तव्याला असल्याचे नमूद केले आहे. याआधीही अनेक डिजीटल पद्धतीने तयार केलेले व्हिडिओ खरे समजून शेअर करण्यात आले आहेत. विश्वास न्यूजच्या वेबसाईटवर त्यांचा फॅक्ट चेक रिपोर्ट वाचता येईल.
निष्कर्ष : मुंबईत 21 मजली इमारत कोसळल्याच्या दाव्यासह व्हायरल झालेला दावा खोटा आहे. हा व्हिडिओ डिजीटल पद्धतीने तयार करण्यात आला असून, तो खरा मानून लोक खोट्या दाव्यासह त्याला शेअर करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
(सदर फॅक्ट चेक 'विश्वास न्यूज' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)