Fact Check: मोदींनी कॅमेरा लेन्सचं कव्हर न काढताच फोटोग्राफी केल्याचा 'तो' फोटो फसवा, जाणून घ्या सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 09:53 AM2022-09-18T09:53:16+5:302022-09-18T09:54:29+5:30

'लोकमत'नं सत्यता पडताळली असता व्हायरल करण्यात आलेला फोटो मॉर्फ करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे. 

Claim that pm modi took a photograph without removing the camera lens cover is false know the truth | Fact Check: मोदींनी कॅमेरा लेन्सचं कव्हर न काढताच फोटोग्राफी केल्याचा 'तो' फोटो फसवा, जाणून घ्या सत्य...

Fact Check: मोदींनी कॅमेरा लेन्सचं कव्हर न काढताच फोटोग्राफी केल्याचा 'तो' फोटो फसवा, जाणून घ्या सत्य...

googlenewsNext

मध्य प्रदेशातील कूना राष्ट्रीय उद्यानात १७ सप्टेंबर २०२२ रोजी नामिबियातून आणण्यात आलेल्या ८ चित्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोडण्यात आलं. देशात तब्बल ७० वर्षांनी चित्ते अवतरले आहेत. भारतात चित्त्यांचा अधिवास निर्माण करण्यासाठी भारत सरकारनं प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत मोठी योजना आणली आहे. यानुसार पुढील पाच वर्षात भारतात ५० चित्ते आणण्याचा सरकारचा मानस आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पहिल्या बॅचमधील ८ चित्ते कूना उद्यानात दाखल झाले. मोदींनी यावेळी चित्त्यांचं फोटो आपल्या कॅमेरात टिपले. याच कार्यक्रमातील मोदींचा एक फोटो सोशल मीडियात सध्या खूप व्हायरल होत आहे. फोटोग्राफी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कॅमेराच्या लेन्सवरील कव्हर काढायला विसरले, असा दावा करणारा एक फोटो व्हायरल झाला आहे. पण याची सत्यता 'लोकमत'नं पडताळली असता व्हायरल करण्यात आलेला फोटो मॉर्फ करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे. 

दावा काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या कॅमेरातून फोटोग्राफी करतानाचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पण या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी वापरत असलेल्या कॅमेराच्या लेन्सवरील कव्हर न काढताच ते फोटो टिपत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा फोटो शेअर केला आहे. तसंच इतरही काही सोशल मीडिया हँडल्सवर हा फोटो व्हायरल झाल्याचं आम्हाला पाहायला मिळालं. 

कशी केली पडताळणी?
भारतात चित्ते येणार याच्या बातम्या केल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये होत्या. तसंच मध्य प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या चित्त्यांचं स्वागत होणार असल्याचीही बातमी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित प्रत्येक कार्यक्रमाचे अपडेट्स नरेंद्र मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिले जातात. मध्य प्रदेशच्या कूना राष्ट्रीय उद्यानात पार पडलेल्या या कार्यक्रमाचेही अपडेट्स मोदींच्या ट्विटर हँडलवर सहज पाहायला मिळतील. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ देखील ट्विट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी चित्त्यांना पिंजऱ्यातून मुक्त केल्यानंतर आपल्या कॅमेरातून फोटो टिपतानाही या व्हिडिओत पाहायला मिळतात. 

व्हिडिओ २.५३ सेकंदाचा असून व्हिडिओ १५ व्या सेकंदावर थांबवल्यानंतर मोदी त्यांच्या कॅमेरातून चित्त्यांचा फोटो टिपताना दिसतात. या फ्रेममध्ये मोदींच्या कॅमेराच्या लेन्सवर कोणतंही कव्हर नव्हतं हे स्पष्ट होतं. 

गुगलवर narendra modi photography cheetah असं किवर्ड सर्च केलं असता पहिलीच लिंक Firstpost वृत्तसंस्थेनं या कार्यक्रमात मोदींनी केलेल्या फोटोग्राफीच्या बातमीची आढळून आली. या बातमीसाठी वापरण्यात आलेला फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटोग्राफी करतानाचा आहे. तसंच फोटोचं कॅप्शन पाहिलं असता फोटो पीआयबीनं टिपला असल्याचं दिसतं. महत्वाचं बाब म्हणजे लेन्सवरील कव्हर न काढता मोदी फोटोग्राफी करत असलेला व्हायरल झालेला फोटो आणि या बातमीतील फोटोची तुलना केली असता व्हायरल करण्यात आलेला फोटो रिव्हर्स करुन वापरण्यात आल्याचं दिसून येतं. 

व्हायरल फोटोमधील कॅमेराचं नाव उलट पद्धतीनं (Reverse) दिसून येत आहे. तसंच कॅमेरा निकॉन (Nikon) कंपनीचा असल्याचं निष्पन्न होतं. पण लेन्सवरील कव्हर मात्र कॅनन (Canon) कंपनीचं आहे. त्यामुळे फोटोतील विरोधाभास सहज लक्षात येतो. याशिवाय ANI या वृत्तसंस्थेनंही या संपूर्ण कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅमेराच्या लेन्सवर कव्हर असल्याचा एकही फोटो पाहायला मिळत नाही. 

निष्कर्ष- पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटोग्राफी करतानाच्या फोटोसोबत छेडछाड करण्यात आली असून कॅमेराच्या लेन्सवर कव्हर असल्याचं भासवण्यात आलं आहे.

Web Title: Claim that pm modi took a photograph without removing the camera lens cover is false know the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.