Fact Check: गरम नारळपाणी कॅन्सरवर गुणकारी नाही, व्हायरल पोस्टमधील दावा खोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 01:53 PM2022-11-07T13:53:21+5:302022-11-07T13:54:24+5:30

कर्करोगावरील उपचारांबाबत सोशल मीडियात वेगवेगळे दावे व्हायरल होत असतात. यातील काही मेसेज वाचून तर लोक कोणताही सल्ला न घेता उपचार करण्यासही सुरुवात करतात.

Drinking Hot Coconut Water Does Not Kill Cancer Cells Viral Post Is Fake | Fact Check: गरम नारळपाणी कॅन्सरवर गुणकारी नाही, व्हायरल पोस्टमधील दावा खोटा

Fact Check: गरम नारळपाणी कॅन्सरवर गुणकारी नाही, व्हायरल पोस्टमधील दावा खोटा

googlenewsNext

कर्करोगावरील उपचारांबाबत सोशल मीडियात वेगवेगळे दावे व्हायरल होत असतात. यातील काही मेसेज वाचून तर लोक कोणताही सल्ला न घेता उपचार करण्यासही सुरुवात करतात. तर अनेकजण कोणतीही शहानिशा न करता मेसेज फॉरवर्ड करतात. सध्या असाच एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यात नारळपाणी गरम करुन प्यायल्यानं कॅन्सरच्या पेशी मरतात असा दावा करण्यात आला आहे. टाटा मेमोरियल हॉस्पीटलचे डॉ. राजेंद्र बडवे यांच्या नावानं व्हॉट्सअ‍ॅपवर याबाबतचा एक मेसेज व्हायरल होत आहे. याच व्हायरल मेसेजचं सत्य जाणून घेण्याचा 'लोकमत'नं प्रयत्न केला आहे. या मेसेजेच्या पडताळणीत नेमकं काय समोर आलं ते सविस्तर जाणून घेऊयात...

काय आहे दावा?
व्हॉट्सअॅपवर टाटा मेमोरियल हॉस्पीटलचे डॉ. राजेंद्र बडवे यांच्या नावाने फिरत असलेल्या मेसेजमध्ये नारळपाणी गरम करुन प्यायल्यानं कॅन्सरच्या पेशी मारल्या जातात असा सल्ला देण्यात आला आहे. "एका कपमध्ये नारळाचे पातळ खोबऱ्याचे २ ते ३ तुकडे घ्या. त्यात गरम पाणी घाला. मग तयार झालेले "क्षारयुक्त पाणी" दररोज प्या. हे सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी आरोग्यदायी ठरतं. नारळाच्या गरम पाण्यामुळे कर्करोगावर प्रभावी ठरतो. ही पद्धत वैद्यकीय क्षेत्रात कर्करोगाच्या प्रभावी उपचारांमध्ये गुणकारी ठरत आहे. नारळाच्या गरम पाण्यानं सिस्ट्स आणि ट्यूमरवर परिणाम होतो. सर्व प्रकारच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी सिद्ध झालं आहे. नारळाच्या अर्कासह अशा प्रकारचे उपचार केवळ घातक पेशी नष्ट करतात, त्याचा निरोगी पेशींवर परिणाम होत नाही", असा दावा व्हायरल मेसेजमध्ये केला गेला आहे. 

 

कशी केली पडताळणी?
गुगलवर सिंपल कीवर्ड सर्चनं वरील दाव्याबाबत पडताळणी केली. डॉ. राजेंद्र बडवे यांनी खरंच याबाबतचं काही विधान केलं आहे का? याचा शोध गुगलवर केला. तर २०१९ पासूनच यापद्धतीचा मेसेज इंटरनेटवर व्हायरल होत असल्याचं दिसून आलं. यावर खुद्द डॉ. राजेंद्र बडवे यांनीच प्रसिद्धी पत्रक काढून कथित व्हायरल मेसेजबाबत स्पष्टीकरण दिलं होतं आणि संबंधित दावा पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलं आहे. 

डॉ. राजेंद्र बडवे यांनी १९ मे २०१९ रोजी जारी केलेलं पत्रक...


वरील पत्रकाचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे...
आमच्या असे निदर्शनास आले आहे की, सोशल मीडियात टाटा मेमोरियल हॉस्पीटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांच्या नावे गरम नारळपाणी प्यायल्याने कर्करोगाच्या पेशी मरतात आणि ही या रोगावरची नवी उपचारपद्धत शोधली गेली आहे असा मेसेज व्हायरल होत आहे. यावर आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, अशा पद्धतीचा कोणताही सल्ला डॉ. राजेंद्र बडवे अथवा टाटा मेमोरियल हॉस्पीटलने दिलेला नाही. संबंधित मेसेज पूर्णपणे खोटा असून नारळाच्या पाण्यामुळे कर्करोगावर उपचार होतात अशा पद्धतीचे कोणतेही वैज्ञानिक संशोधन अस्तित्वात नाही. त्यामुळे लोकांनी अशा मेसेजपासून सतर्क राहावं आणि खोटा संदेश लोकांमध्ये पसरणार नाही याची काळजी घ्यावी. 

निष्कर्षः टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर राजेंद्र बडवे यांनी गरम नारळपाणी पाणी प्यायल्याने कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात असा कोणताही सल्ला दिलेला नाही. सोशल मीडियात व्हायरल पोस्ट बनावट आहे.

Web Title: Drinking Hot Coconut Water Does Not Kill Cancer Cells Viral Post Is Fake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.